Bihar Assembly elections 2025 बिहारमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएने जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. या जागावाटपाबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी केली. यामध्ये भाजपा आणि संयुक्त जनता दल २४३ सदस्यांच्या विधानसभेत प्रत्येकी १०१ जागांवर लढणार आहेत. याचबरोबर एनडीएचा भाग असलेल्या केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) यांना २९ जागा देण्यात आल्या आहेत, तर राष्ट्रीय लोक मोर्चा आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चा यांना प्रत्येकी ६ जागा देण्यात आल्या आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी भाजपाकडून पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. भाजपाच्या पहिल्या उमेदवार यादीत ७१ उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना तारापूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, एनडीएचे मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या महागठबंधनमधील जागावाटपाचे चित्र अजूनही अस्पष्ट आहे. निवडणुकीला तीन आठवड्यांपेक्षा कमी वेळ बाकी राहिला असताना युतीमध्ये जागावाटपाबाबत अस्पष्टता पाहायला मिळत आहे.

एनडीएतील जागावाटपाचे चित्र स्पष्ट झाल्याने याला भाजपा आणि जेडी(यू) यांच्यातील राजकीय समीकरणातील महत्त्वपूर्ण बदलाचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे. बिहारमध्ये पहिल्यांदाच, भाजपा समान जागांवर निवडणूक लढवत आहे. हा निर्णय एका विकसित होत असलेल्या भागीदारीची एक झलक मानले जात आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजपा कुठेतरी महाराष्ट्र फॉर्म्युला वापरत असल्याचे चित्र दिसून येत आहे, असे ‘एनडीटीव्ही’च्या वृत्तात म्हटले आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने काय योजना आखली आहे? त्याकडे एक नजर टाकूया…

भाजपाचा बिहारमध्ये महाराष्ट्र फॉर्म्युला
सूत्र सांगतात, भाजपाची कार्यपद्धती सिंहाच्या शिकारीच्या पद्धतीची आठवण करून देते. पक्षाचे मुख्य रणनीतीकार ‘दोन पाऊले मागे घेऊन, एक पाऊल पुढे’ या म्हणीचा अवलंब करतात. या दृष्टीकोनातून त्यांना राजकीय परिस्थितीचे संयमाने निरीक्षण करण्याची आणि योग्य क्षणाची वाट पाहण्याची संधी मिळते. ज्याप्रमाणे सिंह झडप घालण्यापूर्वी आपल्या लक्ष्याभोवती फेर धरतो, त्याचप्रमाणे भाजपाने युतीचे काळजीपूर्वक निरीक्षण केले आहे, असे ‘एनडीटीव्ही’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे.
विशेषत: महाराष्ट्रात, भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला दोन वर्षे आणि पाच महिने मुख्यमंत्रिपद देऊ केले, त्यानंतर त्यांनी स्वतःची सत्ता मजबूत केली. २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर भाजपाने ही क्रमवारी बदलली, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले, तर शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदावर नेमले.

बिहारमध्ये भाजपा मुख्यमंत्रिपदावर दावा करणार?
आता भाजपा महाराष्ट्रातील याच रणनीतीची बिहारमध्ये पुनरावृत्ती करत असल्याने, त्यांना एक मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार हे स्वतःच्या जागी एक ताकदवर नेते असले तरी, त्यांची प्रकृती आता पूर्वीसारखी उत्तम नाही, हा घटक मतदारांच्या भावनांवर परिणाम करू शकतो. जेडी(यू) बरोबर जागांचे वाटप समान केल्यामुळे, भाजपाने स्वतःला फायदेशीर स्थितीत आणले आहे. जर भाजपाच्या उमेदवारांनी जेडी(यू) च्या उमेदवारांपेक्षा सरस कामगिरी केली, तर भाजपा महाराष्ट्रात अवलंबलेल्या मार्गाप्रमाणे मुख्यमंत्रिपदावर दावा करू शकतो.
चिराग पासवान भाजपासाठी किती महत्वाचे?
एलजेपी(आर)चे नेते चिराग पासवान या युतीची गुंतागुंत दर्शवतात. नितीश कुमार यांच्याबद्दलचा त्यांचा वैरभाव सर्वश्रुत आहे. त्यांची २०२० मधील रणनीती जेडी(यू) ला कमकुवत करण्यावर केंद्रित होती, तर त्यावेळी त्यांनी भाजपाला वाचवले होते. आता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाशी युती करून, मोदींनी त्यांना स्वतःचा ‘हनुमान’ म्हटले आहे. भाजपाने पासवान यांच्या पक्षाला मोठ्या प्रमाणात जागा देण्याची तयारी दाखवणे, हे भाजपाने काळजीपूर्वक केलेल्या गणनेचे प्रतिबिंब आहे. त्यांचा पाठिंबा जेडी(यू) विरुद्धच्या भाजपाच्या प्रयत्नांना बळ देऊ शकतो, हे त्यांनी ओळखले आहे, असे ‘एनडीटीव्ही’च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

गृहमंत्री अमित शाह यांचा एकत्रित प्रचाराचा दृष्टिकोन
अलीकडील बैठकीत, अमित शाह यांनी एकत्रित दृष्टिकोनावर जोर दिला आणि जाहीर केले की भाजपाचे कार्यकर्ते केवळ त्यांच्याच पक्षासाठीच नव्हे, तर एनडीएसाठी प्रचार करतील. २०२० मध्ये, पासवान यांनी नितीश कुमार यांना लक्ष्य केल्यामुळे एनडीएच्या एकूण कामगिरीला अडथळा निर्माण झाला होता आणि त्यांना केवळ ०.०३ टक्के मतांच्या फरकाने कशीबशी सत्ता मिळाली होती. यावेळी भाजपाला अशा चुका टाळायच्या आहेत, हे निश्चित दिसते.

एनडीएने जागावाटप पूर्ण केले असताना, महागठबंधनमध्ये अजूनही अस्पष्टता
एनडीएने आपल्या प्रचाराची पायाभरणी मजबूत केली असताना, महागठबंधन जागावाटपाच्या अंतिम वाटाघाटींमध्ये अडकले आहे. निवडणूक काही आठवड्यांवर आहे, अशात राजकीय विरोधी पक्षातील गोंधळ भाजपाच्या धोरणात्मक स्पष्टतेच्या अगदी विरुद्ध आहे. त्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो की, महागठबंधन वेळेत स्वतःची पकड मजबूत करू शकेल की भाजपाची रणनीतिक कुशलता वरचढ ठरेल? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळातच कळतील.