अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयोजित केलेल्या लष्करी परेडसाठी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना आमंत्रित केल्याच्या काँग्रेसच्या दाव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. मुख्य म्हणजे व्हाईट हाऊसने असीम मुनीर यांना आमंत्रित केल्याच्या वृत्ताला नकार दिला आहे. अमेरिकेने ‘खोट्या बातम्या’ नाकारल्याचा दावा करत भाजपाने काँग्रेसवर आरोप केला.
त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचा अपमान केल्याचादेखील आरोप केला आहे. भाजपातील एका नेत्याने मागील काँग्रेस सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नक्की काय घडले? भाजापाने काँग्रेसला माफी मागण्यास का सांगितले? भाजपाचे आरोप काय? त्याविषयी जाणून घेऊयात.

भाजपाने काय आरोप केले?
- भाजपाचे निशिकांत दुबे यांनी पत्रकारांना सांगितले, जयराम रमेश यांनी दावा केला की, असीम मुनीर अमेरिकेला जात आहेत आणि त्यांनी याबद्दल एक पत्रकार परिषद घेतली.
- पण, असे दिसून आले की मुनीर परेडसाठी जातच नव्हते; अशाप्रकारे काँग्रेस लोकांची दिशाभूल करतात आणि पाकिस्तानची भाषा बोलतात.
- पाकिस्तान मुस्लीम लीग आणि जयराम रमेश यांच्यात काय फरक आहे? असा प्रश्न दुबे यांनी केला.
- एक्सवरील एका पोस्टमध्ये दुबे यांनी पूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली.
- त्याचा संबंध खलिस्तानी अतिरेक्यांच्या उदयाशी आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय परिणामांशी जोडला.
- त्यासाठी त्यांनी कॅनडाचे उदाहरण दिले. कॅनडाने १९७० च्या दशकापासून खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय दिला आहे, असे त्यांनी म्हटले होते.
१९७० ते १९८४ दरम्यान, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी कॅनडाचे पंतप्रधान पियरे इलियट ट्रुडो यांना सात पत्रे लिहिली होती. त्यात खलिस्तानींविरुद्ध कारवाईची मागणी केली गेली होती. परंतु, त्यांना याबाबत प्रतिसाद मिळाला नाही, असा दावा दुबे त्यांनी केला आणि कनिष्क बॉम्बस्फोट हा त्याचा परिणाम असल्याचे सांगितले. “काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा पाकिस्तानच्या तालावर नाचत आहे आणि यावेळी त्यांनी जागतिक व्यासपीठावर भारताचा अपमान केला आहे. जयराम रमेश यांनी ट्रम्प यांनी आयोजित केलेल्या अमेरिकन सैन्याच्या परेडमध्ये पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना आमंत्रित केल्याच्या खोट्या बातम्यांना वाढवले आहे आणि आता ही बातमी खोटी असल्याचे निष्पन्न झाले,” असे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट केले.
काँग्रेसने काय म्हटले होते?
काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्यासह इतरांनीही असा दावा केला होता की, वॉशिंग्टनमध्ये शनिवारी होणाऱ्या लष्करी परेडसाठी पाकिस्तानमधील लष्करप्रमुखांना आमंत्रण देणे हे भारतीय राजनैतिकतेसाठी मोठा धक्का आहे. असीम मुनीर यांना अमेरिकेने आमंत्रण दिल्याचा दावा करणाऱ्या बातमीचा उल्लेख करत त्यांनी ही टीका केली होती. काँग्रेसचे संपर्कप्रमुख जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये म्हटले, “पहलगाम दहशतवादी हल्ल्यांपूर्वी भडकाऊ आणि चिथावणीखोर भाषेत बोलणारा हा माणूस आहे. अमेरिका खरोखर काय करणार आहे? हा भारतासाठी आणखी एक मोठा राजनैतिक धक्का आहे.” परंतु, व्हाईट हाऊसने असीम मुनीर यांना आमंत्रित केल्याचे वृत्त नाकारले. व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “हे खोटे आहे, कोणत्याही परदेशी लष्करी नेत्यांना या परेडसाठी आमंत्रित केले नव्हते.”
मुनीर अमेरिकेत कोणत्या कारणासाठी गेलेत?
‘डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे लष्करप्रमुख मुनीर अमेरिकेशी लष्करी आणि धोरणात्मक संबंध मजबूत करण्यासाठी पाच दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर अमेरिकेत गेले आहेत. त्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे की, त्यांचा लष्करी परेडशी काहीही संबंध नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चर्चेत पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या आयसिस गटाविरुद्ध सुरक्षा सहकार्यावरही भर दिला जाणार आहे. तसेच या चर्चेत ते अमेरिकेला पाणीवाटपाच्या चर्चेसाठी भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या भेटीचा उद्देश पाकिस्तानमध्ये खनिजे आणि कृषी क्षेत्रात गुंतवणूक आणणेदेखील आहे.