चंद्रपूर : काँग्रेस नेत्यांमधील वादामुळे अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर मतदारसंघासह बल्लारपूर आणि वरोरा या मतदारसंघांतील उमेदवारांची नावे काँग्रेसकडून दुसऱ्या यादीतही जाहीर करण्यात आली नाहीत. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी तूर्त ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली असल्याचे दिसते आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा मतदारसंघातून त्यांचा लाडका भाऊ प्रवीण काकडे यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. मात्र, पक्ष काकडे यांना उमेदवारी देण्यास इच्छुक नाही. येथून खासदार धानोरकर यांचे भासरे तथा भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या नावाला पसंती आहे. याचबरोबर डॉ. चेतन खुटेमाटे यांचे नावदेखील चर्चेत आहे. खासदार धानोरकर यांनी अनिल धानोरकर यांच्या नावाला विरोध केल्यामुळे एकाही नावावर सहमती होऊ शकली नाही.

अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर मतदारसंघातून खासदार मुकुल वासनिक, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बौद्ध समाजाचे प्रवीण पडवेकर यांचे नाव समोर केले आहे. मात्र, खासदार धानोरकर यांनी त्यांच्या नावालाही विरोध करीत चंद्रपूरबाहेरील तेलगू भाषिक राजू झोडे व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुधाकर अंभोरे ही दोन नावे समोर केली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात बौद्ध समाज मोठ्या संख्येत आहे. लोकसभा निवडणुकीत या समाजाने काँग्रेस उमेदवाराला भरभरून मते दिली. यामुळे आता बौद्ध समाजाचा उमेदवार द्या, अन्यथा जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांत काँग्रेसला परिणाम भोगावे लागतील, असा इशारा या समाजाच्यावतीने देण्यात आला आहे.

हे ही वाचा.. आमदार किशोर जोरगेवार यांच्यावरून भाजपमध्ये गटबाजी; अहीर यांचे समर्थन, मुनगंटीवार विरोधात

बल्लारपूर मतदारसंघात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, डॉ. अभिलाषा गावतुरे व घनश्याम मुलचंदानी ही तीन नावे चर्चेत आहेत. यातील रावत यांच्यासाठी विजय वडेट्टीवार यांचा आग्रह आहे, तर मुलचंदानी यांचे नाव खासदार धानोरकर यांनी समोर केले आहे. डॉ. गावतुरे यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रयत्नशील आहेत.

हे ही वाचा… खासदार भुमरे कुटुंबाकडे मद्यविक्रीचे किती परवाने?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेत्यांचे दावे आणि आग्रह पाहता काँग्रेसश्रेष्ठींनी या तीनही मतदारसंघांतील उमेदवार जाहीर करणे तूर्त टाळले आहे. मात्र, वरिष्ठ नेत्यांनी तीन नावे निश्चित केली असल्याचेही समजते. नेत्यांमधील वाद अखेरपर्यंत कायम राहिला तर पक्षाकडून ही तीन नावे जाहीर केली जातील. रविवारी सायंकळपर्यंत या तीनही मतदारसंघांतील उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे.