भाजपा तिसऱ्यांदा (२०२४ साली) सत्तेत आल्यास भारताला अनन्यसाधारण अशा समस्यांना सामोरे जावे लागेल आणि त्यावेळी पश्चाताप करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरणार नाही, अशा शब्दांमध्ये केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी इशारा दिला आहे. भाजपाप्रणीत केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भारतातील विविधता नष्ट करत असून धर्माच्या आधारावर देशाची विभागणी करत आहे, असा आरोप मुख्यमंत्री विजयन यांनी केला. गायीवरून देशात धार्मिक दंगली झाल्या आहेत. कोणत्या प्रकारचे अन्न खाल्ले पाहीजे यावरून देशातील नागरिकांच्या एका गटाला राष्ट्राचे शत्रू म्हणून जाहीर केले जात आहे. नागरिकांचा धर्म, जात, पंथ कोणताही असला तरी त्याला कायद्याचे समान संरक्षण मिळाले पाहीजे. पण सध्या देशात हे तत्वच बदलले जात असल्याचीही टीका त्यांनी केली.

रविवारी उत्तर केरळ जिल्ह्यात एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर आपल्या भाषणात मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी वरील भूमिका मांडली. सध्या देशात जे काही चालू आहे, त्यामुळे अल्पसंख्याकांच्या मनात भीती आणि चिंता निर्माण झाली आहे, याबद्दल त्यांनी काळजी व्यक्त केली. “जर भाजपा पक्ष तिसऱ्यांदा सत्तेत आला तर देशाला अनन्यसाधारण अशा समस्यांना तोंड द्यावे लागेल आणि त्यानंतर पश्चाताप व्यक्त करण्यापलीकडे आपल्याकडे दुसरा कोणताही मार्ग नसेल, असेही ते यावेळी म्हणाले.

हे वाचा >> “हा संघ परिवाराचा अजेंडा…” केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचं ‘The Kerala story’बद्दल मोठं वक्तव्य

ही वस्तूस्थिती लोकांच्याही लक्षात आली आहे आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी जनमत तयार होत आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष विचार असलेल्या गटांनी एकत्र यावे आणि लोकांमध्ये याबाबत जागृती निर्माण करून भाजपाला तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापासून रोखावे, असे आवाहन मुख्यमंत्री विजयन यांनी यावेळी केले. आपण सहजासहजी २०२४ साली सत्तेत येणार नाही, ही वस्तूस्थिती भाजपाच्याही लक्षात आली आहे. वस्तूस्थितीची जाणीव झाल्यामुळे अलीकडच्या काळात त्यांनी काही धोकादायक पावले उचलली आहेत. जे काही घटनांमधून आपल्याला दिसले आहे, असेही विजयन म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विजयन पुढे म्हणाले की, विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या चार राज्यामधील नेत्यांवर अलीकडच्या काळात केंद्रीय यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणात धाडी टाकल्या गेल्या आहेत. यावरूनच भाजपा बदलेल्या परिस्थितीला कसे तोंड देत आहे, हे दिसून येते. या प्रकारच्या कारवाया येणाऱ्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र यामुळे लोकांच्या मनातील भावना बदलणार नाही. भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांची आघाडी मजबूत आहेच, तिला आणखी बळकट करण्याची आवश्यकता आहे.