BJP Mla Aditi Singh Warning : २०१४ मध्ये देशात आलेल्या मोदी लाटेनंतर भाजपाने केंद्रासह अनेक राज्यांत सत्तास्थापना केली. यादरम्यान काँग्रेसमधील बहुतांश आमदारांनी पक्षाची साथ सोडून भाजपाची कास धरली. मात्र, आता हेच आमदार भाजपावर टीका करताना दिसून येत आहे. उत्तर प्रदेशमधील रायबरेली मतदारसंघाच्या भाजपाच्या आमदार अदिती सिंह यांनी सरकारी अधिकाऱ्यांना टीका करताना पक्षातील एका नेत्यालाही लक्ष्य केले आहे. अतिक्रमण विरोधी मोहिमेचा निषेध करणाऱ्या दुकानदारांना आणि पत्रकारांना भाजपातील एका नेत्याकडून धमकावले जात असल्याचा आरोप अदिती यांनी केला आहे. इतकेच नाही तर असे कृत्य करणाऱ्यांना आम्ही जोड्याने मारू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

अदिती रायबरेलीतील भाजपाच्या एकमेव आमदार

रायबरेली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातील पाच विधानसभा क्षेत्रांपैकी अदिती सिंह या भाजपाच्या एकमेव भाजपा आमदार आहेत. ३७ वर्षीय अदिती यांनी २०१७ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा विधानसभेत विजय मिळवला होता. त्यानंतर काँग्रेसची साथ सोडून त्यांनी भाजपाचे कमळ हाती घेतले आणि २०२२ मध्ये पुन्हा रायबरेली विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. अदिती सिंह या माजी आमदार अखिलेश सिंह यांच्या कन्या आहेत. अखिलेश सिंह हे रायबरेलीतील बलाढ्य नेते मानले जातात. त्यांनी या मतदारसंघातून सलग पाचवेळा विजय मिळवला होता. काँग्रेसच्या तिकिटावर तीनवेळा तर अपक्ष म्हणून दोनवेळा ते निवडून आले होते.

२०१९ मध्ये अदिती यांच्या ताफ्यावर झाला होता हल्ला

अदिती यांनी अमेरिकेतील ड्युक विद्यापीठातून व्यवस्थापन अभ्यासातील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. २०१७ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेतील त्या सर्वात तरुण आमदार ठरल्या होत्या. मे २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रायबरेलीत अदिती यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यामागे भाजपाचे तत्कालीन उमेदवार दिनेश प्रताप सिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यासंदर्भात पोलिस ठाण्यात एफआयआरही दाखल करण्यात आला होता.

आणखी वाचा : Sardar Patel AI Holobox : RSS वरील बंदी ते गांधींबरोबरचे संबंध, सरदार पटेलांचा होलोबॉक्स देतो क्लिष्ट प्रश्नांची उत्तरं; नेमकं काय आहे तंत्रज्ञान?

कलम ३७० हटवण्याला दिला होता पाठिंबा

ऑगस्ट २०१९ मध्ये अदिती सिंह यांनी मोदी सरकारच्या कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला आणि काँग्रेसविरोधी भूमिका घेतली. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये काँग्रेसने बहिष्कार घातलेल्या ३६ तासांच्या विशेष विधानसभा अधिवेशनातही त्या सामील झाल्या होत्या. त्यावेळी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे फक्त सातच आमदार निवडून आलेले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यानंतर सरकारने अदिती यांना लगेचच वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली होती. त्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून कारणे दाखवा नोटीस बजावली होती. रायबरेलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलने केली आणि त्या भाजपाच्या प्रभावाखाली असल्याचा आरोप केला होता.

bjp mla aditi singh
रायबरेली मतदारसंघाच्या भाजपाच्या आमदार अदिती सिंह

काँग्रेसने दाखवली होती कारणे दाखवा नोटीस

नोव्हेंबर २०१९ मध्ये काँग्रेसने अदिती सिंह यांची आमदारकी रद्द करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे अर्ज केला होता. मात्र, अध्यक्षांनी त्यांचा हा अर्ज फेटाळून लावला होता. दरम्यान, २०२२ मध्ये अदिती यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केला आणि रायबरेली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवाराचा सात हजारांहून अधिक मताधिक्क्याने पराभव केला. २०२४ मध्ये एका अज्ञात व्यक्तीला धमकावताना अदिती यांचा ऑडिओ कॉल व्हायरल झाला होता.

हेही वाचा : पक्षाच्या गाण्यावरून वाद झाल्यानंतर, आरएलडीचा ‘करेक्ट कार्यक्रम’; मित्रपक्षाच्या नेत्यापुढे नरमले भाजपाचे नेते!

अदिती यांनी भाजपाच्या माजी आमदार काय आरोप केले?

सध्याच्या प्रकरणात त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर लाचखोरीचा आरोप केला आहे. रायबरेलीत सरकारी कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू केली आहे. यादरम्यान रस्त्यावरील विक्रेते, दुकानदारांना अधिकारी लाच मागत असल्याचा आरोप अदिती यांनी केला. इतकंच नाही तर या प्रकरणामध्ये एका लोकप्रतिनिधीचा हात असल्याचेही त्यांनी म्हटले. अदिती यांच्या या टिप्पणीचा रोख भाजपाचे माजी आमदार राकेश सिंह यांच्यावर असल्याचे मानले जात आहे. पक्षातील एका नेत्यावरच त्यांनी आरोप केल्याने भाजपामध्ये अस्वस्थता वाढली आहे.

अदिती सिंह भाजपाला डोईजड?

राकेश यांचे मोठे बंधू दिनेश सिंह हे सध्या भाजपाच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. भाजपामधील इतर नेत्यांकडूनही अदिती यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांना समज द्यावी अन्यथा थेट पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी काही नेत्यांनी केल्याची माहिती आहे, त्यामुळे काँग्रेसमधून पक्षात आलेल्या आमदार अदिती भाजपाला डोईजड होत असल्याचे सांगितले जात आहे. पक्षातील नेत्यांविरोधात विधाने करणाऱ्या अदिती यांना लवकरच समज दिली जाईल, असे भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.