Assam Politics 2025 Rajen Gohain Resignation : २०१४ मध्ये काँग्रेसला सत्तेतून बाजूला सारून भाजपाने केंद्रासह बहुतांश राज्यांमध्ये आपले बस्तान बसवले. गेल्या दशकभरात अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या मूळ पक्षांमधून भाजपामध्ये प्रवेश केला. यादरम्यान बाहेरून आलेल्या नेत्यांशी सूर जुळत नसल्याने भाजपातील काही दिग्गजांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ईशान्य भारतातील भाजपाचा गड समजला जाणाऱ्या आसाममध्ये नुकतीच याची प्रचिती आली. जवळपास तीन दशकांहून अधिक काळ भाजपात असलेल्या माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्याने गुरुवारी (तारीख ९ ऑक्टोबर) पक्षाच्या प्राथामिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नागांव लोकसभा मतदारसंघाचे चार वेळा प्रतिनिधीत्व करणाऱ्या राजेन गोहेन यांनी गुवाहाटी येथील पक्षाच्या मुख्यालयात आपला राजीनामा सुपूर्त केला.
भाजपामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
भाजपाला ईशान्य भारतात बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. पक्षातील अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आसाममधील भारतीय जनता पक्षात सध्या दोन गट पडले आहेत. गेल्या काही वर्षांपासून ज्येष्ठ नेते गोहेन हे भाजपामधील अंतर्गत वादाचा चेहरा झाले होते. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी त्यांचे संबंध ताणले गेले होते. २०१५ मध्ये काँग्रेसमधून भाजपात आलेल्या सरमा यांनी पक्षात चांगलेच बस्तान बसवले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील नवीन फळीतील नेत्यांचे पक्षातील जुन्या नेत्यांबरोबर सूर जुळत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यातून सुरू झालेल्या राजकीय संघर्षातून राजेन आणि त्यांच्या १७ समर्थकांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
कोण आहेत राजेन गोहोईन?
मुख्यमंत्री सरमा यांच्या गटात जयंता मल्ला बरुआ, पीयूष हजारिका आणि अजंता नेओग यांसारख्या अनेक नेत्यांचा समावेश आहे. आसाममधील मंत्रिमंडळात त्यांच्याकडे महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. राजेन गोहेन पहिल्यांदा १९९९ मध्ये नागांव लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. २०१९ पर्यंत त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. २०१६ मध्ये मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. २०२४ मध्येही राजेन यांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही. विशेष बाब म्हणजे काँग्रेसने या दोन्ही निवडणुकीत या मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला.
भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माजी मंत्री काय म्हणाले?
भाजपाच्या प्राथामिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर राजेन गोहेन यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली. पक्षातील अंतर्गत मतभेद आणि त्याकडे पक्षश्रेष्ठींचे होत असलेल्या दुर्लक्षामुळेच आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. “आम्ही या पक्षात सध्या सत्तेत असलेल्या लोकांसाठी प्रवेश केला नव्हता. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि इतर ज्येष्ठ नेत्यांकडून प्रेरणा घेऊन आम्ही भाजपात आलो होतो, पण आता बाहेरून आलेल्या लोकांना पक्षात जास्त महत्व दिले जात आहे. ज्या जुन्या नेत्यांनी त्यांच्या आयुष्याची महत्त्वपूर्ण वर्षे भाजपाला दिली, त्यांना बाजूला सारले जात आहे,” असे गोहेन म्हणाले.
भाजपा हा राज्यातील जनतेचा सर्वात मोठा शत्रू – गोहेन
राजेन गोहेन हे आसाममधील अहोम समुदायाचे नेतृत्व करतात. भाजपा हा राज्यातील जनतेचा सर्वात मोठा शत्रू झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. २०२३ मध्ये झालेल्या सीमांकन प्रक्रियेनंतर अहोमसारख्या स्थानिक समुदायाचा राजकीय प्रभाव कमी झाला आहे. “आसाम विधानसभेतील सुमारे ३० ते ४० जागांवर एकेकाळी अहोम समुदायाचा प्रभाव होता, पण आता आमच्या समुदायातील नेते एकाही मतदारसंघावर दावा करू शकत नाही. त्यामागचे कारण म्हणजे संपूर्ण समुदाय तोडला आणि विखुरला गेला आहे. आज अशोक सिंघल (सरमा मंत्रिमंडळातील एक मंत्री) आसाममधील कोणत्याही जागेवरून निवडणूक लढवू शकतात. कारण- कोणत्याही आसामी समुदायाकडे एकजुटीच्या मतदानाची निर्णायक शक्ती राहिलेली नाही,” असे गोहेन यांनी सांगितले.

भाजपाला आता नागांव मतदारसंघ जिंकणे शक्य नाही- गोहेन
२०२३ मधील सीमांकन प्रक्रियेदरम्यान राजेन गोहेन यांनी आसाममधील अन्न व नागरी पुरवठा महामंडळाच्या अध्यक्षपदाचा (कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद) राजीनामा दिला होता. आपल्या माजी नागाव लोकसभा मतदारसंघातील बदलांना विरोध करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले होते. नागांव लोकसभा मतदारसंघात झालेल्या बदलाचा निषेध म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला होता. या मतदारसंघाच्या सीमांमध्ये केलेल्या फेरबदलांमुळे अल्पसंख्याक मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे या मतदारसंघात भविष्यात विजय मिळवणे भाजपाला अत्यंत कठीण जाणार असल्याचे राजेन यांनी म्हटले होते.
हेही वाचा : RSS ने मुस्लिमांचं संरक्षण करावं, उर्दू वृत्तपत्राची भूमिका; मोहन भागवतांना काय दिला सल्ला?
गोहेन यांच्या राजीनाम्यावर भाजपाची प्रतिक्रिया काय?
ऑगस्ट महिन्यातही भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी मतभेद झाल्याने आपण पक्ष सोडत असल्याचे अशोक सरमा यांनी सांगितले होते. भाजपाची साथ सोडल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, राजेन गोहेन यांच्या राजीनाम्याच्या सहा महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे भाजपाने स्पष्ट केले आहे. गोहेन हे अनेक वर्षे नागांवचे खासदार असतानाही, त्या मतदारसंघात भाजपाचा एकही आमदार नव्हता (नागांव लोकसभा मतदारसंघात आठ विधानसभा जागा येतात). मात्र, आता या सर्व मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व आहे. यावरून हे स्पष्ट होते की, त्यांच्या राजीनाम्याचा फारसा परिणाम होणार नाही,” भाजपाचे प्रवक्ते रणजीब कुमार सरमा यांनी म्हटले आहे.
आगामी निवडणुकीत आसाममधील सत्तापालट होणार?
भारतीय जनता पार्टीने गोहेन यांना योग्य तो मान सन्मान दिला. ते दीर्घकाळ पक्षाबरोबर जोडले गेले होते. या काळात त्यांनी भाजपातील अनेक पदे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रिपदही उपभोगले आहे. राज्यातील कॅबिनेट मंत्रिपदावरही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. एवढी सर्व पदे मिळूनही ते आता पक्षाला नाव ठेवत आहे. भाजपा हा केवळ एका व्यक्तीसाठी नाही, अशी टीकाही रणजीब सरमा यांनी गोहेन यांच्यावर केली. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आसाममधील राजकीय वाऱ्याची दिशा बदलली आहे. भाजपातील अनेकजण पक्षाला सोडचिठ्ठी देत असून काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिन्यातही भाजपाच्या तीन माजी आमदारांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला नवी ऊर्जा मिळाली आहे. आगामी निवडणुकीत नक्कीच सत्तापालट होणार असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात आहे.