कोल्हापूर : मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी हजारो कोल्हापूरकरांचे हात पुढे आले आहेत. याच वेळी राजकीय नेत्यांनी राजकीय नेत्यांमध्येही मदत करण्याची छुपी स्पर्धा रंगली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, भाजपचे आमदार अमल महाडिक, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील आदींनी पूरग्रस्तांसाठी लाख मोलाची मदत देऊ केली आहे. जिल्हा प्रशासनानेही मदतीसाठी नियोजन सुरू केले आहे.
यावर्षी मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर बनली आहे. लाखो पूरग्रस्तांचे दैनंदिन जगणे विस्कळीत झाले आहे. त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणात गरज भासू लागली आहे. आपत्तीची परिस्थिती लक्षात घेऊन मदतीसाठी अनेक जण पुढे येऊ लागले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याला पुर तसा नवा नाही. दरवर्षी पुराने पाठ धरलेली असतेच. दर आठ – दहा वर्षांनी अक्राळ विक्राळ महापूराने जीवित – वित्तहानी झाल्याच्या नोंदी आहेतच. यावर्षी पूरस्थितीने उग्र रूप धारण केले नसल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. यामुळे आता कोल्हापूरकर यापूर्वी महापूर संकटकाळात केलेल्या मदतीची परतफेड करण्याची भावना बोलून दाखवत आहेत. यातूनच मदतीसाठी हजारो हात पुढे आले आहेत.
सर्वपक्षीय नेते तत्पर
यामध्ये राजकीय नेतेही मागे नसल्याचे दिसत आहे. सर्वप्रथम जिल्हा कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी ‘ पूरग्रस्त मराठवाड्यांना मदतीची हाक ‘ अशी या नावाने साद घालत मदत साहित्य देण्याचे आवाहन लोकांना केले. त्यानुसार जिल्हा काँग्रेसमध्ये लाखो रुपयांचा मदत साहित्याचा ओघ सुरू झाला आहे. पाठोपाठ हसन मुश्रीफ यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलून मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे ५१ लाखाचे मदत साहित्य आज शनिवारी पूरग्रस्त भागाकडे रवाना झाले. याच वेळी कोल्हापूर दक्षिणचे भाजपचे आमदार अमल महाडिक यांनीही १५ लाख रुपयांचे साहित्य सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना पाठवले आहे. त्यांच्या या मदत साहित्य वेळी खासदार धनंजय महाडिक यांनीही उपस्थिती लावली. शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक, काँग्रेस नेते गणपतराव पाटील यांनीही मोठ्या प्रमाणात मदत पाठवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार दत्त कारखाना भंडारात मदत साहित्य जमा होऊ लागले आहे.
जिल्हा प्रशासन सक्रिय
याचवेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनीही आवश्यकतेनुसार मदत मराठवाड्यातील गरजूंना कोणत्या प्रकारची मदत लागणार आहे याची माहिती संकलित करून त्यानुसार साहित्य पाठवण्याची तयारी ठेवली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची दुसरे पथक काल रात्री मदतीसाठी रवाना झाले. कोल्हापुरातीलव्हाईट आर्मीचे स्वयंसेवक पूरग्रस्त भागात मदत कार्यात गेली चार दिवस आहेत. एकूणच कोल्हापूरकर आता मदतीतून उतराई होण्यासाठी सक्रिय झाले आहेत.