अविनाश कवठेकर

‘मिशन बारामती’ अंतर्गत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यानंतर बारामती लोकसभा मतदार संघात फोडाफोडीला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा जिल्हा महिला आघाडीच्या माजी जिल्हा निरीक्षक डाॅ. अर्चना पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बारामतीमध्ये विजय मिळविण्याचा निर्धार केल्याने यापुढील काही दिवसांत फोडाफोडीच्या राजकारणाला वेग येण्याची शक्यता आहे.

डॉ. अर्चना पाटील यांची इंदापूर तालुक्यासह बारामती लोकसभा मतदारसंघात ओबीसी समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख आहे. डॉ. अर्चना पाटील यांचे आजोबा दिनकरराव पाटील यांचा माजी खासदार शंकरराव पाटील यांच्या विरोधात विधानसभेला थोड्या मताने पराभव झाला होता. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाने हर्षवर्धन पाटील यांना चांगले बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा… व्याजदर वाढीच्या राजकीय पडसादांचे केंद्र सरकारसमोर आव्हान

डाॅ. अर्चना पाटील यांनी महादेव जानकर यांच्या रासपचे प्रदेश सचिव म्हणून काम केले आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाने ओबीसींना न्याय दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचे आरक्षण घालवले होते. भाजपची सत्ता येताच ओबीसींना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आरक्षण मिळाले. भाजपकडूनच आम्हाला अपेक्षा असल्याने पक्षात प्रवेश केला आहे, असे डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले. बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा या विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक गावात दौरे केले आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी अजित पवार यांनी डाॅ. अर्चना पाटील यांची थेट सातारा जिल्हा निरीक्षकपदी नियुक्ती केली होती.

हेही वाचा… दाक्षिणात्य अभिनेता के चिरंजीवी राजकारणात पुन्हा सक्रिय होणार?

‘मिशन बारामती’ अंतर्गत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बारामतीचा दौरा केला होता. या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील, असा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला होता.

हेही वाचा… एकनाथ शिंदेच्या मदतीला बावनकुळे धावले

खडकवासला, भोर, पुरंदर, इंदापूर आणि दौंड विधानसभा मतदारसंघात निर्मला सीतारामन यांनी विविध कार्यक्रम घेतले होते. परिवार सन्मान बैठक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, संघटनात्मक तयारी आढावा, मंडल आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका, सुकाणू समिती पदाधिकारी बैठक, मोर्चा पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद, भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा, सहकारी आणि व्यापारी संस्थांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक, महिला मोर्चा आणि युवक पदाधिकाऱ्यांशी संवाद सीतारामन यांनी साधला होता.

हेही वाचा… एकनाथ शिंदेंबाबतचे विधान आणि भारत जोडो यात्रेच्या तयारीमुळे अशोक चव्हाणांवरील पक्षांतराचे मळभ दूर होणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा दौरा संपताच बारामती लोकसभा मतदारसंघात फोडाफोडीचे राजकारण सुरू झाल्याचे दिसून येत असून येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होतील, असा दावा भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.