पुढील वर्षी होणाऱ्या महत्त्वाच्या बंगाल निवडणुकीपूर्वी भाजपा तयारीला लागली आहे. पक्षाच्या अंतर्गत मोठे फेरबदल केले जात आहेत. संघटनात्मक रचनेत बदल केले जात असून राज्यस्तराव नियुक्त्या केल्या जात आहेत. लवकरच भाजपा पुढील प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा करणार आहे. २०२४ च्या लोकसभा निकालांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल भाजपामध्ये धोरणात्मक बदल केले जाण्याची शक्यता आहे. नेमके कोणते बदल करण्यात येणार आहेत? आगामी निवडणुकांसाठी भाजपा काय तयारी करत आहे? त्याविषयी जाणून घेऊयात.

फेरबदलाचे कारण काय?

  • २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये भाजपाच्या जागांमध्ये घट पाहायला मिळाली.
  • असे असले तरी वरिष्ठ केंद्रीय नेते या निकालाला संधी म्हणून पाहत आहेत.
  • भाजपातील सूत्रांनी सांगितले की, पक्षांतर्गत बदल करण्यात येणार आहे आणि त्याचा परिणाम लवकरच दिसून येईल.
  • “२०२१ मध्ये पक्षाने ७७ विधानसभा जागा जिंकल्या होत्या.
  • गेल्या वर्षीच्या मतमोजणीत नेत्यांना एक पॅटर्न लक्षात आला आहे.
  • अनेक ठिकाणी आम्ही फक्त ३,००० ते ४,००० किंवा त्याहूनही कमी मतांनी हरलो आहे, हा पराभव नाही,” असे पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने ‘न्यूज १८’ला सांगितले.
अलीकडेच अमित शाह यांनी पश्चिम बंगाल दौऱ्यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

पुढील काही आठवड्यात, भाजपा बंगालसाठी नवीन प्रदेशाध्यक्षांची घोषणा करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यासाठी नावाचा निर्णय काही दिवसांत घेतला जाईल. सार्वत्रिक निवडणुकीनंतर भाजपाच्या बंगाल युनिटने नियोजन सुरू केले असून बूथस्तरीय प्रचार, ग्रामीण भागातील धर्म व जातीचे समीकरण आणि शहरी मतदारसंघांच्या बाबतीत मतदानाचे मॅपिंग केले जात आहे.

आगामी निवडणुकांसाठी भाजपाची पूर्वतयारी

सर्वात आधी पक्ष आपल्या विद्यमान मतदानाचा आधार मजबूत करेल. त्यासाठी सीमावर्ती जिल्हे आणि आदिवासी पट्ट्यांमध्ये दिसणाऱ्या हिंदूंच्या एकत्रीकरणावर लक्ष्य केंद्रित केले जात आहे, असे वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले आहे आणि याला भाजपाची रणनीती म्हटले आहे. तसेच भाजपा आता शहरी आणि निमशहरी मतदारसंघांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या पारंपरिक मतपेढ्यांनाही स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. २०२४ मध्ये त्या मतदारसंघातील भाजपाच्या मतदानाचा वाटा वाढला होता, असे ते म्हणाले. वरिष्ठ पदाधिकाऱ्याने पुढे सांगितले, “हे आमचे प्राथमिक आव्हान आहे. आम्ही आता त्या १४३ मतदारसंघांमध्ये काही हजारांनी मते वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.”

वरिष्ठ नेते त्या दिशेने काम करत आहेत. विशेषतः धार्मिक आणि सांस्कृतिक एकत्रीकरणाकडे लक्ष केंद्रित केले जात आहे. मंदिरांना भेटी देणे, रामनवमीवर लक्ष केंद्रित करणे आणि शाखा व स्थानिकांच्या सहाय्याने कार्यक्रम आयोजित करून तळागळातील लोकांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका भाजपा नेत्याने यावर म्हटले, “आम्ही २०२४ ला शेवट म्हणून पाहत नाही. आम्ही आमच्या लक्षाच्या किती जवळ पोहोचलो ही त्याची झलक आहे.” केंद्रीय नेतृत्वदेखील पश्चिम बंगालच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ते राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय संघांमधील समन्वय आणि तरुण नेतृत्वाचा समावेश यासाठी प्रयत्न करत आहेत. जर भाजपाचे अंतर्गत गणित बरोबर राहिले तर प्रत्येक विभागात त्यांची हजार मते वाढण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमित शाहांचा दौरा

अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे वरीष्ठ केंद्रीय नेते अमित शाह यांनी रविवारी पश्चिम बंगालचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. त्यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत भाष्य केल्यावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनाही लक्ष्य केले होते. या दौऱ्यावेळी अमित शाह यांनी भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली होती आणि ही बैठक ‘ऑपरेशन बंगाल’चा भाग असल्याचेही बोलले जात होते. त्या बैठकीत बंगालच्या प्रदेशाध्यक्षांनाच आमंत्रित केले नसल्याने वादही निर्माण झाला होता.