मुंबई : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून गेल्या २० दिवसांत राज्यातील राजकीय हिंसाचारात वाढ झाली आहे. विरोधी पक्षाचे उमेदवार व नेतेमंडळींना धमकावले जात आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली आहे. काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) व राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या नेत्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याने पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना तात्काळ पदावरून दूर करावे, या मागणीचा पुनरुच्चार काँग्रेसने केला आहे. याबाबतचे पत्र प्रदेशाध्यत्र नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पाठविले आहे.

रश्मी शुक्ला या पदावर असल्याने निवडणुका निष्पक्ष व पारदर्शकपणे पार पडतील असे वाटत नाही. त्यामुळे त्यांना पदावरून तात्काळ हटवावे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. काँग्रेसकडून २४ सप्टेंबर व ४ ऑक्टोबर रोजी पत्र पाठवून रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती. २७ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाचे अधिकारी मुंबई दौऱ्यावर असताना काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केल्याची आठवण पटोले यांनी या पत्राद्वारे करून दिली.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने मनसेबरोबर काही जागांवर युती शक्य, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पत्रात काय?

रश्मी शुक्ला यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करणे व त्यांना नाहक त्रास देण्याचे फर्मान पोलीस आयुक्त तसेच जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना सोडले आहे, पोलीस यंत्रणा विरोधी पक्षातील नेते व कार्यकर्त्यांची अडवणूक करत आहेत, त्यांच्यावर दबाव आणत आहेत. त्यामुळे त्यांना पदावरून हटवणे गरजेचे आहे, असे पत्रात म्हटले आहे.