BJP Drops 10 sitting MLA in Bihar Election 2025 : बिहारमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची मोट बांधली आहे. यादरम्यान भाजपाने आपल्या ७१ उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी (तारीख १४ ऑक्टोबर) जाहीर केली. या यादीत पक्षाने ५० टक्के उमेदवारांवर पुन्हा विश्वास टाकला आहे; तर १० विद्यमान आमदारांचे तिकीट कापून त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. नेमके काय आहे त्यामागचे कारण? जाणून घेऊ…

भाजपाच्या पहिल्या यादीत कुणाकुणाचा समावेश?

भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवारी यादीत उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी (तारापूर विधानसभा मतदारसंघ), विजयकुमार सिन्हा (लखीसराय मतदारसंघ), माजी उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद (कटिहार मतदारसंघ), रेणू देवी (बेतिया मतदारसंघ), विद्यमान मंत्री मंगल पांडे (सिवान मतदारसंघ) या प्रमुख नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. त्याशिवाय मंत्री कृष्णकुमार ऋषी (बनमंखी मतदारसंघ), जिबेश कुमार (जाले मतदारसंघ), नितीश मिश्रा (झंझारपूर मतदारसंघ) आणि नितीन नवीन (बँकीपूर मतदारसंघ) यांनाही पुन्हा निवडणुकीचे तिकीट देण्यात आले आहे. भाजपाने पहिल्या टप्प्यात अधिकाधिक जागा जिंकून आपली स्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने ही यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये सामाजिक समीकरणे साधण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

एनडीएचे जागावाटपाचे सूत्र कसे ठरले?

बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहे. १० ऑक्टोबर रोजी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आपले जागावाटपाचे सूत्र जाहीर केले होते. त्यानुसार भाजपा आणि नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड पक्ष प्रत्येकी १०१ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला (रामविलास) २९ जागा देण्यात आल्या आहेत; तर एनडीएतील इतर मित्रपक्ष- राष्ट्रीय लोक मोर्चा आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चा पक्षाच्या पारड्यात प्रत्येकी ६ जागा टाकण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकसंध आणि मजबूत ठेवण्यासाठी भाजपाने चिराग पासवान यांना जागावाटपात झुकते माप दिल्याचे भाजपातील एका सूत्राने सांगितले आहे.

nitish kumar chirag paswan and pm modi
पंतप्रधान मोदी आणि भाजपाचे बिहारमधील मित्रपक्षातील नेते

सम्राट चौधरी त्यांच्या पारंपरिक बालेकिल्ल्यातून लढणार

भाजपाने जाहीर केलेल्या ७१ उमेदवारांच्या पहिल्या यादीत संजय सारावगी (दरभंगा मतदारसंघ), अवधेश सिंह (हाजीपूर मतदारसंघ), राणा रंधीर सिंह (मधुबन मतदारसंघ), पवन जैसवाल (ढाका मतदारसंघ) आणि विनोद नारायण झा (बेनीपट्टी मतदारसंघ) या विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तारापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांचे वडील शकुनी चौधरी यांनी विविध पक्षांतर्फे या मतदारसंघाचे अनेकदा प्रतिनिधित्व केले आहे; तर त्यांच्या आई पार्वती देवी यांनी १९९८ च्या पोटनिवडणुकीत तारापूर मतदारसंघातून विजय मिळवला होता. २०१० पासून हा मतदारसंघ जनता दल युनायटेड पक्षाच्या ताब्यात आहे. गेल्या निवडणुकीत तारापूरमधून जेडीयूचे दिवंगत नेते मेवा लाल चौधरी निवडून आले होते.

बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते सम्राट चौधरी

भाजपाकडून विद्यमान १० आमदारांना डच्चू

भाजपाने आपल्या पहिल्या उमेदवारी यादीतून १० विद्यमान आमदारांना डच्चू दिला आहे, त्यामध्ये पाच माजी मंत्री आणि काही ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. पक्षाच्या राज्य युनिटमध्ये नवीन ऊर्जा आणण्यासाठी हा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय असल्याचे सांगितले जात आहे. साहिब विधानसभा मतदारसंघातून सात वेळा निवडून आलेले ज्येष्ठ नेते किशोर यादव यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्याशिवाय कुम्हरारचे पाच वेळा आमदार राहिलेले अरुण सिन्हा यांचेही तिकीट कापण्यात आले आहे. पाटण्यातील या दोन्ही मतदारसंघातून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. पाटणा उच्च न्यायालयातील वकील रत्नेश कुशवाहा आणि भाजपाचे सध्याचे सरचिटणीस संजय गुप्ता आता या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

भाजपाच्या १० विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्यात आले.

भाजपाने कोणकोणत्या नेत्यांचे तिकीट कापले?

भाजपाने रीगा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मोतीलाल प्रसाद यांचे तिकीट कापले असून, त्यांच्या जागी बैद्यनाथ प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. सीतामढी मतदारसंघातून मिथिलेश कुमार यांच्या जागी माजी खासदार सुनील कुमार पिंटू निवडणूक लढवणार आहेत. आरा मतदारसंघातून अमरेन्द्र प्रताप सिंह यांच्या जागी माजी आमदार संजय सिंह टायगर यांना तिकीट देण्यात आले आहे. राजनगर या राखीव मतदारसंघातून रामप्रीत पासवान यांच्या जागी ३० वर्षीय सुजित पासवान यांना उमेदवारी देण्यात आली आहे; तर औराई मतदारसंघातून रामसुरत राय यांच्या जागी रमा निषाद (माजी खासदार अजय निषाद यांची पत्नी), कटोरिया मतदारसंघातून निक्की हेंब्रम यांच्या जागी पूरनलाल टुडू, मुंगेर मतदारसंघातून प्रणव कुमार यांच्या जागी कुमार प्रणय आणि नरपतगंजमधून जयप्रकाश यादव यांच्या जागी देवंती यादव निवडणूक लढवणार आहे.

भाजपाकडून नऊ महिला नेत्यांना उमेदवारी

माजी केंद्रीय मंत्री राम कृपाल यादव यांना भाजपाने दानापूर मतदारसंघातून तिकीट दिले आहे. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत पाटलीपुत्र मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला होता. राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवार मीसा भारती यांनी मोठ्या मताधिक्यांनी राम कृपाल यादव यांना पराभूत केले होते. आता ते पुन्हा राज्याच्या राजकारणात उतरत आहेत. दानापूरमध्ये त्यांचा सामना आरजेडीचे विद्यमान आमदार ऋतलाल यादव यांच्याशी होणार आहे. भाजपाने आपल्या पहिल्या यादीत नऊ महिला उमेदवारांना संधी दिली आहे. रेणू देवी (बेतिया मतदारसंघ), गायत्री देवी (परीहार मतदारसंघ), निशा सिंह (प्राणपूर मतदारसंघ), देवांती यादव (नरपतगंज मतदारसंघ), स्वीटी सिंह (किशनगंज मतदारसंघ), कविता देवी (कोरहा–अनु.जाती मतदारसंघ), अरुणा देवी (वरसलीगंज मतदारसंघ), श्रेयसी सिंह (जमुई मतदारसंघ) आणि राम निषाद औराई मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

बिहारमधील भाजपाच्या महिला उमेदवार

भाजपाने यावेळी जातीय संतुलन राखण्यावर विशेष भर दिला असून, अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या नऊ जागांवर उमेदवार उतरवले आहेत. तसेच, इतर मागासवर्गीय आणि अति मागास समुदायातील उमेदवारांनाही संधी देण्यात आली आहे. भाजपा आता नव्या चेहऱ्यांना राजकारणात संधी देत असल्याचे राजकीय विश्लेषकांनी म्हटले आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची शक्यता असल्याने त्यात नेमकी कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.