BJP MP Medha Kulkarni Shaniwarwada Controversy : दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर भाजपाच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी समाजात द्वेष पसरवल्याचा आरोप विरोधी पक्षांसह काही सामाजिक संघटनांनी केला आहे. पुण्यातील शनिवार वाड्यात शुद्धीकरण केल्याच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी कुलकर्णी यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. विशेष बाब म्हणजे, महायुतीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत सापडले असून सत्ताधाऱ्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हे प्रकरण नेमके आहे तरी काय? पुण्यातील शनिवार वाड्यात काय घडले? त्या संदर्भातील हा आढावा…
शनिवार वाड्यात काय घडले?
पुणे शहरातील ऐतिहासिक शनिवार वाड्यात मुस्लीम महिला सामूहिक नमाज पठण करीत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला. भाजपाच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी हा व्हिडीओ शेअर केला. या घटनेचा काही हिंदू संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त करून परिसरात आंदोलन केले. इतकेच नाही तर शनिवार वाड्याला लागून असलेली कबर काढून टाकण्याची मागणीही त्यांनी केली. या आंदोलनात स्वत: खासदार मेधा कुलकर्णी सहभागी झाल्या होत्या. त्यांनी सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास असंख्य हिंदुत्ववादी संघटनेतील कार्यकर्त्यांसह शनिवार वाड्यात प्रवेश केला. मुस्लीम महिलांनी ज्या ठिकाणी नमाज पठण केले होते, त्या जागेचे त्यांनी गोमूत्र शिंपडून आणि शेणाने सारवून शुद्धीकरण केले.
मेधा कुलकर्णी नेमकं काय म्हणाल्या?
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “शनिवार वाडा ही ऐतिहासिक वास्तू असून या ठिकाणी मुस्लीम महिलांनी नमाज पठण करणे ही निषेधार्ह बाब आहे. तुम्हाला जर नमाज पठण करायचे असेल तर घरी जाऊन करावे, यापुढील काळात असे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. या ठिकाणी नमाज पठण करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करायला हवी. तसेच या शनिवार वाड्याला लागून असलेली कबरही काढून टाकण्यात यावी, अन्यथा आम्ही येत्या कालावधीत आमच्या स्टाईलने ती कबर काढून टाकू”, असे कुलकर्णी म्हणाल्या.
इतक्यावरच न थांबता, “जर मुस्लिमांना शनिवार वाड्यासारख्या ऐतिहासिक ठिकाणी नमाज अदा करण्याची परवानगी असेल, तर हिंदूंनाही मशिदींमध्ये आरती करण्याची परवानगी दिली पाहिजे,” असे विधानही मेधा कुलकर्णी यांनी केले. दरम्यान, भाजपा खासदाराच्या या विधानामुळे ऐन दिवाळीच्या सणात पुण्यात राजकीय वादंग निर्माण झाला. विरोधी पक्षातील नेत्यांनी याच मुद्द्याला हाताशी धरून महायुती सरकारला लक्ष्य केले. मेधा कुलकर्णी यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काही सामाजिक संघटनांनी केली. विशेष बाब म्हणजे, राजीनाम्याच्या मागणीसाठी महायुतीतील घटकपक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले.
भाजपा जातीय तेढ पसरवतंय – काँग्रेसचा आरोप
शनिवार वाड्यात शुद्धीकरण केल्याप्रकरणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “सध्या मराठवाड्यातील शेतकरी पूरामुळे मोठ्या संकटात सापडले असताना त्यांना मदत करण्याची गरज आहे. अशा वेळी खासदार कुलकर्णी या समाजात जातीय द्वेष पसरवून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत,” अशी टीका लोंढे यांनी केली. “शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांकडे दिवाळी साजरी करण्यासाठी पैसे नाहीत. राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजनादेखील थांबवली आहे. सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नाहीये… हिंदू जेव्हा दिवाळी साजरी करतात, तेव्हा ते आपल्या बांधवांमध्ये आनंद वाटतात; पण भाजपाच्या खासदार मात्र द्वेष वाटत आहेत. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या हितासाठी लढायला हवे, त्याच्या विरोधात नाही”, असे म्हणत लोंढे यांनी मेधा कुलकर्णी यांच्या राजीनाम्याची मागणी जोरकसपणे मांडली.
