काँग्रेसचे नेते सचिन पायलट गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करण्यावरून पायलट आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यात वाद सरू आहे. याच वादामुळे सचिन पायलट भविष्यात काँग्रेस पक्षाचा त्याग करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. असे असले तरी भाजपाने त्यांच्याविरोधात अद्याप सौम्य धोरण अवलंबलेले नाही. भाजपा पक्षातील नेते पायलट यांच्यावर टीका करताना दिसतात. तर पायलट हेदेखील भाजपाच्या नेत्यांना जशास तसे उत्तर देत आहेत. नुकतेच त्यांनी भाजपाच्या आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनी केलेला दावा खोटा आणि निराधार आहे, असे म्हटले आहे.

अमित मालवीय यांनी नेमका काय दावा केला?

मार्च १९६६ मध्ये मणिपूरमधील ऐझावल या शहरावर बॉम्बहल्ले करण्यात आले. ज्या विमानांनी या भागावर बॉम्ब टाकण्यात आले, त्यातील एक विमान सचिन पायलट यांचे दिवंगत वडील राजेश पायलट चालवत होते, असा दावा अमित मालवीय यांनी ट्वीटद्वारे केला. “मिझोरमची राजधानी असलेल्या ऐझावल येथे ५ मार्च १९६६ रोजी हवाईहल्ले करण्यात आले होते. या हल्ल्यादरम्यान राजेश पायलट आणि सुरेश कलमाडी हे भारतीय हवाई दलाचे विमान चालवत होते. त्यांनीदेखील ऐझावल या प्रदेशावर हवाईहल्ले केले. पुढे इंदिरा गांधी यांनी त्यांच्या या कामगिरीची सन्मान केला. ज्यांनी आपल्याच लोकांवर हवाई हल्ले केले, त्यांना पुढे काँग्रेसने मंत्रिपदं दिली,” असा गंभीर आरोप अमित मालवीय यांनी केला.

सचिन पायलट यांनी सादर केला पुरावा

अमित मालवीय यांचा हा आरोप खोटा असल्याचे सचिन पायलट यांनी सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी आपले पिता राजेश पायलट यांचे नियुक्तीपत्र ट्वीट केले आहे. तसेच मालवीय यांनी केलेला दावा हा खोटा आणि निराधार असल्याचे सचिन पायलट म्हणाले आहेत. “अमित मालवीय तुम्ही चुकीचा दावा केला आहे. माझे वडील हे हवाई दलवात पायलट होते. त्यांनी कर्तव्यावर असताना जरूर हवाई हल्ले केले. बॉम्बगोळे टाकले. मात्र १९७१ साली त्यांनी भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ही कामगिरी केली होती. त्यांन ५ मार्च १९६६ रोजी मिझोरम राज्यात हवाई हल्ले केले नव्हते. कारण २९ ऑक्टोबर १९६६ रोजी ते हवाई दलात रुजू झाले होते,” असे सचिन पायलट यांनी ट्वीटद्वारे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदी यांच्याकडून काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न

दरम्यान, अविश्वास ठरवादरम्यानही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐझावल येथे १९६६ साली केलेल्या बॉम्बहल्ल्याचा उल्लेख केला होता. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय सैन्याने स्वत:च्याच प्रदेशावर हल्ले केले होते, असे म्हणत मोदी यांनी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला होता.