जळगाव : शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हजरजबाबी स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. सडेतोड वक्तव्य करून अंगावर आलेल्या विरोधकांनाच नाही तर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनाही ते त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची धमक ठेवतात. असे असताना, एकनाथ शिंदेंचा हा गुरगुरणारा वाघ अलिकडील त्यांची वक्तव्ये पाहिल्यानंतर आता भाजपसमोर असहाय्य झाल्यासारखा वाटू लागल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात भाजप सर्वात मोठा पक्ष मानला जात असला, तरी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या बरोबरीने पाच जागांवर शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले होते. मंत्रिमंडळातही भाजप इतकीच खाती मिळण्याची अपेक्षा त्यामुळे शिंदे गट बाळगून होता. परंतु, भाजपकडून गिरीश महाजन आणि संजय सावकारे यांना संधी मिळाली. शिंदे गटाकडून एकमेव गुलाबराव पाटील यांना मंत्रीपद मिळाले. महाजन यांना जलसंपदा आणि पाटील यांना पाणी पुरवठा, अशी पाणीदार खाती दोघांना मिळाली. २०१९ च्या निवडणुकीत चौथ्यांदा विजयी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील तत्कालीन सरकारमध्ये गुलाबराव पाटील यांना पहिल्यांदा पाणीपुरवठा खाते मिळाले होते. २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली, त्याचे फळ म्हणून त्यांच्याकडे पाणीपुरवठा खाते कायम ठेवले गेले. २०२४ च्या निवडणुकीत पाचव्यांदा विजयी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये अपेक्षेनुसार पाटील यांच्याकडे तिसऱ्यांदा पाणीपुरवठा खाते आले.
जिल्ह्यातील शिंदे गटाचे पर्यायाने मंत्री पाटील यांचे वाढते प्रस्थ कमी करण्यासाठी सतत छुपे प्रयत्न होत असल्याचा भाजपवर आरोप होतो. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ज्या जागांवर शिंदे गटाचे उमेदवार उभे होते, त्या ठिकाणी भाजपने आपल्या पदाधिकाऱ्यांना बंडखोरी करायला लावली होती. खुद्द पाटील यांना जळगाव ग्रामीणमध्ये त्यामुळे घाम फुटला होता. २०२४ च्या निवडणुकीतही भाजप तोच कित्ता गिरविण्याची शक्यता असल्याने पाटील यांनी मंत्री महाजन यांना त्याबद्दल आधीच समज दिली होती. तरीही पाचोरा, पारोळा आणि चोपड्यात भाजप बंडखोर उभे राहिलेच. तेवढ्यापुरत्या पक्षातून निलंबित केलेल्या संबंधित बंडखोरांना भाजपने नंतर पक्षातही घेतले. तेवढ्यावरच न थांबता शिंदे गटाच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्या महाविकास आघाडीच्या लोकांना पक्षात घेण्यावर भाजपने अलिकडे भर दिला आहे.
शिंदे गटाने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत युती धर्म निभावला. मात्र, भाजपने आपल्या पक्षाचे खासदार, आमदार निवडून आणण्यासाठी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा सोयीस्कर वापर करून घेतल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांना जिंकून आणण्याची वेळ आल्यावर भाजप स्वबळाची भाषा करत आहे. त्यामुळे पायाखालची जमीन सरकलेल्या शिंदे गटात चांगलीच खळबळ उडाली आहे.
भाजप नेते आम्हाला जाहीरपणे युती करायची आहे, असे सांगतात. परंतु, एकांतात स्वबळाची भाषा बोलतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती होते, तशी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये का नाही ? युती झाली नाही तर कार्यकर्ते मरून जातील –गुलाबराव पाटील ( मंत्री, शिवसेना शिंदे गट)