काँग्रेस बंडखोरांना रसद पुरवून सत्तेत येण्याचा भाजपचा डाव फसला |congress party win nagpur zilha parishad election bjp plan failed sunil kedar rajendra mulak nagpur | Loksatta

काँग्रेस बंडखोरांना रसद पुरवून सत्तेत येण्याचा भाजपचा डाव फसला

नागपूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसचेच वर्चस्व असले तरी, या निमित्ताने माजी मंत्री सुनील केदार व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्यातील मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत.

काँग्रेस बंडखोरांना रसद पुरवून सत्तेत येण्याचा भाजपचा डाव फसला

चंद्रशेखर बोबडे

नागपूर : इतर पक्षातील नाराजांना रसद पुरवून त्यांच्या माध्यमातून नागपूर जिल्हा परिषदेत सत्तेत येऊ पाहणाऱ्या भाजपचा डाव काँग्रेसने उधळून लावत सत्ता कायम राखली. मात्र या निमित्ताने माजी मंत्री सुनील केदार व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्यातील मतभेदही चव्हाट्यावर आले.

अडीच वर्षांपर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत ५८ पैकी ३२ जागा जिंकून काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली. १४ सदस्यीय भाजप विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावत आहे. जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळवल्याने सुनील केदार यांचा तेथे बोलबाला आहे. पहिली अडीच वर्ष त्यांच्या गटाच्या रश्मी बर्वे या अध्यक्ष होत्या. उर्वरित अडीच वर्षांसाठी हे पद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्यावर सोमवारी अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. यात काँग्रेसच्या मुक्ता कोकड्डे व उपाध्यक्षपदी कुंदा राऊत या दोन्ही केदार समर्थकांची निवड झाली.
जिल्हा परिषदेत सत्ता कायम राखण्यात काँग्रेसला यश आले असले तरी यानिमित्ताने झालेल्या घडामोडीतून काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद, केदार यांना पक्षातूनच होणारा विरोध उघड झाला. त्याच प्रमाणे काँग्रेस बडंखोरांना रसद पुरवून त्यांच्या माध्यमातून सत्ता बळकवण्याचा भाजपचा प्रयत्नही चव्हाट्यावर आला.

हेही वाचा : ‘भारत जोडो’ यात्रेत अराजकीय चर्चेतून राजकीय पेरणी?

या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा परिषदेवरील केदार यांचे वर्चस्व मोडून काढण्याची संधी आहे हे लक्षात आल्यावर काँग्रेसमधील केदारविरोधक सक्रिय झाले. यावेळी केदार समर्थक अध्यक्ष नको, अशी भूमिका काँग्रेस नेत्यांच्याच सांगण्यावरून बंडखोर नाना कंभाले यांच्या नेतृत्वात काही सदस्यांनी घेतली. या खेळीमागे पक्षातील विरोधक आणि भाजप असल्याचे लक्षात येताच केदार यांनी बंडखोरांना भीक न घालता काँग्रेसच्या उर्वरित सदस्यांना सुरक्षित स्थळी हलवले. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्याची संधीच भाजपला मिळाली नाही. बंडखोरांना राष्ट्रवादी व अन्य पक्षाची साथ मिळून भाजपच्या मदतीने अध्यक्षपद मिळवण्यासाठी आवश्यक संख्याबळ गाठू, अशी अपेक्षा भाजपला होती. त्यामुळेच त्यांनी निवडणुकीच्या दिवसापर्यंत प्रयत्न सुरू ठेवले. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी उमेदवारांची नावे जाहीर करून उत्सुकता वाढवली.पण ऐनवेळी माघार घेत काँग्रेस बंडंखोरांना पाठिंबा जाहीर केला. पण संख्याबळच नसल्याने तोंडघशी पडावे लागले. पण यातून या काँग्रेस बंडखोरांमागे भाजप असल्याचे स्प्ष्ट झाले.

हेही वाचा : हिमाचल प्रदेशवर पाणी सोडत ‘आप’ने लक्ष केंद्रीत केले गुजरातवर

दुसरीकडे काँग्रेस जिल्हा परिषद सदस्य नाना कंभाले यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या सूचनेवरूनच बंडखोरी केल्याचे सांगून नेत्यांमधील मतभेद उघड केले. जिल्ह्याच्या राजकारणात मुळक हे केदार विरोधक म्हणूनच ओळखले जातात. काँग्रेसच्या सदस्यांमध्ये केदार समर्थकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत त्यांचा शब्द अंतिम असतो. विषय समित्यांचे सभापती ठरवतानाही केदार गटालाच झुकते माप दिले जाते. त्यामुळे पक्षातील इतर नेते केदार यांच्यावर नाराज आहेत. जि.प.अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने . त्यांची कोंडी करण्याचा डाव विरोधकांना आखला. पण त्यात त्यांना यश आले नाही. पुन्हा एकदा केदारच सर्वांवर भारी पडले‌.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-10-2022 at 12:02 IST
Next Story
‘भारत जोडो’ यात्रेत अराजकीय चर्चेतून राजकीय पेरणी?