संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीचा गोंधळ झाला आणि या मतदारसंघात आता पक्षाचा उमेदवारच रिंगणात नसेल. राज्यात उमेदवारी अर्जांच्या गोंधळाची जुनीच परंपरा आहे. यातून अनेकदा नेतेमंडळी तोंडघशी पडली आहेत.

नाशिक पदवीधर मतदरासंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. त्याऐवजी त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे काँग्रेस पक्ष या मतदारसंघात तोंडघशी पडला. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने अर्जच दाखल केले नाहीत, असे काही प्रकार राज्यात यापूर्वी घडले आहेत. उमेदवारी अर्जच दाखल न करणे, छाननीन अर्ज बाद होणे यामुळे मतदारसंघात ताकद असूनही पक्षाचा उमेदवार रिंगणात नसल्याचे प्रकार राज्यात घडले आहेत. २०१४ मध्ये नागपूर जिल्ह्यात भाजपने एक वगळता सर्व जागा जिंकल्या होत्या. पण एका मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा अर्ज बाद झाला होता. यातूनच राजकीय पक्ष मतदारसंघात एक-दोन अतिरिक्त अर्जड दाखल करतात. नाशिक पदवीधरमध्ये काँग्रेसने दुसरा कोणाचा डमी म्हणून अर्ज दाखल केला नव्हता. यामुळे पक्षाची पंचाईत झाली आहे.

हेही वाचा >>> शिंदे गटाच्या खासदाराच्या विरोधात भाजपकडून संभ्रम

नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघातून माजी मंत्री बबनराव घोलप यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारली होती. कारण मंत्रिपदी असताना घोलप यांच्यावर आरोप झाले होते. त्यातून त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. म्हणूनच शिवसेनेने या मतदारसंघात घोलप यांच्या पुतण्याला उमेदारी जाहीर केली. पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत घोलपांच्या पुतण्याने अर्जच दाखल केला नाही. याउलट बबनराव घोलप यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ते निवडूनही आले होते.

हेही वाचा >>> कोल्हापूर जिल्ह्यात संयुक्तपणे लढण्यावर महाविकास आघाडीत ऐक्य

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत नागपूर जिल्ह्यात माजी मंत्री सुनील केदार यांच्या विरोधातील भाजप उमेदवाराचा अर्ज छाननीत फेटाळण्यात आला होता. भाजप उमेदवाराने अर्जावर सरकारी ठेकेदार असा उल्लेख केला होता. त्यातून भाजप उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला. यामुळे तेव्हा सानवेर मतदारसंघात भाजपचा उमेदवारच रिंगणात नव्हता.

विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीकरिता काँग्रेसने सुबोध मोहिते यांना उमेदवारी जाहीर केली. त्याच दिवशी दुपारी ३ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. नागपूरला असलेले मोहिते यांना उमेदवारी जाहीर झाली तोपर्यंत नागपूरहून मुंबईला येणारे विमान सुटलेले होते. मग पुण्याच्या विमानाने पुण्याला यायचे व तेथून हेलिकॉप्टरने मुंबईला आणण्याची तयारी करण्यात आली. नेमके त्याच दिवशी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा पुण्यात कार्यक्रम असल्याने हेलिकॉप्टरला मुंबईत उड्डाण करण्यास परवानगी मिळाली नाही. सुबोध मोहिते हे २ वाजून ५० मिनिटांनी महालक्ष्मी रेसकोर्सवर हेलिकॉप्टरमधून उतरले. १० मिनिटांत विधान भवनात पोहचणे शक्यच नव्हते. शेवटी घाईघाईत उमेदवारी अर्ज भरून तयार असलेल्या मधु जैन यांचा अर्ज शेवटच्या क्षणी दाखल करून काँग्रेसने जागा कायम राखली. अन्यथा नाशिकसारखीच अवस्था झाली असती.

