पिंपरी : मावळमध्ये विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्येच झालेल्या आणि गाजलेल्या ‘मावळ पॅटर्न’नंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजपमध्ये जुंपली आहे. ‘राष्ट्रवादी’च्या काही पदाधिकाऱ्यांच्या भाजपमधील प्रवेशावरून आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे.

भेगडे यांना तालुक्यातील वातावरण दूषित करून गावा-गावांत भांडणे लावायची असल्याचा आरोप आमदार शेळके यांनी केला आहे, तर तालुक्यात शांतता आहे, म्हणणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे, अशी टीका भेगडे यांनी केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे शाब्दिक युद्ध कोणते वळण घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मावळमध्ये २५ वर्षे भाजपाचे आमदार होते. त्यामुळे मावळ भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, २०१९ मध्ये भाजपमध्ये बंडखोरी झाली. उमेदवारी नाकारल्याने सुनील शेळके यांनी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांना पराभूत केले. तेव्हापासून आमदार शेळके आणि मावळ भाजपमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष सुरू झाला. अजित पवारांची ‘राष्ट्रवादी’ भाजपसोबत आली असली, तरी मावळमध्ये स्थानिक पातळीवर संघर्ष कमी झालेला नाही. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीत मावळची जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला देण्यात आली. विद्यमान आमदार सुनील शेळके यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्याने या पक्षात बंडखोरी झाली. उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे तत्कालीन प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी बंडखोरी केली. भेगडे यांना मावळ भाजपसह महाविकास आघाडी, मनसेने जाहीर पाठिंबा देत ‘मावळ पॅटर्न’ उदयास आणला.

भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी प्रदेश उपाध्यक्ष, गणेश भेगडे यांनी किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, पक्ष सदस्यत्व कायम होते. ते बापू भेगडे यांच्या प्रचारात सक्रिय झाले. पण, भाजपने त्यांच्यावर कारवाई केली नाही. त्यामुळे मावळची निवडणूक गाजली होती. सर्व विरोधक एकवटल्यानंतरही शेळके हे लाखभर मतांनी निवडून आले. आता बाळा भेगडे हे पुन्हा भाजपमध्ये सक्रिय झाले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावरून पुन्हा आमदार शेळके आणि माजी आमदार भेगडे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

या पक्ष प्रवेशाची खिल्ली उडवत आमदार सुनील शेळके म्हणाले, ‘मावळमध्ये दहा महिन्यांपासून खेळीमेळीचे वातावरण आहे. असे वातावरण रहावे यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे. परंतु, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, गणेश भेगडे यांना तालुक्यातील वातावरण दूषित करायचे आहे. गावा-गावांत भांडणे लावायची आहे. अडचणीत सरकारचा आसरा मिळण्यासाठी काहींनी प्रवेश केला आहे. ज्यांना आम्ही उमेदवारी देऊ शकत नाही, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मावळात भारतीय जनता नव्हे भेगडे जनता पार्टी असल्याचे बाळा भेगडे यांनी सिद्ध करुन दाखविले. बापू भेगडे यांच्याबाबत अजित पवार जो निर्णय घेतील, तो मला मान्य राहील, असेही शेळके यांनी स्पष्ट केले.

आमदार शेळके यांच्या टीकेवर माजी आमदार बाळा भेगडे म्हणाले, ‘आमदार सुनील शेळकेही भेगडे जनता पार्टीचेच बाळकडू घेऊन राजकारणात मोठे झाले, हे विसरले का? त्यावेळी भेगडे जनता पार्टी चालत होती. ते राष्ट्रवादीत गेले होते. त्यावेळी त्यांचे स्वागतही भेगडे कुटुंबातील सदस्यांनीच केले. मावळमध्ये २५ वर्षे भाजपचा आमदार होता. कधीही एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन तालुक्यात राजकारण झाले नाही. तेवढे मागील सहा वर्षांत मावळमध्ये झाले. तालुक्यात शांतता आहे, म्हणणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे. काय चुका केल्या आहेत, त्यामुळे तालुका अशांत झाला आहे, याचा विचार करावा. मावळमध्ये शेळके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे का?

‘मावळ पॅटर्न’मध्ये फूट?

‘मावळ पॅटर्न’मधील सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. ज्यांच्यासाठी ‘मावळ पॅटर्न’ उदयास आला त्या बापू भेगडे यांचाही प्रवेश सध्यातरी भाजपमध्ये झालेला नाही. पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बबन भेगडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्या आदेशानुसार ‘राष्ट्रवादी’त काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ‘मावळ पॅटर्न’मध्ये फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.