छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत ‘माधव’ सूत्रास अधिक बळकटी देत भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली. मात्र, थोड्या मतांनी त्या पराभूत झाल्या. निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या मराठा विरुद्ध ओबीसी अशा वातावरणात निसटून चाललेली ‘ओबीसी’ मतपेढी टिकवून ठेवण्यासाठी विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पंकजा मुंडे यांच्या ‘ओबीसी’ नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपला सपाटून मार खावा लागला. पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन झाले नसते तर ओबीसी मतांच्या मतपेढीवर मोठा परिणाम झाला असता, असा मतप्रवाह भाजपमध्ये होता. त्यातूनच मुंडे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याचे सांगण्यात येते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना जलसंधारण मंत्री म्हणून काम करणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या कार्यकाळात जलयुक्त शिवार ही योजना सुरू झाली. ही योजना लोकप्रिय झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचे खाते बदलण्यात आले. पुढे महिला व बालविकास मंत्री म्हणून काम करणाऱ्या पंकजा मुंडे परळी विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्या. या निवडणुकीमध्ये भाजपच्या नेतृत्वाने पुरेशी साथ दिली नसल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला होता. तत्पूर्वी जनतेच्या मनातील मीच मुख्यमंत्री असे कथित वक्तव्य केल्याचे सांगण्यात आले. त्याचा त्यांनी वारंवार खुलासा केला. मात्र, ताेपर्यंत त्यांच्या नेतृत्वाला पर्यायही शोधण्यात आले. अगदी ऊसतोडणी कामकारांचे नेतृत्व आमदार सुरेश धस यांनी करावे असे निर्णय भाजप प्रदेशाध्यांनी घेतले होते. दिवंगत विनायक मेटे यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यापासून ते वाहने अडविण्यापर्यत कार्यकर्ते आक्रमक होते. यामुळे पंकजा मुंडे अस्वस्थ असल्याचे चित्र निर्माण झाले होते. महादेव जानकर, सुजय विखे, राम शिंदे, एकनाथ खडसे, रक्षा खडसे यांच्यासह अनेकांची मोट बांधत पंकजा मुंडे यांनी नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला होता. २०१९ नंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली जात होती. पण त्याकडे भाजप नेतृत्त्वाने दुर्लक्ष केले. लोकसभा निवडणुकीपूर्वी आपले म्हणणे मांडण्यासाठी अमित शहा यांची वेळ मागितली असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. लोकसभा निवडणुकामध्ये भाजपला सपाटून मार खावा लागल्याने ‘माधव’ मतपेढी हातीची जाऊ नये म्हणून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा राजकीय पटावर होताना दिसत आहे.

हेही वाचा : ना कुणाशी मैत्री, ना शत्रुत्व; राजकीय विजनवासात गेलेल्या रालोद पक्षाने कशी घेतली उभारी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंडे कुटुंबियाकडे पद नसणारे केवळ २५ दिवसच

दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या घरात मागील ३४ वर्षात केवळ कुठले पद नाही, असे केवळ २५ दिवसच गेले. ५ जूनला पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतरचे हे २५ दिवस आहेत. १९९० पासून गोपीनाथ मुंडे २०१४ पर्यंत सतत निवडून आले. त्यात ते दोनवेळा खासदार होते. त्यांच्या निधनानंतर त्यांची एक कन्या डॉ. प्रीतम मुंडे निवडून आल्या, तर पंकजा मुंडे २०१४ ते २०१९ या पाच वर्षात त्या राज्यात मंत्री होत्या. २०१९ ला त्यांचा पराभव झाला तरी डॉ. प्रीतम मुंडे २०२४ पर्यंत खासदार होत्या.