BJP New Woman President : भारतीय जनता पक्षात संघटनात्मक फेरबदल करण्यात येत आहेत. विविध राज्यातील प्रदेशाध्यक्षांच्या निवडी देखील नुकत्याच करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. दरम्यान, आता लवकरच भाजपाला नवे राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा आहे. खरं तर भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीला विलंब झाल्याचं बोललं जात आहे. पण पुढच्या काही दिवसांत भाजपाला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी भाजपाला महिला राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.
भाजपाला पहिल्यांदा महिला राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकते असं बोललं जात आहे. या संदर्भातील वृत्त सूत्रांच्या हवाल्याने हिंदुस्थान टाईम्सने दिलं आहे. देशभरातील अनेक राज्यात भाजपाला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळाले आहेत, तसेच अनेक ठिकाणी नवीन कार्यकारिणी देखील तयार करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीत नवीन कार्यकारिणी महत्वाची ठरण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, भाजपाला पहिली महिला राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा असली तरी या पदासाठी नेमकी कोणाची नावे शर्यतीत आहेत? याविषयीची माहिती देखील समोर आली आहे.
भारतीय जनता पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी २०२० पासून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवलं आहे. त्यांचा कार्यकाळ २०२३ मध्ये संपला. मात्र, भाजपाने त्यांचा कार्यकाळ २०२४ पर्यंत वाढवला होता, जेणेकरून त्यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढवली जाईल. आता भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद कोण भूषावेल याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. पण समोर आलेल्या वृत्तानुसार अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह आणखी दोन नावांची चर्चा सुरु आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर नेमकी कोणाच्या नावे चर्चेत आहेत? याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात.
निर्मला सीतारमण
भाजपा नेत्या निर्मला सीतारमण या केंद्रांत २०१९ पासून अर्थमंत्री आहेत. भाजपातील सर्वात प्रभावशाली महिला नेत्यांपैकी एक म्हणून निर्मला सीतारमण यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे त्यांच्याकडे भाजपा अध्यक्षपदाच्या दावेदारांपैकी एक म्हणून पाहिलं जात आहे. दक्षिणेत पक्ष संघटनेतील घसरण पाहता सीतारमण यांची निवड तामिळनाडूमध्ये भाजपासाठी फायदेशीर ठरू शकते. या चर्चा सुरु असतानाच निर्मला सीतारमण यांनी नुकतीच पक्षाच्या मुख्यालयात जेपी नड्डा आणि भाजपाचे सरचिटणीस बीएल संतोष यांची भेट घेतली आहे.
डी.पुरंदेश्वरी
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी डी.पुरंदेश्वरी यांच्या नावाची देखील चर्चा आहे. आंध्र प्रदेश भाजपाच्या माजी अध्यक्षा डी पुरंदेश्वरी या एक अतिशय अनुभवी नेत्या आहेत. त्यांना मोठा राजकीय अनुभव आहे. तसेच डी.पुरंदेश्वरी या युनायटेड किंग्डम, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि डेन्मार्कमध्ये ऑपरेशन सिंदूर शिष्टमंडळात देखील सहभागी होत्या.
वनथी श्रीनिवासन
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी वनथी श्रीनिवासन यांच्याही नावाची चर्चा सुरु आहे. वनथी श्रीनिवासन यांनी भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. वनथी श्रीनिवासन या तामिळनाडूच्या कोइम्बतूर दक्षिण मतदारसंघाच्या आमदार आहेत. तसेच त्यांनी कमल हासन यांचा पराभव केलेला आहे. त्या १९९३ पासून भाजपात कार्यरत आहेत. तसेच भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या त्या सदस्या देखील आहेत.