मोहन अटाळकर

विरोधात राहून लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर संघर्ष करणाऱ्या बच्चू कडू यांनी शिवसेनेला पाठिंबा देऊन राज्यमंत्रीपद मिळवले. मंत्रीपद आपल्याला रुचत नाही, असे सांगणारे  बच्चू कडू हे नव्या सत्तेची चाहूल लागताच सेनचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना साथ देण्यासाठी का गेले, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

बच्चू कडू हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निकटचे मानले जात होते. राज्यात सत्ता स्थापनेच्या वेळी शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर त्यांना जलसंपदा, लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, मागासवर्ग कल्याण, कामगार या महत्त्वाच्या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना पश्चिम विदर्भात प्रहार या त्यांच्या पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यास त्यांना वेळही मिळाला. पण, तरीही बच्चू कडू हे अस्वस्थ होते. याची कारणे त्यांच्या भविष्यातील राजकीय लढाईशी संबंधित असल्याचे आता बोलले जात आहे.
बच्चू कडू हे आतापर्यंत चार वेळा आमदार म्हणून अचलपूर मतदार संघातून निवडून आले. पहिल्यांदा १९९९ मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यांचा निवडणुकीतील संघर्ष हा काँग्रेससोबत राहिला आहे. महाविकास आघाडीत प्रहार हा त्यांचा छोटा घटक पक्ष म्हणून सहभागी असताना उघडपणे काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेता येत नाही, ही त्यांची अडचण असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

बच्चू कडू यांनी प्रहारचा विस्तार करताना अकोला जिल्ह्यात भाजपची मदत घेतल्याची आणि भाजपनेही बच्चू कडूंविरोधात आक्रमक भूमिका घेतली नाही, याबद्दलही राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आले. सोयीचे राजकारण म्हणून आता त्यांनी शिवसेनेच्या फुटीर गटाला साथ देण्याचा निर्णय घेतला असावा, असे बोलले जाते. बच्चू कडू मूळचे शिवसैनिक आहेत. चांदूर बाजार पंचायत समितीचे सभापती म्हणून काम करताना निकृष्ट शौचालयांच्या निर्मितीचा विषय समोर येताच त्यांनी आंदोलन करून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. नंतर शिवसेनेला रामराम ठोकून त्यांनी ‘प्रहार’ ही संघटना स्थापन केली. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात २००६ मध्ये शेतकऱ्‍यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी ‘शोले’ चित्रपटातील वीरूसारखे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते. हे आंदोलन चांगलेच गाजले. त्यावेळचे उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील अखेरीस ८० फूट उंच टाकीवर चढून गेले. तेथे त्यांनी बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कायम आंदोलनाच्या माध्यमातून जनाधार मिळविण्याचा प्रयत्न  करणाऱ्या बच्चू कडू यांना गेल्या निवडणुकीच्या वेळी सत्ता स्थापनेत छोट्या पक्षांच्या भूमिकेचे महत्त्व कळले. त्यांच्यासोबत प्रहारचे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेलदेखील आहेत. सत्तेत असूनही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राज्यमंत्री म्हणून काम करताना अवघडल्यासारखे वाटत होते, राजकीय सोयीसाठी भाजपशी जवळीक महत्त्वाची वाटत असल्यामुळेच बच्चू कडूंनी दिशा बदलल्याची चर्चा आहे.