नागपूर : बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेतून छगन भुजबळ यांना बंड करायला लावणे, त्यांना काँग्रेसमध्ये घेणे, दीर्घकाळ मंत्रीपद (आणि तेही महत्वाच्या खात्याचे) देणे, राज्याचे उपमुख्यमंत्री करणे, मुलाला आमदार, पुतण्याला खासदार होण्याची संधी देणे हे ज्या शरद पवार यांनी केले. त्यांच्याच विरोधात भुजबळ यांनी नागपुरात गंभीर आरोपांची तोफ डागली. त्यामुळे भुजबळ पवारांवर का संतापले? असा प्रश्न पडतो.. त्याची उत्तरे राज्यात सध्या तापलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी राजकारणात दडलेली आहेत.
शुक्रवारी नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) चिंतन शिबीर पार पडले. त्याच्या पूर्वसंध्येला भुजबळ यांनी समता परिषदेचा (ही त्यांचीच संघटना आहे) ओबीसी मेळावा नागपुरातच घेतला. त्यात त्यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात सरकारने काढलेल्या जी.आर.च्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली, ओबीसींचे नेते म्हणून त्यांनी ती भूमिका घेणे अपेक्षितही होते. पण नंतर भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनावरून थेट शरद पार यांना लक्ष्य केले. दोन वर्षापूर्वीच्या अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या हल्ल्यामागे शरद पवार व त्यांच्या दोन आमदरांचा हात होता,असा गंभीर आरोप केला. हे धक्कादायक होते. राज्यात मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसींना आरक्षण लागू करण्याचे श्रेय शरद पवार यांना देणारे भुजबळ याच समाजाच्या मेळाव्यात पवार यांच्यावर गंभीर आरोप करतात हे अनाकलनीय ठरते. त्यामुळेच भुजबळाचा पवार यांच्यावर राग का ? असा प्रश्न पडतो. त्याचे उत्तरही याच मेळाव्यात भुजबळांच्याच भाषणाच्या पुढच्या टप्प्यात मिळतात.
भुजबळाच्या संतापाचे कारण
ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीवर शरद पवार यांनी टीका केली होती. एखादया प्रवर्गासाठी नियुक्त समितीत त्याच समाजाच्या नेत्यांचा समावेश केल्याने सामाजिक ऐक्य दुभगण्याची शकभीती त्यांनी व्यक्त केली होती. पवार यांच्या या टिकेमुळेच भुजबळ संतापले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन केली होती. त्यात सर्वच सर्वच मराठा होते. तेव्हा पवार गप्प का बसले? आता स्थापन केलेल्या ओबीसींसाठीच्या समितीत या प्रवर्गातील सर्वच जातींच्या प्रतिनिधींचा समावेश आहे, मग त्यावर टीका का असा सवाल भुजबळ यांनी केला. समितीवरील टिकेचा राग भुजबळ यांनी पवरांवर टीका करून काढला.
भुजबळ यांची राजकीय खेळी
शरद पवार यांच्यावर प्रखर टीका करणारे नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिक जवळ जातात हे २०१४ नंतर अनेक नेत्यांबाबत दिसून आले. ही बाब लक्षात घेतली तर नागपुरात येऊन पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्याची भुजबळ यांची खेळी हा याच डावपेचाचा एक भाग वाटतो. भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावल्यावर ते त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर नाराज होते. त्यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळेच राष्ट्रवादीला करावा लागला, अशी राजकीय वर्तुळात चर्चा त्यावेळी होती. दोन वर्षापूर्वी अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यामुळे तत्कालीन गृहमंत्री म्हणून फडणवीस यांच्यावरही टीका झाली होती. आता या घटनेचे खापर पवार व त्यांच्या पक्षाच्या आमदारावर फोडून भुजबळ हे फडणवीस यांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलेले जाते. ओबीसी मेळाव्यात त्यांनी फडणवीस याचे केलेले कौतूकही त्याच दिशने टाकलेले पाऊल मानले जाते.