आम आदमी पार्टीने केला शुद्धीकरणाचा निषेध
आम आदमी पक्षाचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनीही भाजपाच्या राज्यसभा खासदारावर टीका केली. मेधा कुलकर्णी यांनी दिल्लीत बसलेल्या त्यांच्या मालकाला खूश करण्यासाठी हे कृत्य केल्याचा आरोप किर्दत यांनी केला. “मेधा कुलकर्णी यांना जनविरोधी कार्यात गुंतून राहायचे असेल, तर त्यांनी खासदारपदाचा राजीनामा द्यावा आणि सकल हिंदू समाजासाठी काम करावे. कोणत्याही पक्षाचा खासदार हा संसदेत समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करतो; पण कुलकर्णी या आपली जबाबदारी विसरलेल्या दिसून येत आहेत,” अशी टीकाही किर्दत यांनी केली.
‘मस्तानी’वरून कुलकर्णींवर निशाणा
सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनीही इतिहासाचा संदर्भत देत मेधा कुलकर्णी यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, “मेधा कुलकर्णी यांनी गेल्या आठवड्यात शनिवार वाड्यात जाऊन नमाज पठण केलेल्या जागेचे शुद्धीकरण केले. त्यांना मी सांगू इच्छितो की, बाजीराव पेशवे शनिवार वाड्यात मस्तानीला घेऊन येत असत. इतिहास वाचला तर मस्तानी ही मुस्लीम महिला शनिवार वाड्यात राहायला होती. मग मेधा कुलकर्णी काय संपूर्ण शनिवार वाड्याचे शुद्धीकरण करणार आहेत का?” कांबळे यांनी कुलकर्णी यांच्या कृतीला अत्यंत निंदनीय ठरवले. “राज्यसभा खासदार होण्याची कुलकर्णी यांची पात्रता नाही. त्या स्वतःहून राजीनामाही देणार नाहीत, पुणेकरांनीच त्यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडले पाहिजे,” अशी खोचक टीकाही कांबळे यांनी केली.
हेही वाचा : Satyendra Sah Arrested : उमेदवारी अर्ज दाखल करताच आरजेडीच्या उमेदवाराला अटक; कारण काय? बिहारमध्ये काय घडतंय?
विश्वंभर चौधरी यांची भाजपावर टीका
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनीही मेधा कुलकर्णी यांच्या कृतीवरून भाजपाला लक्ष्य केले. “सध्या पुण्यातील नागरिक वाहतूक कोंडी, साचलेला कचरा, वाढती गुन्हेगारी आणि टोळक्यांच्या धुमाकुळामुळे त्रस्त आहेत, पण भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी शनिवार वाड्याचे शुद्धीकरण करण्यात व्यस्त आहेत. त्या प्रत्येक कोपऱ्यात ‘हिरव्या’ रंगाचा शोध घेतात आणि तो ‘भगव्या’ रंगाने झाकण्याचा प्रयत्न करतात, हेच त्यांचं सर्वात मोठं यश आहे”, अशी टीका चौधरी यांनी केली. पुण्यातील भाजपाचे दुसरे खासदार आणि मंत्री मुरलीधर मोहोळ हेदेखील बांधकाम व्यावसायिकांना मोक्याची जमीन मिळवून देण्यात व्यस्त असल्याचे चौधरी म्हणाले.
नमाज पठणावरून महायुतीतच जुंपली
मेधा कुलकर्णी यांच्या शनिवार वाड्यातील आंदोलनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनीही सोमवारी आंदोलन केले. या आंदोलनात हिंदु, मुस्लीम, ख्रिश्चन समाजातील नागरिकही सहभागी झाले होते. “शनिवार वाडा परिसरात येऊन खासदार मेधा कुलकर्णी यांनी स्टंटबाजी केली. त्या विरोधात आम्ही निषेध आंदोलन करीत आहोत. मेधा कुलकर्णी या एक जबाबदार लोकप्रतिनिधी असून त्यांनी दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे कुलकर्णी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी रुपाली ठोंबरे यांनी केली आहे.