आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन विरोधकांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली. या आघाडीत सध्यातरी २८ घटकपक्ष आहेत. मात्र बिहारचे मुख्यमंत्री तथा संयुक्त जनता दल (जदयू) पक्षाचे सर्वेसर्वा नितीश कुमार लवकरच भाजपाशी हातमिळवणी करणार असल्याचे म्हटले जात आहे. नितीश कुमार यांनी खरंच एनडीएत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यास, इंडिया आघाडीसाठी हा फार मोठा धक्का असेल. असे असतानाच आता तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनीदेखील पश्चिम बंगालमध्ये आम्ही एकट्याने निवडणूक लढवू अशी घोषणा केली आहे. या दोन मोठ्या घडामोडींमुळे काँग्रेसची चांगलीच अडचण झाली असून ममता बॅनर्जींचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

काँग्रेसकडून नरमाईचे धोरण

ममता बॅनर्जी यांनी बुधवारी (२४ जानेवारी) आमची इंडिया आघाडीशी जागावाटपावर कोणतीही चर्चा सुरू नाही. आम्ही पश्चिम बंगालमध्ये एकट्याने निवडणूक लढवू, अशी घोषणा केली. या घोषणेमुळे काँग्रेस पक्ष चांगलाच अडचणीत आला आहे. ममता यांच्या या भूमिकेनंतर काँग्रेसने नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. या पक्षाकडून ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करून जागावाटपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी माहिती दिली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे ममता बॅनर्जींच्या संपर्कात आहेत. ते बॅनर्जींशी चर्चा करत आहे, अशी माहिती जयराम रमेश यांनी दिली. खरगे आणि बॅनर्जी यांच्यात नेमकी चर्चा काय झाली? याबाबतचा अधिक तपशील देण्यास त्यांनी नकार दिला. मात्र इंडिया आघाडी आणि ममता बॅनर्जी यांचा भाजपाला पराभूत करणे हा एकच उद्देश आहे, असे जयराम रमेश म्हणाले.

mamata banerjee
‘काँग्रेस, कम्युनिस्ट हे भाजपाचे एजंट’, ममता बॅनर्जी इंडिया आघाडीवर कडाडल्या
Rashtriya Janata Dal Lalu Prasad Yadav Muslim-Yadav Loksabha Election 2024 RJD Bihar List
मुस्लीम-यादवांच्या पलीकडे जाण्याचा लालूंच्या पक्षाचा प्रयत्न; राष्ट्रीय जनता दलाने कुणाला दिली उमेदवारी?
INDIA bloc collapse in Kashmir complete NC PDP fielded candidates against each other
काश्मीरमध्ये इंडिया आघाडीचे ‘तीनतेरा’; NC, PDP ने एकमेकांविरोधात दिले उमेदवार
pappu yadav in purniya loksabha
बिहारमध्ये जागावाटपावरून इंडिया आघाडीला तडे? भरसभेत काँग्रेस नेता ओक्साबोक्शी रडला

सूत्रांच्या माहितीनुसार खरगे यांनी ममता बॅनर्जी यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी व्हावे, अशी विनंती ममता बॅनर्जी यांनी केली आहे. आम्हाला काँग्रेसच्या या यात्रेबद्दल काहीही सांगण्यात आलेले नाही, असे ममता बॅनर्जी काही दिवसांपूर्वी म्हणाल्या होत्या. यावर बोलताना ‘ममता बॅनर्जी यांनी भारत जोडो न्याय यात्रेत काही मिनिटांसाठीजरी हजेरी लावली तरी मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी तसेच काँग्रेस पक्षातील प्रत्येकाला त्याचा आनंद होईल,’ अशी प्रतिक्रिया जयराम रमेश यांनी दिली.

“अधीर रंजन चौधरींमुळे जागावाटपात अडचण”

पश्चिम बंगालच्या बाबतीत काँग्रेसकडून नरमाईचे धोरण स्वीकारले जात आहे. तृणमूल काँग्रेसकडून मात्र आणखी कणखर भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांनी घेतलेली भूमिका आणि काँग्रेसने दिलेली प्रतिक्रिया यावर तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याने प्रतिक्रिया दिली. “सध्या काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जागावाटपावर तोडगा निघत नाहीये. पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी हेच याला कारणीभूत आहेत,” असे मत या नेत्याने व्यक्त केले. तृणमूलच्या नेत्याने दिलेल्या या प्रतिक्रियेवर अधीर रंजन चौधरी यांनी थेट भाष्य करण्याचे टाळले. तुम्ही याबाबत त्यांनाच अधिक माहिती विचारावी, असे चौधरी म्हणाले.

