सोलापूर : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडून अजित पवार यांचा गट सत्ताधारी भाजपसोबत गेल्यामुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्याआगोदर एकादशी वारीच्या निमित्ताने तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे आपल्या अख्ख्या मंत्रिमंडळासह पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. तो संपूर्ण राज्यात राजकीय आणि सामाजिक चर्चेचा विषय झाला होता. या पार्श्वभूमीवर भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने राज्यात बऱ्यापैकी हातपाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. त्याचे दृश्य परिणाम सोलापुरात दिसत आहेत.

सत्ताधारी भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही छोटे-मोठे नेते बीआरएस पक्षात दाखल झाले आहेत. सोलापूर शहरात बहुसंख्येने राहणाऱ्या तेलुगुभाषक विणकर समाजाला आकृष्ट करण्याचा बीआरएस पक्षाचा प्रयत्न दिसून येतो. त्याची सुरुवात काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादूल यांच्यापासून झाली आहे. सादूल हे सलग दोनवेळा लोकसभेवर निवडून गेले होते. अलिकडे काही वर्षांपासून ते फारसे सक्रिय राजकारणात नव्हते. वृद्धापकाळ आणि आजारपण आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करता त्यांची राजकीय उपयुक्तताही जवळपास संपलेली असताना त्यांचा बीआरएस प्रवेश फारसा दखलपात्र नव्हता. यापूर्वी तत्कालीन आंध्र प्रदेशातील नेते एन. टी. रामाराव यांच्या तेलुगु देशम पक्षानेही सोलापुरात पाय रोवण्याचा प्रयत्न केला होता. तो यशस्वी झाला नव्हता. त्याच नजरेतून अलिकडे बीआरएस पक्षाच्या विस्ताराच्या प्रयत्नांकडे पाहिले जात होते.

NCP releases manifesto
भाजपला नकोसे मुद्दे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात; जातनिहाय जनगणना, किमान आधार मूल्याचे अजित पवार गटाकडून आश्वासन
mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
Prakash Ambedkar, North Indians,
“भाजपला मनसेच्या पाठिंब्यामुळे उत्तर भारतीयांमध्ये असुरक्षिततेची भावना”, प्रकाश आंबेडकरांचे विधान; म्हणाले, “भाजपने…”
Bhiwandi lok sabha
महाविकास आघाडीत भिवंडीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला ?

हेही वाचा – पावसाची दडी आणि सांगलीत पाण्यावरून नेतेमंडळींची कुरघोडी

सोलापूरसह नांदेड व मराठवाड्यातील अन्य भाग तसेच विदर्भातील काही भागांत या पक्षाचे जाळे हळूहळू पसरले जात असताना त्यात पंढरपूरच्या वारीच्या निमित्ताने केसीआर यांचा संपूर्ण मंत्रिमंडळासोबत तब्बल सहाशे मोटारींच्या ताफ्यासह विठ्ठलाचे दर्शन हा धार्मिक वा अध्यात्मिक बाबींपेक्षा राजकीय वारी म्हणून चर्चेत आला. त्याचवेळी योगायोगाने पंढरपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगिरथ भालके हे राष्ट्रवादीशी फारकत घेऊन केसीआर यांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षात प्रवेश केल्यामुळे केसीआर यांचे राजकीय उपद्रव मूल्य प्रकर्षाने राजकीय जाणकारांच्या नजरेत आले.

