Bihar Assembly Elections 2025 बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. दोन टप्प्यांत येथील निवडणुका होणार आहेत. ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान होईल आणि १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे, त्यामुळे बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) ज्येष्ठ नेते आणि खासदार राजीव प्रताप रुडी यांनी नुकतीच ‘बिहार तक’ला मुलाखत दिली. ते आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात.
त्यांनी दिलेल्या या मुलाखतीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना तोंड फुटले आहे. ते या मुलाखतीत केवळ बिहारच्या राजकारणावरच नव्हे, तर भाजपाच्या राष्ट्रीय स्तरावरील अंतर्गत समीकरणे, जातीय नेतृत्व आणि सत्तासंघर्ष आदी मुद्द्यांवरदेखील बोलले. रुडी यांनी विविध मुद्द्यांवर आपले मत मांडले. ते नक्की काय म्हणाले? जाणून घेऊयात…

भाजपामध्ये राजपूत नेत्यांबरोबर अन्याय?
मुलाखतीची सुरुवातच एका अत्यंत संवेदनशील प्रश्नाने झाली. भाजपामध्ये राजपूत नेत्यांबरोबर फसवणूक किंवा अन्याय होत आहे का? असा प्रश्न बिहारच्या राजकारणात सध्या उपस्थित केला जात आहे. राजपूत समाज हा बिहारमध्ये भाजपाचा पारंपरिक आणि महत्त्वाचा मतदार वर्ग मानला जातो. मात्र, काही काळापासून या समाजात पक्षनेतृत्वाकडून उपेक्षा होत असल्याची भावना बळावत चालली आहे.
याच संदर्भात रुडींना विचारण्यात आले की भाजपाची ओळख हिंदुत्व आणि हिंदू ऐक्यावर आधारित असताना, ते ‘राजपूत ऐक्या’वर जोर का देत आहेत? यावर रुडी म्हणाले की, राजकारणात प्रत्येक समाजाला त्यांचे योग्य स्थान आणि सन्मान मिळणे आवश्यक आहे. जर एका मोठ्या आणि महत्त्वाच्या समाज वर्गाला त्यांचे हक्क मिळाले नाहीत, तर त्यांच्या हितासाठी आवाज उठवणे हे आपले कर्तव्य आहे. हे जातीय राजकारण नसून सामाजिक समतोलासाठी आणि पक्षाच्या एकंदर यशासाठी आवश्यक आहे असे ते म्हणाले.
भाजपामधील वर्चस्वाची लढाई
या मुलाखतीत त्यांना दिल्लीतील प्रतिष्ठेच्या ‘कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया’ (Constitution Club of India) च्या सचिवपदाच्या निवडणुकीबाबतदेखील प्रश्न करण्यात आला. या निवडणुकीत राजीव प्रताप रुडी यांनी त्यांच्याच पक्षाचे नेते संजीव बालियान यांचा पराभव केला. ही निवडणूक म्हणजे भाजपाच्या अंतर्गत सत्ताकेंद्रांमधील संघर्ष होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. बालियान यांना सध्याच्या पक्ष नेतृत्वाचे, विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे समर्थन असल्याचे मानले जात होते, त्यामुळे ही निवडणूक अमित शाह विरुद्ध रुडी अशी झाली होती का, असा प्रश्न त्यांना करण्यात आला.
रुडी यांनी या विजयाला राजकीय जीवनातील सर्वात मोठी उपलब्धी मानले. त्यांनी सांगितले की, या क्लबवर गेल्या २५ वर्षांपासून त्यांचे वर्चस्व आहे आणि त्यांचा हा विजय केवळ भाजपाच्या सदस्यांनीच नव्हे, तर काँग्रेस, डीएमके आणि इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनीही दिलेल्या पाठिंब्यामुळे शक्य झाला. त्यांच्या मते, त्यांना हा विजय पक्षीय भेद विसरून मिळाला आहे. याचा अर्थ केवळ भाजपामध्येच नव्हे, तर संपूर्ण संसदेमध्ये त्यांच्या कामाला आणि नेतृत्वाला मान्यता आहे. ‘राजपूत ऐक्या’वर त्यांचा जोर आणि कॉन्स्टिट्यूशन क्लबमधील त्यांचा लक्षवेधी विजय, हे दोन्ही प्रसंग भाजपाच्या भविष्यातील वाटचालीसाठी महत्त्वाचे आहेत. आगामी काळात भाजपा जातीय समीकरण, विशिष्ट समुदायाची नाराजी, यांसारख्या अंतर्गत आव्हानांना कसे सामोरे जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
राजीव प्रताप यांनी यापूर्वी पक्षातील नेत्यावर केलेले आरोप
राजीव प्रताप रुडी यांनी एका मुलाखतीत भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्यावर गंभीर आरोप केले. रुडी यांनी त्यांचा उल्लेख अहंकारी म्हणून केला. भाजपा मीडिया ग्रुप ‘न्यूजलॉन्ड्री’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांना प्रश्न करण्यात आला की, कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीदरम्यान तुम्हाला सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा पाठिंबा होता, तर गृहमंत्री अमित शाह यांचा पाठिंबा माजी खासदार संजीव बालियान यांना होता. या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, ही चुकीची माहिती पसरवली गेली.
राजीव रुडी नाव न घेता निशिकांत दुबेवर टीका करत म्हणाले होते की, “केवळ एक व्यक्ती आहे जो संसदेत आपले स्वतःचे सरकार चालवत आहे आणि अहंकारी आहे, त्यानीच ही खोटी माहिती पसरवली.” त्यांनी म्हटले होते, “ही चुकीची माहिती एका व्यक्तीने पसरवली आणि त्या व्यक्तीला वाटते की तो संसद नियंत्रित करतो. संसदेत ते त्यांचा स्वतःचा शो चालवतात. त्यांनी या प्रकरणात गृहमंत्र्यांचे नाव सामील केले.”
त्यांनी म्हटले होते, “कधीकधी काही लोक अहंकारी होतात, संसदेत स्वतःचा शो चालवतात. त्यांनीच हे ठरवले की मी दिल्ली कॉन्स्टिट्यूशन क्लबची निवडणूक जिंकू नये. त्यांची समस्या ही आहे की त्यांना स्वतःनुसार गोष्टी करायच्या आहेत. सरकारपेक्षा वेगळी त्यांची स्वतःची एक सरकार आहे आणि मी त्यांच्या सरकारचा भाग नाही.”