अमरावती : अमरावती जिल्ह्यात रोहिंग्या व बांगलादेशी राहतात, त्यांनी खोट्या दस्तावेजांच्या आधारे तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जन्म दाखले मिळवले, असा आरोप करत यंत्रणेसह सर्वांची झोप उडवून देणाऱ्या माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी काँग्रेसने चालवली आहे. किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे वातावरण बिघडून हिंदू मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. ते रोखण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या हे वारंवार जिल्ह्यात येऊन येथील पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेला वेठीस धरत आहेत. त्यांच्यावर दबाव आणत आहेत. काही प्रकरणांमध्ये खोट्या दाखल्यांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र मिळवल्याचे पुढे आले आहे. त्यात यंत्रणेमार्फत पोलीस तक्रारही झाली आहे. परंतु त्या प्रकरणांतही कुणी बांगलादेशी किंवा रोहिंग्याशी संबंधित असल्याचे पुढे आले नाही. त्यामुळे सोमय्या यांनी जाणीवपूर्वक अमरावती जिल्ह्याची बदनामी केल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
किरीट सोमय्या यांच्यामुळे महसूलची यंत्रणा धास्तावलेली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरण पात्र असताना व दाखले देण्याबाबतचा बंदी आदेश मागे घेण्यात आल्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात आहे. सध्या शैक्षणिक कामकाजासाठी विद्यार्थ्यांना अनेक दाखल्यांची गरज आहे. मात्र त्यांना ती दिली जात नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची अडवणूक थांबवावी, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी येथे येऊन जिल्हाधिकाऱ्यांसह संपूर्ण महसूल यंत्रणेला जेरीस आणले होते. महसूल यंत्रणेने कोणतीही शहानिशा न करता रोहिंग्या व बांगलादेशींना जन्म-मृत्यूचे दाखले देण्याचे आदेश दिले, असा त्यांचा आरोप होता. त्यासाठी त्यांनी काही तालुक्यांची आकडेवारीही पुढे केली होती. परंतु चौकशीअंती जिल्ह्यात एकही रोहिंग्या किंवा बांगलादेशींचा पत्ता लागला नाही. प्रशासकीय यंत्रणेने तसे स्पष्टही केले, पण किरीट सोमय्या हे वारंवार अमरावतीत येऊन यंत्रणेवर दबाव आणत असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.
खासदार बळवंत वानखडे व दोन माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख आणि ॲड. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, माजी महापौर विलास इंगोले व मिलिंद चिमोटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहर अध्यक्ष बबलू शेखावत यांच्या प्रतिनिधी मंडळाने यासंदर्भात पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांचीही भेट घेतली आहे.
किरीट सोमय्या कोण आहेत?
किरीट सोमय्या कोण आहेत, ते मंत्री किंवा खासदार, आमदार नाहीत. तरीही प्रशासनावर दबाव टाकून बळजबरीने गुन्हे दाखल करण्यास सांगत आहेत. त्यांना हा अधिकार कुणी दिला, असा सवाल करीत यशोमती ठाकूर यांनी सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या ठिकाणी एकही बांग्लादेशी, रोहिंग्या, पाकिस्तानी नागरिक वास्तव्याला नाही, हे प्रशासनाने स्पष्ट करूनही ते अमरावतीत येऊन खोटे आरोप करीत आहेत. त्यांचा येथील शांतता भंग करायची आहे का, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असताना किरीट सोमय्या यांच्या वारंवार होणाऱ्या दौऱ्यांमुळे वातावरण तापले आहे.