राजकारण आणि क्रीडा क्षेत्र दोघांनाही डावपेच, नेतृत्व कौशल्य आणि संघटनात्मक ताकदीची आवश्यकता असते. त्यामुळेच राजकीय पक्ष विशेषतः भाजप, या बाबीचा केवळ निवडणुकांपुरताच वापर करीत नाही तर याच माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांमध्येही आपले वर्चस्व निर्माण करत आहे. क्रीडा क्षेत्र हे त्यातीलच एक महत्त्वाचे माध्यम बनले आहे. या क्षेत्रातील राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडून काढून आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील त्यांचे विश्वासू सहकाऱ्यांना मैदानात उतरवले आहे.राज्य ऑलम्पिक संघटनेच्या निवडणुकीत नागपूरचे माजी महापौर व विद्यमान विधान परिषद सदस्य संदपी जोशी यांनी घेतलेली उडी याकडे याच अनुषंगाने बघितले जात आहे.

राजकारणासोबतच कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती अशा राजकारणाच्या पलिकडच्या संघटनांवर असणाऱ्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अग्रस्थानी आहेत, मुंबईतील विविध पक्षाचे नेते मुंबई क्रिकेट असोसिएशनध्ये सक्रिय आहेत. विदर्भाचा विचार केला तर फारपूर्वी बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांचे नाव येते. नागपूर जिल्ह्याचे पुत्र असलेले काँग्रेस नेते बँ. शेषराव वानखेडे यांनी एक दशकभर उत्तम अर्थमंत्री म्हणून कारकीर्द गाजवली. राजकारणासोबतच उत्तम क्रीडा प्रशासक म्हणून त्यांची ओळख होती. १९८०-८१ ते१९८२-८३ या वर्षात ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष होते.१९६३ ते मृत्यूपर्यंत ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यांच्यानंतर राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा संघटनेचे प्रमुख होण्याची संधी प्रफुल्ल पटेल यांना मिळाली होती ते २००९ ते २०२२ असे सलग १३ वर्ष ते ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष होते.

क्रीडा संघटनांमध्ये भाजप सक्रिय

२०१४ नंतर केद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यावर या पक्षाचे नेते क्रीडा संघटनांमध्ये अधिक सक्रिय झाले. नागपुरातील भाजप नेत्यांची या क्षेत्रातील भरारी उल्लेखनीय मानावी लागेल अशीच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे दोन आमदार सध्या राज्यपातळीवरच्या दोन प्रमुख क्रीडा संघटनांचे प्रमुख आहेत. त्यात नागपूरचे माजी महापौर व विद्यमान विधान परिषद सदस्य संदीप जोशी व विद्यमान आमदार परिणय फुके यांचा समावेश आहे. जोशी हे राज्य बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत तर फुके हे राज्य चेस संघटनेचे प्रमुख आहेत.आता राज्य ऑलंम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत जोशी यांनी उडी घेतली आहे. त्यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे.

राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला आव्हान

क्रीडा संघटनांवर राष्ट्रवादीच्या पवार कुटुंबीयांच वर्चस्व आहे. शरद पवार, अजित पवार आणि आता रोहित पवार हे अनेक क्रीडा संघटनांवर आहे. पवार-फडणवीस यांचा राजकीय संघर्ष सर्वपरिचित आहे, आता तो क्रीडा संघटनांपर्यंत पोहोचल्याचे दिसते. राज्य ऑलम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार रिंगणात आहे. ते सध्या महायुतीसोबत असतानाही भाजपचे पुण्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांंनी त्यांच्या विरोधात अर्ज दाखल केला आहे. आता तर त्यांच्यासोबत संदीप जोशी उपाध्यक्षपदासाठी रिंगणात आहे. मोहोळ आणि जोशी हे दोघेही कट्टर फडणवीस समर्थक आहेत, ते अजित पवार यांच्या विरोधात उतरले आहे यातूनच सर्वकाही स्पष्ट होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे शरद पवार अनेक वर्ष अध्यक्ष होते. याच सघटनेच्या अध्यक्षपदावर फडणवीस यांनी त्यांचे मित्र अमोल काळे यांना बसवले होते. शऱद पवार चाळीस वर्ष ज्या संघटनेचे अध्यक्ष होतो त्या राज्य कुस्तिगीर परिषदेच्या अध्यक्षपदी २०२२ मध्ये भाजपचे तत्कालीन खासदार रामदास तडस यांची निवड झाली होती.

राजकारणाला नवा वळण

भाजपकडून क्रीडा संघटनांमध्ये होत असलेला प्रवेश हा केवळ क्रीडा प्रेमासाठी नाही, तर सत्तेचा नवा पल्ला गाठण्याचा एक योजनेचा भाग आहे. यातून पक्षाच्या सामाजिक-राजकीय पकडीची व्याप्ती वाढवण्याचा स्पष्ट प्रयत्न दिसतो. राष्ट्रवादीसारख्या पारंपरिक पक्षांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची भाजपची ही रणनीती आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा वळण देऊ शकते.