कोल्हापूर : कोल्हापुरातील महिला सक्षमीकरणाचा मैलाचा दगड ठरणाऱ्या सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहतीच्या मलईदार भूखंडावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

हातकणंगले मतदार संघातील जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार अशोक माने यांच्या प्रयत्नाने त्यांच्या या महिला संस्थेला कोल्हापुरातील मध्यवर्ती ठिकाणची साडेसहा एकर जमीन मिळाली असताना या भूखंडावर मराठा समाजाचे मराठा भवन बांधण्यासाठी पुढाकार घेतलेले एकनाथ शिंदे शिवसेनेचे समर्थक, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यासह शहरातील मराठा समाजातील प्रमुखांनी हीच जागा मिळाली पाहिजे यासाठी हक्क कायम ठेवला आहे. यामुळे या जागेवर नेमके काय उभारले जाणार यावरून संघर्ष झडण्याची चिन्हे दिसत आहेत.

कोल्हापूर शहरात आयटी पार्क, विश्व पंढरी वसाहत या किमती परिसरातच साडेसहा एकर जागेचा एक शासकीय भूखंड आहे. तो औद्योगिक वसाहतीसाठी राखीव असल्याचे आमदार अशोक माने यांचे म्हणणे आहे. या जागेवर महिला सहकारी औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी माने यांनी सन २००८ पासून शासनाकडे पाठपुरावा सुरू झालेला होता. माने यांच्या पाठीशी शिरोळ तालुक्यात मागासवर्गीय औद्योगिक वसाहत व मुंबईत एक गृहनिर्माण संस्था उभी करण्याचा अनुभव पाठीशी आहे. कोल्हापुरातील महिला औद्योगिक संस्थेला भूखंड मिळण्याचा त्यांचा प्रस्ताव राजकीय शक्ती अभावी रेंगाळला होता.

विधानसभा निवडणुकीत माने विजयी झाल्यानंतर या प्रस्तावाला झपाट्याने गती मिळाली. मे महिन्यामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे या संस्थेला भूखंड मिळण्याबाबत झालेल्या बैठकीस भाजपला समर्थन असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक, आमदार विनय कोरे , आमदार माने, संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर तीनच महिन्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संस्थेला हा भूखंड देण्याचा निर्णय झाला. महिला उद्योजक निर्माण करणे आणि रोजगार संधी उपलब्ध हा उद्देश लक्षात घेऊन जाहीर लिलावा शिवाय ही शासकीय जमीन रेडीरेकनर नुसार रक्कम आकारून भोगवटादार- दोन म्हणून देण्यात येणार आहे. यासाठी संस्थेला सुमारे २० कोटी रुपये भरावे लागणार असले तरी १०० कोटी रुपये किमतीची मध्यवर्ती ठिकाणची ही जमीन संस्थेची होणार आहे. या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाला पाठबळ दिल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे, मंत्रिमंडळाचा हा निर्णय झाल्यानंतर कोल्हापुरात वादाला तोंड फुटले आहे. संबंधित भूखंड मिळण्यासाठी सावित्रीबाई फुले औद्योगिक महिला उद्योग वसाहत, कोल्हापूर चप्पल क्लस्टरसह अन्य तुल्यबळ प्रस्ताव शासनाकडे दाखल झाले होते. भूखंड मिळवण्यासाठी प्रयत्नशील मावळे बेसावध राहिले असताना ही जागा औद्योगिक वसाहतीसाठी राखीव असल्याचा फायदा उठवत आमदार माने यांनी ती गनिमी कावा करून मिळवण्यात यशस्वी ठरले. लगेचच अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत ही संस्था नेमके काय काम करते, महिला सक्षमीकरणात संस्थेचे कोल्हापुरात नेमके योगदान काय अशी प्रश्नांची सरबत्ती केली आहे. हा भूखंड मिळण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरू असताना कोल्हापुरातील स्थानिक संस्थेला डावलून शहराबाहेरच्या आमदारांच्या संस्थेची जागा दिलीच कशी, असा टोकदार प्रश्न उपस्थित करीत मुळीक यांनी त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी त्यांनी ठेवली आहे. विधानसभा निवडणुकी वेळी मुळीक यांनी मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी दिल्याने माझा बळीचा बकरा दिला जात आहे, असा ठपका ठेवत काँग्रेस पक्षाचा त्याग करून एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना पाठिंबा देऊन निवडून आणण्यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती.

याचबरोबर पूर्वी भाजपात असलेले कॉमन मॅन या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष वकील बाबा इंदुलकर यांनीही आमदार माने यांच्या या संस्थेला पाठिंबा देण्यास विरोध दर्शवलेला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा निर्णय झाला तरी शासन निर्णय होण्यापूर्वी या मुद्द्यावरून जन सुराज्य शक्ती आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांच्यात संघर्ष अधिकच तापताना दिसत आहे.