हेही वाचा >>> नागपूरमध्ये घोळ काॅंग्रेसच्या अंगाशी

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीकरिता वसंत चव्हाण यांचा अर्ज राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला. खासदारकी मिळणार म्हणून चव्हाण यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. ही बाब पक्षाध्यक्ष शरद पवार यांना समजल्यावर त्यांनी पक्षाच्या नेत्यांची कानघडणी केली. दुसऱ्या दिवशी तारिक अन्वर यांचा अर्ज भरण्यात आला आणि चव्हाण यांच्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची नामुष्की आली. परंतु पक्षाने नंतर त्यांना राज्यसभेची खासदारकी देऊन त्यांच्यावरील अन्याय दूर केला होता. पण थोड्याच दिवसांत त्यांचे निधन झाले.

नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीकरिता माजी मंत्री बाबुराव भारस्कर प्रयत्नशील होते. ज्येष्ठ नेते बाळासाहेब भारदे यांचा त्यांच्या उमेदवारीकरिता आग्रह होता. पण पक्षाने दुसऱ्या नेत्याला उमेदवारी दिली. भारस्कर यांनी अर्ज दाखल केला होता. पण उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या मुदतीत ते मुंबईहून मतदारसंघापर्यंत पोहचू शकले नाहीत. परिणामी त्यांचा उमेदवारी अपक्ष म्हणून कायम राहिला. काँग्रेस पक्षाचे निष्ठावान असताना अपक्ष म्हणून निवडणूक लढविणे योग्य ठरणार नाही असा विचार करून बाबुरावांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला निवडून द्यावे, असे आवाहन केले. नुसते आवाहन केले नाही तर मतदारसंघात उमेदवाराबरोबर फिरून काँग्रेसचा प्रचार केला. काँग्रेस नेतेही निश्चिंत होते. परंतु झाले उलटेच. निकाल लागला तर बाबुराव भारस्कर हे अपक्ष म्हणून निवडून आले. स्वत:चा प्रचार न करता काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला निवडून द्या, असे जाहीरपणे आवाहन केल्यावरही मतदारांनी भारस्कर यांना निवडून दिले होते, असा जुना किस्सा काँग्रेसचे माजी आमदार उल्हास पवार यांनी सांगितला.

हेही वाचा >>> फडणवीस यांच्या ‘त्या’ वक्तव्यातच सत्यजित तांबे यांच्या बंडाची बिजे

उमेदवारी एकाला आणि आमदारकी दुसऱ्यालाच

वसंतदादा पाटील मुख्यमंत्री तर एन. एम. अण्णा कांबळे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. विधानसभेसाठी काँग्रेसमध्ये उमेदवारीकरिता प्रचंड चुरस होती. उमेदवारांची यादी निश्चित करण्याकरिता इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी बैठक झाली व नावे निश्चित करण्यात आली. वसंतदादा पाटील यांनी काही नावांची शिफारस केली होती. पण त्यातील चार मतदारसंघात दुसऱ्याच नेत्यांना उमेदवारी देण्यात आली. नवी दिल्लीत एम. एन. अण्णा कांबळे हे उमेदवारांची नावे जाहीर करीत असताना वसंतदादा पाटील यांनी चार मतदारसंघातील नावे परस्पर बदलली. पक्षात दादांच्या या कृतीवर आक्षेप घेण्यात आला. परंतु चार जणांच्या उमेदवारीवर दादा अडून बसले. शेवटी वसंतदादांचा विजय झाला आणि दादांनी परस्पर बदललेले चारही उमेदवार आमदार म्हणून निवडून आले. यामुळे पक्षाने उमेदवारी जाहीर केलेले चौघे घरीच बसले.

आंध्र प्रदेशात तेलुगू देशमच्या एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्याने २००४च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचे अपहरण केले होते. परिणामी मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवारच रिंगणात नव्हता. पण पक्षाने शिक्षक असलेल्या अपक्षाला ऐनवेळी रिंगणात उतरविले आणि हा अपक्ष ५० हजारांच्या मताधिक्याने विजयी झाला होता.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion of nomination the candidate sudhir tambe satyajit tambe candidacy application print politics news ysh
First published on: 14-01-2023 at 10:31 IST