अमरावती : गेल्‍या विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्‍ह्यात केवळ एक जागा जिंकता आली, याचे शल्‍य बाळगत असताना आता भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालवली आहे. तीन राज्‍यांमध्‍ये भाजपला मिळालेल्‍या यशामुळे भाजपचे कार्यकर्ते चांगलेच सुखावलेले आहेत. आता भाजपसमोर जनाधार वाढविण्‍याचे आव्‍हान आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्‍या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती असताना अन्य जिल्‍ह्यांमध्‍ये युतीला चांगले यश मिळाले, पण अमरावती जिल्‍ह्यात मात्र हादरा बसला होता. भाजपला केवळ धामणगाव रेल्‍वे या मतदारसंघात विजय मिळाला. शिवसेनेला तर एकही जागा मिळाली नाही. भाजपला अमरावतीसह दर्यापूर, मोर्शी आणि मेळघाट या चार जागा गमवाव्‍या लागल्‍या होत्‍या. अनुकूल वातावरण दिसत असूनही आलेल्‍या अपयशानंतर भाजपने अमरावती जिल्‍ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केल्‍याचे गेल्‍या काही वर्षांतील घडामोडींमधून दिसून आले आहे.

हेही वाचा – मिझोरामला ३० वर्षांनी मिळणार नवा मुख्यमंत्री; कोण आहेत माजी आयपीएस लालदुहोमा?

मोर्शीतून पराभूत झालेले तत्‍कालीन कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांना भाजपने राज्‍यसभेवर खासदार म्‍हणून संधी दिली. भाजपच्‍या प्रदेश पातळीवरील राजकारणात पडद्यामागे राहून पक्षसंघटनात्‍मक बांधणीत योगदान देणारे अमरावतीकर असलेले श्रीकांत भारतीय हे विधान परिषदेचे सदस्‍य बनले. डॉ. बोंडे यांना जिल्‍हाध्‍यक्ष आणि अन्‍य विधान परिषद सदस्‍य प्रवीण पोटे यांना शहराध्‍यक्षपदाची जबाबदारी देऊन भाजपने कार्यकर्त्‍यांना वेगळा संदेश दिला. गेल्‍या काही वर्षांत भाजपने हिंदुत्‍ववादी चेहरा अधिक प्रकर्षाने समोर आणण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. हिंदू मतांच्‍या ध्रुवीकरणाची भाजपची राजकीय व्‍यूहरचना दिसून आली आहे.

राज्‍यातील सत्‍तांतराचे परिणाम स्‍थानिक पातळीवरही जाणवू लागले आहेत. कार्यकर्त्‍यांची धावपळ वाढली आहे. मध्‍यंतरीच्‍या काळात जिल्‍ह्यातील बुथप्रमुखांना प्रत्‍येकी पन्‍नास नवीन कार्यकर्ते जोडण्‍याचे उद्दिष्‍ट देण्‍यात आले. शासनाच्‍या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्‍यासाठी शक्‍तीकेंद्रप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांनी प्रयत्‍न करावेत, यासाठी थेट प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍याकडून पाठपुरावा करण्‍यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या प्रतिमेचा वापर करून जनाधार वाढविण्‍यासाठी पदाधिकारी प्रयत्‍न करीत आहेत. घरकुल योजना, शौचालये, उज्‍वला गॅस योजनेच्‍या लाभार्थ्‍यांमार्फत प्रचारतंत्र राबविण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. भाजपला जिल्‍ह्यात नवीन मतदार जोडायचे आहेत. केंद्र सरकारच्‍या आणि राज्‍य सरकारच्‍या योजनांचा लाभ कशा पद्धतीने लोकांना मिळाला, याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्‍याचे प्रयत्‍न कार्यकर्त्‍यांनी करावेत, यासाठी बूथस्‍तरीय बांधणी मजबूत करण्‍यावर भाजपच्‍या नेत्‍यांनी भर दिला आहे.

अमरावती जिल्‍ह्यातील गेल्‍या निवडणुकीतील निराशाजनक कामगिरी विसरून नव्‍या दमाने आगामी निवडणुकीसाठी सज्‍ज राहण्‍याचे आवाहन भाजपच्‍या कार्यकर्त्‍यांना करण्‍यात आले आहे. उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील जिल्‍ह्याच्‍या राजकारणावर लक्ष ठेवून आहेत. राज्‍यात महाविकास आघाडीचे सरकार स्‍थापन झाल्‍यानंतर भाजपच्‍या कार्यकर्त्‍यांमध्‍ये आलेली मरगळ राज्‍यातील सत्‍तांतरानंतर दूर झाल्‍याचे चित्र दिसले. आता तीन राज्‍यांमधील विधानसभा निवडणुकीच्‍या निकालांनी स्‍थानिक पदाधिकारी उत्‍साही बनले आहेत. अमरावती जिल्‍ह्यातील विधानसभेच्‍या सर्व आठही जागांवर भाजपचे उमेदवार असतील आणि लोकसभा निवडणूकही भाजपच्‍या पक्षचिन्‍हावर लढवली जाईल, असा दावा भाजपच्‍या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

हेही वाचा – मिझोराममध्ये नवख्या उमेदवारांची कमाल; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह दिग्गजांचा दारूण पराभव; कसं घडलं? वाचा…

खासदार नवनीत राणा यांनी केंद्रातील तर आमदार रवी राणा यांनी राज्‍यातील भाजप सरकारला पाठिंबा दिला आहे. युवा स्‍वाभिमान पक्ष हा ‘एनडीए’चा घटक पक्ष आहे आणि या पक्षातर्फे निवडणूक लढविण्‍याचा मानस असल्‍याचे नवनीत राणा यांनी जाहीर केले आहे. आता भाजपचे वरिष्‍ठ नेते राणा दाम्‍पत्‍याविषयी कोणती भूमिका घेतात, याकडे अनेकांचे लक्ष आहे. बच्‍चू कडू यांच्‍या प्रहार जनशक्‍ती पक्षाचा अचलपूर आणि मेळघाट या दोन मतदारसंघांमधील प्रभाव हादेखील भाजपच्‍या मार्गातील अडसर आहे. बच्‍चू कडू हेदेखील सरकारमधील घटक आहेत. त्‍यांची दिशादेखील लवकरच स्‍पष्‍ट होणार आहे.

विधानसभेच्‍या सर्व जागा लढविण्‍याची तयारी भाजपने केली आहे. केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या योजना लोकांपर्यंत पोहोचवायच्‍या आहेत. जिल्‍ह्यात शिवसेनेच्‍या शिंदे गटाचे किंवा राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या अजित पवार गटाचे फारसे अस्तित्‍व नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍या बाबतीत चर्चेनंतर वरिष्‍ठ निर्णय घेतील. लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार असावा, असा कार्यकर्त्‍यांचा आग्रह आहे. – शिवराय कुळकर्णी, प्रदेश प्रवक्‍ते, भाजप.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp workers are very happy with the success of bjp in three states now bjp has a challenge to increase its base in amravati print politics news ssb
First published on: 05-12-2023 at 10:42 IST