सांगली : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या सांगलीत काँग्रेसला उतरती कळा लागली असून ही घसरण थोपवण्याची क्षमता अंगी असलेले नेतेही गटा-तटाच्या जोखंडात अडकले असल्याने काँग्रेसची अवस्था अधिकाधिक बिकट होते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. भाजप काँग्रेसची जागा घेऊ पाहात असताना मेगाभरती सोहळ्यातही गटबाजीचे प्रदर्शन शिस्तबध्द पक्षाला लागते की काय अशी शंका निर्माण होत आहे.
पक्षांतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचे जवळ जवळ निश्चित केले असतानाच भाजपमधूनच त्यांना थोडं थांबण्याचा सल्ला दिला असला तरी आता काँग्रेस त्यांना पक्षातच रोखण्यासाठी काय करणार हाही प्रश्नच आहे. सांगली विधानसभा निवडणूक दोन वेळा पाटील यांनी निवडणूक लढवली. काँग्रेस पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र, पक्षातूनच अपेक्षित सहकार्य, मदत मिळाली नसल्याचा दावा करत त्यांनी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या बंडखोरीवर पक्षाच्या पराभवाचे खापर फोडले. यानंतर श्रीमती पाटील यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा मानाचे स्थान मिळेल यासाठी प्रतिक्षा केली.
मात्र, पाटील यांच्या विरोधामुळे त्यांच्यावर बंड केल्याबद्दल पक्षातून हकालपट्टीची कारवाई झाली. त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला असला तरी त्यांचे महापालिका विशेषत: सांगली शहरात हक्काचे कार्यकर्ते आजही सक्रिय असून महापालिकेत सत्ता कुणाची असावी या निर्णयाक क्षणी ही ताकद मोलाची ठरू शकते. हे ओळखूनच भाजपने त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या. या बदल्यात वसंतदादा शेतकरी बँकेचे शुक्लकाष्ठ काही प्रमाणात शिथील करण्याचा शब्द भाजपकडून दिला गेल्याची वंदता आहे. काँग्रेसमधून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर त्यांचा ओढा प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे होता. मात्र, भाजपचे शेखर इनामदार, जनसुराज्य शक्तीचे समित कदम यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांना भाजप प्रवेशासाठी राजी करण्यात आले.
याच दरम्यान, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पाटील हेही भाजप प्रवेशासाठी अनुकूल होते. पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्यांशीही त्यांची चर्चा झाली होती. मात्र, भाजप प्रवेशासाठी मुहुर्त शोधण्यात वेळ गेला. आणि हीच संधी साधून श्रीमती पाटील यांचा भाजप प्रवेश घडवून आणण्यात आला. या प्रकारे पाटील यांच्या भाजप प्रवेशाला अडथळा निर्माण करण्यात आला. यानंतर पुन्हा पाटील यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून बोलणी करत गेल्या आठवड्यात माजी मंत्री अण्णा डांगे यांच्याबरोबर भाजप प्रवेशाचा मुहुर्त निश्चित केला होता. तथापि, यावेळीही त्यांच्या भाजप प्रवेशाला विरोध झाला. यामुळे त्यांना पुन्हा दाराबाहेर उभे करण्यात आले आहे. त्यांच्या या राजकीय घडामोडीमुळे माजी मंत्री आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी भेट घेउन समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.
या प्रयत्नांना त्यांनी अद्याप सकारात्मक अथवा नकारात्मक काहीच प्रतिसाद दिलेला नाही, अथवा आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही. यामुळे ते आता झाकली मूठ सव्वा लाखाची अशाच स्थितीत काही काळ राहतील असे दिसत आहे. धड भाजपमध्ये नाही, धड काँग्रेसमध्ये महत्व नाही अशा स्थितीत ते किती काळ सक्रिय राहतील याबद्दल साशंकता आहे. नजीकच्या काळात म्हणजे महापालिका निवडणुकीपुर्वी त्यांना ठोस भूमिका घ्यावीच लागणार आहे.
गणेशोत्सवाचे वेध सध्या लागले आहेत. गणेशोत्सवानंतर पितृपक्ष पंधरवडा संपल्यानंतर महापालिका निवडणुकीचे पडघम आधिक जोरात वाजू लागतील. महापालिका निवडणुकीत महायुती एकसंघ लढणार की स्वतंत्रपणे हे अजून अस्पष्ट असले तरी महाविकास आघाडीच्यावतीने एकत्रित निवडणुका लढविण्याचे संकेत मिळत आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यात आघाडी होण्याची चिन्हे दिसत असली तरी सुकाणू आमदार जयंत पाटील यांच्या हातीच राहील असे दिसते. खासदार विशाल पाटील हे काँग्रेसच्या माध्यमातून महापालिका निवडणुकीत सक्रिय झाले तर नवल वाटणार नाही. मात्र, सांगलीत मदन पाटील गटाची ताकद श्रीमती पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत राहते की काँग्रेसमध्ये सक्रिय राहते यावर भाजपचे राजकीय डावपेच निश्चित होतील.