संतोष मासोळे, लोकसत्ता

धुळे – महाविकास आघाडी आणि महायुतींमधील अंतर्गत कुरघोडींमुळे राज्यातील अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये रणधुमाळी उडाली असताना धुळे मात्र अजूनतरी त्यास अपवाद ठरला आहे. भाजप आणि वंचित बहुजन आघाडीने उमेदवार जाहीर केले असले तरी प्रचाराच्या पातळीवर शांतताच आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या या मतदारसंघात उमेदवाराचा शोध घेण्यात कोणतीही घाई दाखवली जात नसल्याने मित्रपक्ष ठाकरे गट आणि शरद पवार गटही केवळ बघ्याच्या भूमिकेत आहेत.

हेही वाचा >>> घराणेशाहीवर झोड उडवणाऱ्या भाजपाने राजकीय कुटुंबात दिली ११ जणांना उमेदवारी

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीवरुन ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात रणकंदन माजले असताना धुळे मतदारसंघाविषयी चकार शब्दही निघत नसल्याची स्थिती आहे. काँग्रेस अंतर्गत बैठकांमध्येही धुळ्यातून कोणाला उमेदवारी द्यावी, याविषयी कोणतीच चर्चा होत नसल्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्येही निस्तेजपणा आला आहे. धुळे मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यात आला असल्याने शरद पवार गट आणि ठाकरे गट प्रतिक्रिया देण्याच्या स्थितीतही नाही. मतदारसंघात सर्वात आधी उमेदवार जाहीर करुन भाजपने आघाडी घेतली असली तरी प्रचाराच्या पातळीवर किरकोळ अपवाद वगळता तशी शांतताच आहे. उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी मोजक्या गावांना भेटी देण्यास सुरुवात केली असली तरी अजून फारसा जोर नाही.

हेही वाचा >>> जम्मू काश्मीर: ओमर अब्दुल्ला मेहबूबा मुफ्तींवर का संतापले? पीडीपी जम्मू काश्मीरमध्ये पाच जागांवर लढणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वंचित बहुजन आघाडीने माजी पोलीस महानिरीक्षक अब्दुर रहमान यांची उमेदवारी जाहीर केली आहे. वंचितच्या उमेदवारामागे मुस्लिम, बहुजन आणि दलितवर्ग राहू शकेल, असे म्हटले जात असले तरी प्रचाराच्या पातळीवर त्यांनीही उचल खाल्लेली नाही. त्यासाठी सध्या सुरु असलेल्या रमजान पर्वाचे कारण दिले जात आहे. ‘एमआयएम’ने उमेदवार द्यावा, अशी पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा असली तरी पक्षश्रेष्ठीनी अद्याप यावर निर्णय घेतलेला नाही. मालेगाव मध्य आणि धुळे शहर विधानसभा मतदार संघात एमआयएमचे आमदार आहेत. रमजानचे उपवास सुरु असल्याने उमेदवारी बाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याचे एमआयएमचे धुळ्याचे आमदार फारूक शहा यांनी म्हटले आहे. काँग्रेसकडून उमेदवार निश्चित झाल्यास मतदारसंघात खऱ्या अर्थाने निवडणूकमय वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीत धुळे मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला असला तरी अद्याप उमेदवाराविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही.

आमदार कुणाल पाटील (काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष)