दिगंबर शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली : शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सांगली महापालिकेत सत्तेमध्ये आणि विरोधक अशा दोन्ही भूमिकेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत कलह विकोपाला गेला आहे. भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी राष्ट्रवादीची संगत केली ही चूकच झाली, अशी भावना माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यापुढे काँग्रेस सदस्यांनी व्यक्त केली असून महापौर बदलाची आग्रही मागणीही केली आहे.

दीड वर्षापूर्वी राष्ट्रवादीच्या पुढाकाराने महापालिकेतील भाजपच्या सत्तेला आव्हान देण्यात आले. यासाठी काँग्रेसची साथ मोलाची ठरली होती. ७८ सदस्यांच्या महापालिकेत काँग्रेसचे संख्याबळ २० तर राष्ट्रवादीचे संख्याबळ १५ असताना महापौरपदासाठी राष्ट्रवादीला संधी देण्यात आली. भाजपचे सात सदस्य फोडून महापौर निवडीमध्ये आघाडीकडून भाजप उमेदवाराला पराभूत करण्यात आले आणि राष्ट्रवादीचा महापौर झाला. मात्र, कागदोपत्री आजही महापालिकेत संख्याबळ भाजपचेच आहे. यामुळे सभागृह नेतेपद भाजपकडे आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्रातील विविध घडामोंडीची माहिती एका क्लिकवर…

तसेच महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीमध्ये भाजपचे वर्चस्व असल्याने आर्थिक बाबीमध्ये आजही भाजपचीच चलती आहे. महापालिकेत संख्याबळानुसार काँग्रेस दोन नंबरचा पक्ष असल्याने आपोआप विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसच्या वाट्याला आले असून काँग्रेस कागदोपत्री विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. तर दोन्ही काँग्रेस महापौर निवडीमध्ये एकत्र आल्याने उपमहापौरपद काँग्रेसला मिळाले आहे. संख्याबळाने अधिक असूनही महासभेत भाजप विरोधी भूमिकेत असताना स्थायी समितीमध्ये मात्र बहुमतामुळे सत्तेत, तर उपमहापौरपद हाती असताना कागदोपत्री काँग्रेस विरोधकांच्या भूमिकेत अशी स्थिती आहे.

गेली दीड वर्षे महापौरपद राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, या कालावधीत सत्तेत सहभागी असूनही काँग्रेस सदस्यांच्या प्रभागातील समस्यांची सोडवणूक होऊ शकलेली नाही. निधी वाटपातही दुय्यम वागणूक मिळत असून निर्णय प्रक्रियेमध्ये काँग्रेस सदस्यांना विश्वासातच घेतले जात नसल्याचा सदस्यांचा आरोप आहे. तर काँग्रेसची सदस्यसंख्या २० असली तरी अंतर्गत गटबाजीही आहे. यामध्ये जयश्री पाटील, विशाल पाटील, माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचे नगरसेवक आहेत. काँग्रेस तीन गटात विभागली असल्याने याचा नेमका फायदा उठवत राष्ट्रवादी आपल्याला हवे तसे निर्णय घेत असल्याचा आरोप होत आहे. मात्र, बदलत्या राजकीय स्थितीत दोन दिवसापूर्वी अंतर्गत मतभेद बाजूला ठेवत राष्ट्रवादीच्या कुरघोडीचा राजकारणाचा विस्फोट झाला. राष्ट्रवादीसोबत जाऊन भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याची चूकच केल्याची भावना काँग्रेस सदस्यांनी व्यक्त केली. यावर राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून नाराजी दूर केली जाईल असे सांगत डॉ. कदम यांनी मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress starts criticizing ncp in sangli corporation after collapse of mahavikas aghadi print politics news asj
First published on: 29-07-2022 at 12:03 IST