Bihar Assembly Polls 2025 : बिहारमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला शह देण्यासाठी विरोधकांनी महाआघाडीची मोट बांधली आहे. सध्या दोन्ही आघाड्यांमधील घटकपक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण २४३ जागा असल्या तरी त्यातील ५२ मतदारसंघांमध्येच चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघांचा निकाल ५,००० पेक्षा कमी मतांच्या फरकाने लागला होता, त्यामुळेच राज्यातील राजकीय समीकरण बदलल्याचे पाहायला मिळाले होते.
पाच वर्षांपूर्वी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महाआघाडीत अत्यंत चुरशीची लढत झाली होती. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दल पक्षाने त्यावेळी सर्वाधिक ७५ जागा जिंकल्या होत्या. त्यापाठोपाठ ७४ जागा जिंकून भाजपा हा राज्यातील दुसऱ्या क्रमांचा मोठा पक्ष ठरला होता. एकंदरीत या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने १२५ जागा जिंकून बहुमत मिळवले; तर महाआघाडीला केवळ ११० जागांवरच समाधान मानावे लागले होते.
२०२० च्या निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, बिहारमधील ५२ मतदारसंघांतील चुरशीच्या लढतीत तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दल पक्षाने १५ जागा जिंकल्या होत्या, तर नऊ जागांवर काँग्रेसला विजय मिळवता आला. त्याशिवाय महाआघाडीतील इतर घटकपक्षांनी दोन जागा राखण्यात यश मिळवले होते. पराभूत उमेदवारांमध्ये आरजेडीचे १६ उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते, तर काँग्रेसचे ७ जागांवर आणि इतर मित्रपक्षांचे उमेदवार तीन जागांवर कमी मतांनी पराभूत झाले.
आणखी वाचा : आर्थिक उत्पन्न घटल्याचं कारण देत मोदी सरकारमधील ‘हा’ मंत्री राजीनामा देण्यास तयार; नेमकं प्रकरण काय?
दुसरीकडे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडने ५२ पैकी १३ जागांवर विजय मिळवला होता; तर भाजपाला नऊ आणि इतर मित्रपक्षांना दोन जागा जिंकण्यात यश मिळाले होते. पराभूत उमेदवारांमध्ये जनता दल युनायटेडचे १३ उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते, तर भाजपा १० जागांवर आणि विकसनशील इंसान पार्टीचे दोन उमेदवार कमी फरकाने पराभूत झाले. त्या वेळी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणाऱ्या लोक जनशक्ती पार्टीला केवळ ३३३ मतांनी एकाच जागेवर विजय मिळवता आला होता.
२०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघांमधील निकाल अत्यंत कमी फरकाने लागले होते. नालंदा जिल्ह्यातील हिलसा मतदारसंघात सर्वात कमी फरकाची लढत झाली होती. या निवडणुकीत जनता दल युनायटेड पक्षाचा उमेदवार फक्त १२ मतांनी विजयी झाला होता. शेखपूर जिल्ह्यातील बारबिघा मतदारसंघातदेखील नितीश कुमार यांच्या जेडीयूचा उमेदवार केवळ १३३ मतांच्या फरकाने निवडून आला. त्याशिवाय हजारिबाग जिल्ह्यातील रामगढ विधानसभा मतदारसंघातही जेडीयूच्या उमेदवाराने १८९ मतांनी विजय मिळवला.
गोपालगंज जिल्ह्यातील अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या भोरे मतदारसंघात जेडीयूच्या उमेदवाराने सीपीआय(एमएल) लिबरेशनच्या उमेदवाराचा ४६२ मतांनी पराभव केला, तर रोहतास जिल्ह्यातील डेहरी मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराला राजदच्या उमेदवाराकडून ४६४ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. बेगुसराय जिल्ह्यातील बछवारा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराने सीपीआयच्या उमेदवाराला अवघ्या ४८४ मताधिक्याने पराभूत केले, तर जमुई जिल्ह्यातील चकाई मतदारसंघात अपक्ष उमेदवाराने आरजेडीच्या उमेदवाराला ५८१ मतांनी हरवले.
हेही वाचा : नवी मुंबईत भाजपचाच महापौर हवा, पक्षाच्या बैठकीत वरिष्ठांचा सूर
मुजफ्फरपूर जिल्ह्यातील कुर्हानी मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराला ७१२ मताधिक्याने पराभव स्वीकारावा लागला. त्याशिवाय बेगुसरायच्या बखरी मतदारसंघात सीपीआयच्या उमेदवाराने ७७७ मतांनी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला. खगडिया जिल्ह्यातील परबत्ता मतदारसंघात जेडीयूच्या उमेदवाराने आरजेडीच्या उमेदवारावर ९५१ मतांनी विजय मिळवला. दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत या ५२ मतदारसंघात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला काहीसा दिलासा मिळाला. २०२० मध्ये महाआघाडीने जिंकलेल्या २० मतदारसंघांत जेडीयू-भाजपा युतीला चांगली आघाडी मिळाली होती. मात्र, एनडीएने २०२० मध्ये जिंकलेल्या सहा जागांवर महाआघाडीचे उमेदवार आघाडीवर होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दरभंगा ग्रामीण आणि महाराजगंज या दोन विधानसभा मतदारसंघात मात्र वेगळेच समीकरण पाहायला मिळाले.
२०२० च्या विधानसभा निवडणुकीत दरभंगामध्ये आरजेडीच्या उमेदवाराने जेडीयूच्या उमेदवाराचा केवळ २,१४१ मतांनी पराभव केला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजपाने या मतदारसंघातून आरजेडीवर तब्बल २४,०७५ मतांची आघाडी घेतली. तसेच, महाराजगंज विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने जेडीयूच्या उमेदवाराचा एक हजार ९७६ मतांनी पराभव केला होता. परंतु, लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपाने काँग्रेवर तब्बल २०,७३८ मतांची आघाडी घेतली होती. या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत या ५२ जागा निर्णायक ठरणार आहे, त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.