पुणे : आगामी महापालिका निवडणुकीत ‘शत प्रतिशत भाजप’साठी अन्य पक्षांतील माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी दारे उघडी करणाऱ्या भाजपला आता पक्षांतर्गत विरोधामुळे काही काळासाठी ‘प्रवेश’द्वार बंद करण्याची वेळ आली आहे.

वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांच्या भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चेनंतर भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला आहे. पक्षाची शिस्त आणि महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी नाकारली जाण्याच्या भीतीपोटी आतापर्यंत कोणीच उघडपणे विरोधाची भूमिका घेतली नव्हती. मात्र, आता काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांना पत्र देऊन विरोध दर्शविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका जवळ आल्या असताना पक्षातील अंतर्गत बंडाळी टाळण्यासाठी काही काळासाठी भाजपने ‘प्रवेश’द्वार बंद केल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

महापालिकेवर एकहाती सत्ता मिळविण्यासाठी पुण्यात भाजपने तयारी सुरू केली आहे. भाजपसाठी अडचणीच्या असलेल्या प्रभागांमधील अन्य पक्षांतील लोकसंपर्क असलेले माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. काहींना प्रवेश देताना महापालिका निवडणुकांमध्ये उमेदवारी किंवा अन्य पद देण्यासाठी ‘शब्द’ही पक्षातील स्थानिक नेत्यांकडून देण्यात येत आहे. आगामी काळात त्यांचे पक्षप्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र यांच्या प्रवेशाच्या चर्चेनंतर भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला आहे. सुरेंद्र हे भाजपमध्ये प्रवेश करणार नसून, ही अफवा असल्याचे बापू पठारे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, त्यांच्या प्रवेशावरून भाजपमधील अंतर्गत खदखद बाहेर आली आहे.

भाजपने यापूर्वी अन्य पक्षांतील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिला आहे. त्यावरूनही भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. मात्र, उघडपणे विरोध करून पक्षाच्या शिस्तीला बाधा आणायची नाही, ही शिकवण मूळ भाजपच्या पदाधिकाना देण्यात आली असल्याने आतापर्यंत कोणीही जाहीरपणे विरोधाची भूमिका घेतलेली नव्हती, मात्र, पठारे यांच्या प्रवेशाच्या चर्चेनंतर भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

वडगाव शेरी विधानसभा मतदार संघ हा भाजपला साथ देणारा असला, तरी या उपनगरी भागात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य राहिले आहे. माजी आमदार जगदीश मुळीक यांनी या मतदार संघात भाजपचा पाया घट्ट केला असताना विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपात हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे गेल्याने मुळीक यांना डावलून माजी आमदार सुनील टिंगरे यांना उमेदवारी देण्यात आली.

या मतदार संघाची नव्याने निर्मिती झाल्यावर बापू पठारे हे २००९ मध्ये तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. २०१४ च्या निवडणुकीत मुळीक हे विजयी झाले होते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत टिंगरे यांनी त्यांचा पराभव केला. दरम्यानच्या काळात पठारे हे या मतदार संघापासून दूर होते. त्यांनी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. टिंगरे आणि मुळीक यांच्यात राजकीय वैर असल्याने ही संधी साधून २०२४ च्या निवडणुकीत पठारे यांनी ऐन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला आणि पुन्हा या मतदार संघातून आमदार झाले.

महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून निवडणूक लढविल्यास या मतदार संघातून यश मिळण्याची शक्यता कमी असल्याचे दिसू लागताच पठारे यांचे चिरंजीव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यावरून आता उघडपणे विराेध सुरू झाला आहे.

‘पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्या’

महापालिका निवडणुकीत पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी द्या, या मागणीचे पत्र पदाधिकाऱ्यांकडून मंडल अध्यक्षांना पाठविण्यास सुरुवात झाली आहे. भाजपच्या वडगावशेरी विधानसभा मतदार संघाच्या एका माजी सरचिटणीसांनी मंडल अध्यक्षांना पत्र देऊन निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी केली आहे. ‘आम्ही भारतीय जनता पक्षाचे वर्षानुवर्षे काम करीत आहोत. बऱ्याच दिवसांपासून या मतदारसंघात बाहेरील पक्षातील येणार असल्याचे ऐकायला मिळत आहे. महापालिका निवडणुकीत प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, ही कार्यकर्त्यांची सामूहिक भावना आहे, ‘ असे या पत्रात म्हटले आहे.