पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या नेत्यांना त्यांच्या सार्वजनिक भाषणांमध्ये संयम बाळगण्याचा आणि अनावश्यक भाष्य करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. एनडीए-शासित राज्यांमधील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उच्चस्तरीय बैठकीला संबोधित करताना पंतप्रधानांनी पक्षातल्या नेत्यांच्या विधानांबाबत चिंता व्यक्त केली. अलीकडेच एनडीएच्या काही नेत्यांनी पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तरादाखल केल्या गेलेल्या ऑपरेशन सिंदूरचे नेतृत्व करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधाने केली गेली होती. “भाषण करताना स्वत:वर संयम ठेवा आणि अनावश्यक विधाने करणे टाळा, असे पंतप्रधान मोदींनी बैठकीत उपस्थितांना सांगितले.
गेल्या महिन्यात झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भाजपा नेत्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली. त्या नेत्यांमध्ये मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा व राज्यमंत्री विजय शाह यांचा समावेश आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी हा सल्ला नेत्यांना दिला आहे.
एनडीएच्या नेत्यांची विधानं
जगदीश देवडा यांनी भारतीय सैन्याबद्दल केलेल्या विधानामुळे प्रचंड राजकीय वाद निर्माण झाला होता. त्यांच्या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये देवडा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत वक्तव्य केले होते. जबलपूर येथे नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना देवडा यांनी म्हटले होते, “भारतीय सैन्य आणि सैनिकांसह संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चरणी नतमस्तक होत आहे.” मध्य प्रदेशचे आदिवासी व्यवहारमंत्री कुंवर विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्यानंतरदेखील राजकीय वाद निर्माण झाला होता.
“जिन्होंने हमारी बेटियों के सिंदूर उजाडे… हमने उन्हीं की बहन को भेज कर उनकी ऐसी की तैसी करवा दी” ज्यांनी आमच्या मुलींच्या कपाळावरचे सिंदूर पुसले… आम्ही त्यांना धडा शिकविण्यासाठी त्यांच्याच बहिणीला पाठवले, असे वक्तव्य शाह यांनी केले होते. मंत्री शाह यांनी एका सभेत बोलताना कुरेशी यांचा उल्लेख ‘दहशतवाद्यांची बहीण’, असा केला होता. याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्व स्तरांतून त्यांच्यावर टीका करण्यात आली. विजय शाह यांनी वादग्रस्त वक्तव्य करून नंतर माफी मागितली होती. कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत अपमानजनक वक्तव्य करणारे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांची माफी सर्वोच्च न्यायालयाने नाकारली आहे. मगरीचे अश्रू ढाळू नका, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने विजय शाह यांना खडे बोल सुनावले होते. सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण मध्य प्रदेश उच्च न्यायालयात गेल्यानंतर उच्च न्यायालयाने एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले होते. हा आदेश रद्द करण्याची विनंती विजय शाह यांच्यातर्फे सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर या प्रकरणी माफी मागितली आहे वगैरे सांगत मगरीचे अश्रू ढाळू नका, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.
शनिवारी राज्यसभेचे खासदार रामचंद्र जांगडा यांनीही पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या पर्यटकांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. पर्यटकांनी दहशतवाद्यांशी लढायला हवं होतं, असं म्हणत त्यांना एका नव्या वादाला तोंड फोडलं. “पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी पर्यटक महिलांनी हात जोडून पतीच्या जीवाची भीक मागण्याऐवजी लढायला हवे होते”, असे विधान खासदार रामचंद्र जांगडा यांनी केले आहे. भाजपा खासदार रामचंद्र जांगडा म्हणाले, “पहलगाम येथील पर्यटक महिलांचे कुंकू पुसण्यात आले. त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास वाचला असता, तर त्यांच्यासमोर पतीवर गोळ्या झाडण्याची कुणाचीही हिंमत झाली नसती. अतिरेक्यांशी लढता लढता त्याही शहीद झाल्या असत्या. त्या महिलांमध्ये शौर्य, धाडस नव्हते. म्हणून त्या हात जोडून विनवणी करीत होत्या.”
रामचंद्र जांगडा पुढे म्हणाले, “महिलांनी जर अतिरेक्यांशी दोन हात केले असते, तर कमी लोक मारले गेले असते. जर सर्व पर्यटक अग्नीवीर असते तर निश्चितच त्यांनी अतिरेक्यांना झुंज दिली असती. आपल्याला राणी अहिल्याबाईंप्रमाणे आपल्या भगिनींमध्ये पुन्हा एकदा शौर्याची भावना जागृत करावी लागेल.” हरयाणाच्या भिवानी येथे अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात जांगडा यांनी हे विधान केले.
एकंदर एनडीएच्या नेत्यांकडून अशी बेताल वक्तव्ये केली जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसण्याची चिंता मात्र लागून राहिली आहे. त्यामुळेच त्यांनी बैठकीच्या वेळी सर्व एनडीए नेत्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.