अभिषेक तेली

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक नजरेसमोर ठेवून सणांच्या माध्यमातून मतदारांना भुरळ घालण्याचे राजकीय पक्षांचे ‘कार्यक्रम’ जोमात आहेत. भाजपच्या दीपोत्सवात लाखो रुपयांच्या बक्षिसांची खैरात करण्यात येत आहे. त्यात पैठणी पासून ते चक्क विजेवर चालणारी दुचाकी आणि अल्टो कारचा समावेश असल्याने मतदारांची दिवाळी जोरात सुरू आहे.

सणांचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भाजपने मराठी मतदारांवर, विशेषतः शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. वरळीतील जांबोरी मैदानातील दहीहंडी उत्सवानंतर आता त्याच ठिकाणी २३ ऑक्टोबरपर्यंत मराठी दीपोत्सवाचे आयोजन मुंबई भाजपकडून करण्यात आले आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी फलक झळकवून मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यात आली आहे. यामध्ये मराठी अस्मितेचा मुद्दा अगदी ठळकपणे मांडण्यात आला आहे. त्याचबरोबर मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाखो रुपयांच्या बक्षिसांची उधळण या दीपोत्सवात करण्यात आली आहे. चारचाकी, दुचाकी वाहने, पैठण्या अशी बक्षिसे सध्या चर्चेचा विषय ठरली आहेत.

हेही वाचा : पुरानंतर दिवाळीनिमित्त राजकारण्यांचे मतदारप्रेम उफाळले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीपोत्सवात दररोज सहभागी झालेल्यांच्या नावाची सोडत काढण्यात येते. दहा भाग्यवान महिलांना पैठणी व एका विजेत्याला दुचाकी देण्यात येत आहे. त्याचसोबत वेशभूषा स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. उत्कृष्ट मराठमोळी वेशभूषा करणाऱ्या नागरिकांची दररोज निवड करण्यात येत असून त्यांची महाअंतिम फेरी ही २३ ऑक्टोबरला होणार आहे. या वेशभूषा स्पर्धेतील पहिल्या क्रमांक पटकावणाऱ्या मुंबईकर परिवारास चक्क मारुती अल्टो कार, दुसऱ्या क्रमांकासाठी अथर विद्युत दुचाकी आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरणाऱ्यास होंडा अॅक्टिव्हा दुचाकी देण्यात येणार आहे. भाजपने यापूर्वी अभ्युदय नगरच्या मैदानात आयोजित केलेल्या मराठी दांडियामध्ये जवळपास ७० हजार रुपये किंमतीचे आयफोन हे दररोज एका महिलेला व एका पुरुषाला दिले होते. तसेच काही उत्तेजनार्थ बक्षीसेही देण्यात आली होती.