आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून विरोधकांनी ‘इंडिया’ नावाने आघाडी केली. मात्र या आघाडीची स्थापना झाली तेव्हापासून बिहारचे मुख्यमंत्री तथा संयुक्त जनता दल (जदयू) पक्षाचे नेते नितीश कुमार हे वेगवेगळ्या कारणांमुळे नाराज असल्याचे म्हटले जाते. तसेच गेल्या काही दिवसांपासून जदयू पक्षात आलबेल नाही, असा दावा भाजपाकडून केला जातो. या सर्व दाव्यांवर नितीश कुमार यांनी स्पष्टीकरण दिले आहेत. आमच्या पक्षात कोणीही नाराज नाही. तसेच इंडिया आघाडीवरही माझी नाराजी नाही, असे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले.

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी सोमवारी (२५ डिसेंबर २०२३) एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. याच प्रश्नोत्तरांदरम्यान त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले.

“माझी कोणताही वैयक्तिक आकांक्षा नाही”

गेल्या आठवड्यात दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या घटकपक्षांची बैठक झाली. या बैठकीत आगामी वाटचालीवर चर्चा करण्यात आली. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असल्याचे मत मांडले. याच बैठकीतील चर्चेवर नितीश कुमार नाराज असल्याचा दावा केला जात आहे. नितीश कुमार यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला. इंडिया आघाडीत लवकरच जागावाटपाची प्रक्रिया पूर्ण होईल. माझी कोणताही वैयक्तिक आकांक्षा नाही. इंडिया आघाडीत जास्तीत जास्त पक्षांचा कसा समावेश होईल, यासाठीच माझा प्रयत्न आहे. हाच उद्देश ठेवून मी काम करत आहे, असे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले.

“आमच्या पक्षातील सर्व नेते एकत्र”

गेल्या काही दिवसांपासून जदयू पक्षातील नेते नाराज असल्याचेही म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेत्यांचा हवाला देत, माध्यमांनी तसे वृत्त दिले होते. यावरही नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली. “आमच्या पक्षातील सर्व नेते एकत्र आहेत. भाजपाचे नेते काय म्हणतात याकडे मी जास्त लक्ष देत नाही. त्यांना काय म्हणायचे ते म्हणून द्या. मी त्याला महत्त्व देत नाही. मला फक्त आमच्या राज्याचा विकास करायचा आहे. बिहारच्या कल्याणासाठी सध्या आम्ही अनेक विकासकामे हाती घेतलेली आहेत,” असे नितीश कुमार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लवकरच १० लाख नोकऱ्या देणार

“आम्ही बिहारच्या जनतेला १० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिलेले आहे. लवकरच आम्ही आमचे हे आश्वासन पूर्ण करू. सध्या आमच्या महाआघाडी सरकारने ५ लाख तरुणांना शासकीय नोकरी दिली आहे,” अशी माहितीही नितीश कुमार यांनी दिली.