उमाकांत देशपांडे

मुंबई : इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे चांद्रयान मोहीमेतील अतुलनीय यश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची ही कामगिरी दोन गीतांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचविण्यात येणार आहे. भाजपचे माजी आमदार अतुल शहा यांच्या पुढाकाराने या गीतांची निर्मिती करण्यात आली असून त्यांचे प्रकाशन व प्रसारण प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते प्रदेश कार्यालयात करण्यात येणार आहे.

आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुका लक्षात घेता महाजनसंपर्काची मोहीम भाजपकडून राज्यभरात सुरू आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौर स्पर्धा, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी पहाट व अन्य कार्यक्रम आदींच्या माध्यमातून भाजपचा जनसंपर्क सुरू असतो. इस्त्रोने चांद्रयान मोहीमेत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यामुळे ती जनतेपर्यंत पोचविण्याचा आणि शास्त्रज्ञ व त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या पंतप्रधान मोदी यांचा गौरव या गीतांच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

हेही वाचा… कांदाप्रश्नी फडणवीसांची जपानहून मुंडेंवर बाजी!

चांद्रयानाने १४ जुलै २०२३ रोजी श्रीहरीकोटावरून उड्डाण केले आणि ते २३ ऑगस्टला चंद्रावर उतरण्याचे जाहीर झाले होते. भारत-चंद्र मैत्रीचा हा सुवर्णक्षण आहे. तो भारतीयांच्या मनात रुजविण्याची या गाण्यांची संकल्पना आहे, असे शहा यांनी ‘ लोकसत्ता ‘ ला सांगितले. गीतरचना मोहन सामंत यांची असून संगीतकार दत्ता थिटे आणि निर्माती-संकल्पना शहा यांची आहे. हे गीत मराठीत डॉ. राहुल जोशी आणि आशिष देशमुख यांनी गायले आहे. हिंदी गीत प्रशांत वैद्य यांनी लिहून गायले आहे. या गीतात इस्रो शास्त्रज्ञ आणि पंतप्रधान मोदी यांच्या अभियानाचा जयघोष आहे. त्याचबरोबर अंतराळ युगाचे शिल्पकार विक्रम साराभाई आणि सतीश धवन यांचा जयघोष आहे, असे शहा यांनी नमूद केले.

हेही वाचा… पेण बँक घोटाळ्यातील आरोपी शिशिर धारकरांच्या प्रवेशाचा ठाकरे गटाला फायदा किती?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोना लसीकरण आणि घरोघरी तिरंगा मोहीमेबाबतही गाणी तयार करून शहा यांनी ती लोकांपर्यंत पोचविली होती.