मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाला काँग्रेस नेते दिग्विजय सिंह जबाबदार असल्याचे म्हणत सोमवारी काँग्रेसचे दोन नेते आपापसांत भिडल्याचे बघायला मिळाले. त्यांच्या या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, भाजपाला आयते कोलीतच मिळाले आहे.
काँग्रेस प्रदेश कार्यालयात झाला वाद
काँग्रेस पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्य प्रदेश काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष प्रदीप अहिरवार आणि प्रवक्ते शहरयार खान हे दोघेही उपस्थित होते. यावेळी दिग्विजय सिंह यांच्या तिकीटवाटपातील भूमिकेवरून दोघांमध्ये वाद झाला. दोघांनीही एकमेकांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. त्यात खान जमिनीवर पडल्याचे बघायला मिळाले. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही.
हेही वाचा – तमिळनाडूत लोकसभेसाठी जागावाटपाचे सूत्र ठरले? डीएमके काँग्रेसला नऊ जागा देण्याची शक्यता
काँग्रेसकडून दोघांनाही कारणे दाखवा नोटीस
या संदर्भात बोलताना काँग्रेस प्रवक्ते के. के. मिश्रा म्हणाले, “काँग्रेस पक्षाने या घटनेची दखल घेतली असून, दोघांनाही ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.”
शहरयार खान यांची अहिरवारांवर टीका
या संदर्भात ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना शहरयार खान यांनी अहिरवार यांच्यावर आरोप केले. “सोमवारी आम्ही दोघेही प्रदेश कार्यालयात उपस्थित होतो. यावेळी आमच्यात विधानसभा निवडणुकीतील पराभवाबद्दल चर्चा सुरू होती. तेव्हा अहिरवार यांच्याकडून दिग्विजय यांनी तिकीटवाटपासाठी पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला. तसेच दिग्विजय सिंग यांनी ईव्हीएमबाबत घेतलेल्या भूमिकेबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे माझा राग अनावर झाला, असे ते म्हणाले. तसेच अहिरवार यांना काँग्रेस पक्ष सोडायचा असून, भाजपात प्रवेश करायचा आहे. त्यामुळेच त्यांनी वाद घातला, अशी टीकाही त्यांनी केली.
अहिरवार यांनी फेटाळले आरोप
या संदर्भात बोलताना अहिरवार म्हणाले, आमच्यात विधानसभा निवडणुकीतील पराभवावर चर्चा सुरू होती. मात्र, मी दिग्विजय सिंग यांच्याबाबत एकही अपशब्द बोललो नाही.
दरम्यान, काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी या पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनावर फोडले आहे. त्यांनी गेल्या आठवड्यात भोपाळमध्ये पत्रकार परिषद घेत, ईव्हीएममध्ये कशा प्रकारे छेडछाड केली जाऊ शकते, हे दाखविण्याचा प्रयत्न केला होता. महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसला केवळ ६६ जागांवर विजय मिळवता आला; तर भाजपाने १६३ जागांवर विजय मिळवला. २०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ११४ जागा जिंकल्या होत्या; तर भाजपाला केवळ १०९ जागांवर विजय मिळविता आला होता.
काही दिवासांपूर्वीच गुना येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान, दिग्विजय यांचे भाऊ लक्ष्मण सिंह यांनीही ईव्हीएमवर खापर फोडण्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. “ईव्हीएमला दोष देऊन चालणार नाही. ईव्हीएम मशीन काँग्रेस उमेदवार निश्चित करीत नाही. खरं तर एखादी मशीन दोषयुक्त असू शकते. मात्र, त्यामुळे संपूर्ण ईव्हीएम मशीनलाच दोष देणे योग्य नाही”, असे ते म्हणाले.
हेही वाचा – राजस्थान ते तेलंगणा! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय निर्णय घेण्याची स्पर्धा; वाचा सविस्तर…
काँग्रेसमधील या वादावर भाजपा नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली असून, त्यांना काँग्रेसवर टीका करण्यासाठी आयते कोलीतच मिळाले आहे. या संदर्भात बोलताना भाजपाचे प्रवक्ते नरेंद्र समुजा म्हणाले, “अहिरवार हे कमलनाथ यांचे समर्थक आहेत; तर खान दिग्विजय सिंह यांचे समर्थक आहेत. जितू पटवारी यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त केल्यानंतर सिंग आणि नाथ यांच्या समर्थकांकडून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.”