Latest News on Maharashtra Politics Today : राज्यात आगामी काळात मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांनी अधिकच जोर धरला आहे. यादरम्यान, भाजपाच्या नेत्या व अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला आहे. “बाळासाहेब ठाकरे यांचे जेव्हा निधन झाले, तेव्हा राज आणि उद्धव हे एकत्र आले असते तर त्यांच्या विचारधारेचा संदेश समाजात गेला असता, पण तसे न करता ते आज एकत्र येत असल्याने त्यातून एकच स्वार्थ दिसत आहे”, अशी टीका नवनीत राणा यांनी केली.
“परिवार एकत्र येणे ही आपली संस्कृती असून ती आपण जपली पाहिजे. पण आज दोघे बंधू फक्त सत्ता आणि खुर्चीसाठी एकत्र येत आहेत. ठाकरे परिवार हे मजबुरीचे नाव झालेले आहे”, असेही त्या म्हणाल्या. यापूर्वीही नवनीत राणा यांनी ‘मजबुरी का नाम ठाकरे परिवार’ याच दृष्टीने या दोन्ही नेत्यांकडे बघितले जात असल्याची टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता मनसे आणि ठाकरे गटाचे नेते कसे उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
संजय राऊतांना महेश कोठारेना
दिग्दर्शक आणि ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांनी सोमवारी एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले. मी मोदीजींचा आणि भाजपाचा भक्त आहे, असे विधानही त्यांनी यावेळी केले. इतकेच नव्हे तर मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाचेच कमळ फुलणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. यादरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांन महेश कोठारे यांना सल्ला दिला. “महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना? मला शंका वाटते. प्रत्येकाला आपापले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, पण तुम्ही कलाकार आहात आणि तुमचे चित्रपट फक्त भारतीय जनता पार्टीच्याच लोकांनी बघितले नाहीत”, असे राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, महेश कोठारे यांनी याआधीही अंबरनाथमधील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचे कौतुक केले होते, त्यावेळी ठाकरे गटातील काही नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती.
मनोज जरांगे पाटील यांची भुजबळांवर टीका
मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या आधारे जातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी महायुतीने सरकारने काही महिन्यांपूर्वी शासकीय अध्यादेश लागू केला. या अध्यादेशात हैदराबाद गॅझेटच्या अधिसूचनेचाही समावेश आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला असून ते जीआर रद्द करण्याची सातत्याने मागणी करीत आहेत. त्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त करीत भुजबळ यांना लक्ष्य केले आहे. “हैदराबाद गॅझेटसंदर्भातील जीआर आता कुणीही रद्द करू शकत नाही. मराठवाड्यातील सर्व मराठा बांधवांना कुणबी नोंदीच्या आधारे आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. भुजबळ हे फक्त जातीय भेदभाव पसरवत आहेत. त्यांनी बीडमधील घेतलेल्या महाएल्गार सभेला कुणीही प्रतिसाद दिलेला नाही. त्याउलट आमच्या घोंगडी बैठकीला उभे राहायला सुद्धा जागा नव्हती”, असा टोला जरांगे यांनी लगावला आहे. छगन भुजबळ हे दिवाळीतला ठुसकी फटाका असल्याचेही जरांगे यांनी म्हटले आहे.
हजारो पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ
गेल्या वर्षभरात तब्बल १२ हजार ४३१ पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. दी इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भात दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जावर उत्तर देताना सरकारकडून ही माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे लाभार्थी पुरुषांकडून अद्याप पैशांच्या वसुलीसंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले आहे. राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सरकारकडून या सर्व लाभार्थी पुरुषांची नावे हटवण्यात आली आहे. त्याचबरोबर एकूण ७७ हजार ९८० अपात्र महिला लाभार्थ्यांनाही यादीतून वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे या पुरुष व महिला लाभार्थ्यांनी गैरव्यवहार करून अनुक्रमे १२ व १३ महिने योजनेचा लाभ पदरात पाडून घेतल्याचं स्पष्ट झाले आहे. म्हणजेच, जवळपास वर्षभर दर महिन्याला मिळणारे १५०० रुपये या अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होत होते. यातून सरकारी तिजोरीला पुरुष लाभार्थ्यांसाठी २४.२४ कोटी तर अपात्र महिला लाभार्थ्यांमुळे १४०.२८ कोटींचा भुर्दंड बसला आहे.
प्रशांत किशोर यांचा भाजपावर गंभीर आरोप
बिहारमध्ये पुढील महिन्यात दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. यापार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आपापल्या प्रचाराची तयारी सुरू केली आहे. यादरम्यान, जनसुराजचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांनी भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपातील काही नेते त्यांच्या पक्षातील अनेक उमेदवारांना धमकावून किंवा विविध प्रलोभणे देऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्यास दबाव टाकत असल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी दानापूर मतदारसंघाचा उल्लेख करत एक फोटो शेअर केला आहे. “आमचे उमेदवार अखिलेश शाह निवडणूक कार्यालयापर्यंत पोहोचू शकले नाही. आरजेडीचे उमेदवार रित लाल यादव यांनी त्यांचे अपहरण केले असं सांगण्यात आले परंतु त्यांचे अपहरण झाले नाही तर उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी ते गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बसलेले होते. गृहमंत्र्यांनी सत्तेचा गैरवापर करून त्यांना बसवून ठेवले जेणेकरून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करू नये”, असा गंभीर आरोप किशोर यांनी केला आहे. दरम्यान, भाजपाकडून या आरोपांना कसे प्रत्युत्तर दिले जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.