मुंबई : गरिबांचे पैसे, गरिबांना हीच काँग्रेसची गॅरंटी आहे. काँग्रेसशासित राज्यांत निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने (गॅरंटी) पूर्ण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत खोटे बोलत आहेत. मोदींनी मोजक्या उद्याोगपतींचे बारा लाख कोटी रुपये माफ केले. मग काँग्रेस सरकारने गरिबांचे पैसे गरिबांनाच दिले तर भाजपच्या पोटात का दुखते, असा सवाल काँग्रेसचे दोन मुख्यमंत्री व एका उपमुख्यमंत्र्याने शनिवारी भाजपला केला.

काँग्रेसने कर्नाटक, तेलंगाणा, हिमाचल प्रदेशात निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने (गॅरंटी) पूर्ण केली नाहीत, असे आरोप भाजपकडून करण्यात येत आहेत. तशा स्वरूपाची जाहिरात भाजपने दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी टिळक भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपला चोख प्रत्युत्तर दिले. तसेच आपापल्या राज्यांत दिलेली आश्वासने कशा पद्धतीने पूर्ण केली आहेत, त्याची आकडेवारीसह माहिती दिली. काँग्रेसचे प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी काँग्रेस सरकारांनी दिलेल्या गॅरंटीच्या अंमलजाबणीची माहिती दिली.

हेही वाचा >>>लक्षवेधी लढत: राजापूर : उदय सामंत यांच्या भावासमोर कडवे आव्हान

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी स्वतंत्र तेलंगणाचे आश्वासन पूर्ण केले. विधानसभा निवडणुकीच्या वेळी सहा आश्वासने दिली होती. तेलंगणात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयांची कर्जमाफी दिली. महाराष्ट्रात सांगण्यासारखे एकही काम भाजपने केलेले नाही, म्हणून ते आमच्यावर टीका करून जनतेची दिशाभूल करीत आहेत.रेवंथ रेड्डी, मुख्यमंत्री, तेलंगणा

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतून लोकांच्या समस्या समोर आल्या, त्यातून कर्नाटकात सहा गॅरंटी देण्यात आल्या. काँग्रेस सत्तेत येताच त्याची अंमलबजावणी केली. १ कोटी २२ लाख महिलांना ‘गृहलक्ष्मी’ योजनेतून दरमहा २००० रुपये मिळत आहेत. १ कोटी ६४ लाख कुटुंबे ‘गृहज्योती’ योजनेचा लाभ घेत आहेत. कर्नाटकात आम्ही केलेले काम भाजप नेत्यांनी पहावे, त्यांच्यासाठी विशेष विमान, बसची सोय करू.- डी. शिवकुमार, उपमुख्यमंत्री, कर्नाटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रासारखेच हिमाचल प्रदेशातही ऑपरेशन कमळचा प्रयोग झाला. पण काँग्रेसने त्यांचा डाव हाणून पाडला. जनतेने काँग्रेसच्या गॅरंटीवर आणि सरकारच्या कामकाजावर विश्वास ठेवत पुन्हा सत्ता दिली. काँग्रेसचे सरकार येताच पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत जुनी निवृत्तिवेतन योजना लागू केली. दुधाला हमीभाव देणारे हिमाचल प्रदेश देशातील पाहिले राज्य आहे.- सुखविंदर सुख्खू, मुख्यमंत्री