याच पार्श्वभूमीवर इकडे सोलापुरात सत्ताधारी भाजपमधील गटबाजीला ऊत येऊन त्याचे पर्यवसान या पक्षातील चार असंतुष्ट माजी नगरसेवकांसह सुमारे पाचशे कार्यकर्त्यांनी हैदराबादमध्ये मुख्यमंत्री केसीआर यांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षात प्रवेश केला. यातील नागेश वल्याळ हे ३० वर्षांपूर्वी सोलापूरच्या तळागाळात भाजपचा पाया रोवलेले दिवंगत माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे पुत्र आहेत. अलिकडे ते भाजपमध्ये अडगळीत पडले होते. त्यांच्यासह याच पक्षातील महापालिका माजी सभागृहनेते सुरेश पाटील, संतोष भोसले, जुगनबाई आंबेवाले, राजश्री चव्हाण आदी पाच माजी नगरसेवकांनी भाजपचा राजीनामा दिला. यापैकी सुरेश पाटील यांचा अपवाद वगळता उर्वरीत चौघाजणांनी बीआरएसच्या मोटारीत बसणे पसंत केले. याशिवाय शंभर वर्षे जुन्या पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनीही बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. वल्याळ व गोप हे दोघेही तेलुगुभाषक आहेत. या माध्यमातून तेलुगुभाषकांचा प्रभाव असलेल्या शहरातील पूर्व भागात बीआरएस पक्षाला उभारी येण्यास मदत होत आहे. आणखी पाच माजी नगरसेवक भाजपमधून बाहेर पडून बीआरएसमध्ये येणार असल्याचा दावा धर्मण्णा सादूल यांनी केला आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्याचे बोलले जाते.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता काँग्रेसने हस्तगत केल्याच्या पार्श्वभूमीवर इकडे सीमेवरील सोलापुरातही प्रयत्न केल्यास काँग्रेसला बळकट होण्याची संधी मिळू शकते. योगायोगाने भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यापाठोपाठ सुरेश पाटील, नागेश वल्याळ व इतर असंतुष्ट मंडळीही भाजपमधून बाहेर फडल्यानंतर काँग्रेसमध्ये दाखल होण्याची अटकळ बांधली जात होती. परंतु सुरेश पाटील यांनी आपला निर्णय प्रलंबित ठेवला असताना वल्याळ, दशरथ गोप व इतरांनी काँग्रेस प्रवेशाचा पर्याय अव्हेरून थेट बीआरएससाठी हैदराबादचा मार्ग पत्करला. यात खरे तर या सर्व मंडळींना आपल्याकडे खेचून आणायला काँग्रेस पक्ष कमी पडल्याचे दिसून येते. विशेषतः ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी थोडेसे गांभीर्याने घेतले असते तर वल्याळ, गोप यांच्यासह आक्रमक वृत्तीचे सुरेश पाटील आदी सर्वांना काँग्रेसमध्ये प्रवेश घेणे कठीण नव्हते. यात शेवटी राजकीय नुकसान भाजपला होणार की काँग्रेसला, हे नजीकच्या काळातच दिसून येईल.

हेही वाचा – रायगड जिल्ह्यात तटकरे यांना राष्ट्रवादीमधूनच आव्हान

भाजपमधील तेलुगुभाषक नेते मंडळी बीआरएसमध्ये जाणे हे भाजपसाठी हानीकारक तर काँग्रेससाठी लाभदायक असल्याचा दावा काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केला आहे. शहरातील बहुसंख्य तेलुगुभाषक समाजावर संघ परिवाराचा प्रभाव असून या समाजाचे बहुसंख्य मतदार भाजपला बांधिल आहेत. त्यापैकी आता भाजपमधील फाटाफुटीमुळे किमान काही हजार मतांचा फटका भाजपला बसू शकतो, असे काँग्रेसचे गणित आहे. हे गणित मान्य केले तरी दुसरीकडे पंढरपुरात राष्ट्रवादीचे युवा नेते भगिरथ भालके हे बीआरएसमध्ये गेल्यामुळे त्यांना मानणारे सुमारे १५ ते २० हजार मते महाविकास आघाडीपासून दुरावण्याची शक्यता वाटते. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा विचार करता पंढरपूर आणि सोलापूरच्या पूर्वभागातील मतांची होणारी संभाव्य फूट कोणाला तारक आणि कोणारा मारक आहे, हे प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे.

बीआरएस पक्षाला भाजपची बी टीम म्हणून म्हटले जाते. त्यात आणखी भरीस भर म्हणून बीआरएस पक्षाने जर ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीबरोबर समझोता केला तर त्यातून मतांची होणारी विभागणी महाविकास आघाडीसाठी मारक ठरण्याची शक्यता वाटते. मागील २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत याच सोलापूर मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास एक लाख ७० हजार मते घेतली होती आणि एक लाख ५८ हजार मतांच्या फरकाने काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना दुसऱ्यांदा पराभूत व्हावे लागले होते. त्याची बीआरएसच्या रुपाने आता पुनरावृत्ती होऊ नये म्हणजे काँग्रेसने मिळविले, असे म्हणता येईल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यामुळे महाविकास आघाडीची ताकद आणखी खुंटण्याची शक्यता असल्यामुळे सोलापुरात सलग तिसऱ्यांदा होणारा पराभव टाळण्यासाठी काँग्रेसची विशेषतः सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांची कसोटी लागणार आहे.