विरोधकांना एकत्र करण्यात नितीश कुमारांची महत्त्वाची भूमिका

दरम्यान, एकीकडे ममता बॅनर्जी यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतलेली असताना दुसरीकडे बिहारमध्ये नितीश कुमार यांनीदेखील एनडीएत सहभागी होण्याची तयारी सुरू केली आहे. लवकरच ते भाजपाशी हातमिळवणी करू शकतात, असे सांगितले जात आहे. इंडिया आघाडीतील घटकपक्षांना एकत्र करण्यात नितीश कुमार यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. त्यांनी वेगवेगळ्या राज्यांतील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची प्रत्यक्ष भेट घेतलेली आहे. या भेटीतूनच नंतर सर्व पक्ष एकत्र आले होते. नितीश कुमार यांच्या बिहारमधील निवासस्थानीच इंडिया आघाडी नावारुपाला आली होती. त्यावेळी आघाडीत फक्त १५ पक्ष होते. आता या घटकपक्षांची संख्या २८ पर्यंत गेलेली आहे. असे असताना आता ज्यांनी विरोधकांना एकत्र करण्यासाठी कष्ट घेतले, तेच नितीश कुमार भाजपाशी हातमिळवणी करण्याची शक्यता असल्यामुळे विरोधकांसाठी तसेच काँग्रेससाठी हा मोठा फटका करणार आहे.

नितीश कुमार यांनी समन्वयक पद नकारले

गेल्या काही महिन्यांपासून नितीश कुमार हे वेगवेगळ्या कारणांमुळे इंडिया आघाडीशी नाराज होते. पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळावी यासाठी नितीश कुमार यांच्याकडून अप्रत्यक्षरित्या प्रयत्न केले जात होते. मात्र त्यांना आघाडीचे समन्वयक पद देण्यावरूनही एकमत होत नसल्यामुळे नितीश कुमार नाराज असल्याचे सांगितले जात होते. जोपर्यंत सर्व घटकपक्षांचे एकमत होत नाही, तोपर्यंत कोणतीही जबाबदारी स्वीकारणार नाही, अशी भूमिका नितीश कुमार यांनी घेतली होती. आता हेच नितीश कुमार एनडीएत सामील होण्याच्या तयारीत असल्यामुळे विरोधकांची पंचाईत होण्याची शक्यता आहे.

इंडिया आघाडीत नेमकी अडचण काय?

इंडिया आघातील प्रत्येक घटकपक्षाचे उद्दीष्ट वेगवेगळे आहे. आघाडीमध्ये काँग्रेसला प्रमुख विरोधी पक्षाचा मान मिळावा, यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची धडपड चालू असते. तर तृणमूल काँग्रेस आणि आदमी पार्टी यासारख्या पक्षांना स्वत:चा विस्तार करायचा आहे. त्या दृष्टीनेच या पक्षांचा प्रयत्न असतो. आघाडीतील प्रत्येक पक्षाची महत्त्वाकांक्षा वेगळी असल्यामुळे समतोल साधणे कठीण होऊन बसले आहे. तृणमूल काँग्रेसला आसाम आणि मेघालय या दोन्ही राज्यांत जागा हव्या आहेत. तर आम आदमी पार्टीला जागावाटपादरम्यान दिल्ली आणि पंजाब या राज्यांसह गोवा, हरियाणा, गुजरात या राज्यांतही जागा हव्या आहेत. त्यामुळे जागावाटपाला अंतीम रुप देणे हे कठीण होऊन बसले आहे.

राजद पक्ष नितीश कुमारांची कमतरता भरून काढणार?

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांत पराभव झाला आहे. त्यामुळे बिहार या राज्याला चांगलेच महत्त्व आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेश हे राज्यदेखील महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र बिहारमध्ये जदयू हा घटकपक्ष भाजपाशी हातमिळवणी करण्याच्या तयारी असल्यामुळे काँग्रेस व पर्यायाने इंडिया आघाड़ीला मोठा फटका बसू शकतो. नितीश कुमार भाजपासोबत गेले तरी राष्ट्रीय जनता दल (राजद) जदयूची कमतरता भरून काढेल, अशी अपेक्षा काँग्रेसच्या नेत्यांना आहे.

आगामी काळात काय होणार?

दरम्यान, नितीश कुमार यांनी जातीआधारित जनगणना करून या जनगणनेचा अहवाल सार्वजनिक केलेला आहे. यातनंतर अशाच प्रकारची गनगणना ही देशपातळीवर करावी, अशी मागणी इंडिया आघाडीकडून केली जात आहे. अशा प्रकारची मागणी करून देशातील ओबीसी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न विरोधकांचा आहे. मात्र ज्या नितीश कुमार यांनी सर्वप्रथम जातीआधारित जनगणना केली, तेच आता भाजपासोबत जाण्याच्या तयारीत असल्यामुळे आता पुढे काय करावे? असा प्रश्न विरोधकांपुढे उभा ठाकला आहे. त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.