पश्चिम बंगालचे माजी मंत्री आणि दोन वेळा सीपीआय(एम) खासदार राहिलेले बंसा गोपाल चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावरीक लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपानंतर पक्षाने त्यांच्याविरोधात हे पाऊल उचलले आहे. ते बंगालमधील एक ज्येष्ठ आणि लोकप्रिय चेहरा असल्याने या विषयाची चर्चा सुरू आहे. ते एकेकाळी राज्यातील वर्धमान-आसनसोल औद्योगिक पट्ट्यातील सीपीआय(एम) आणि त्यांची ट्रेड युनियन शाखा ‘सीआयटीयू’चा चेहरा होते. नेमके हे प्रकरण काय आहे? कोण आहेत बंसा गोपाल चौधरी? जाणून घेऊयात.

प्रकरण काय?

बंगालमधील सीपीआय(एम)च्या नेतृत्वाने पश्चिम वर्धमान जिल्हा सचिवालय सदस्य आणि सीआयटीयू जिल्हा सचिव बंसा गोपाल चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील एका महिला सीपीआय(एम) नेत्याने दाखल केलेल्या तक्रारीनंतर चौकशी करणाऱ्या अंतर्गत तक्रार समितीने (आयसीसी) केलेल्या शिफारसीवरून त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. महिला नेत्याने बंसा गोपाल चौधरी यांच्यावर आरोप केला की, त्यांनी सोशल मीडियावर तिला आक्षेपार्ह आणि अयोग्य संदेश पाठवून तिचा लैंगिक छळ केला. बंसा गोपाल चौधरी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

कोण आहेत बंसा गोपाल चौधरी?

बंसा गोपाल चौधरी १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला विद्यार्थी राजकारणात सक्रिय झाले आणि सीपीआय(एम) च्या विद्यार्थी संघटनेच्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)चे ते सदस्य झाले. त्यावेळी अविभाजित असणाऱ्या वर्धमान जिल्ह्यातील रानीगंज येथील टीडीबी कॉलेजमध्ये ते अर्थशास्त्राचे शिक्षण घेत होते. काही वर्षांनंतर त्यांना एसएफआयच्या वर्धमान युनिटचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. बंसा गोपाल चौधरी यांनी सीपीआय(एम) पक्षात वेगाने प्रगती केली आणि प्रसिद्धी मिळवली. १९८७ च्या विधानसभा निवडणुकीत सीपीआय(एम) नेतृत्वाने त्यांना पक्षाचे विद्यमान आमदार हराधन रॉय यांच्या जागी राणीगंज विधानसभा जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले.

राणीगंज जागा जिंकल्यानंतर ते काही वर्षांतच मंत्री तसेच आसनसोल दुर्गापूर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष झाले. ज्योती बसू यांच्या मंत्रिमंडळात त्यांना १९९१ मध्ये व्यावसायिक शिक्षण राज्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आणि १९९६ मध्ये त्यांना तांत्रिक शिक्षण मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. २००१ ते २००६ दरम्यान बुद्धदेव मंत्रिमंडळात त्यांनी लघु आणि कुटीर उद्योग मंत्री म्हणून काही काळ काम केले. २००५ मध्ये त्यांना आसनसोल लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यात आली आणि ते विजयी झाले. २००९ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी ही जागा कायम ठेवली, परंतु २०१४ च्या निवडणुकीत तत्कालीन भाजपा उमेदवार बाबुल सुप्रिया यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

महिलेचे आरोप काय?

वर्धमान प्रदेशातील एका सीपीएम नेत्याने म्हटले, “बंसा गोपाल चौधरी यांनी कट्टरपंथी सीपीआय(एम) आणि सीआयटीयू नेते हराधन रॉय यांची जागा घेतली होती. ते खूप लोकप्रिय होते. आम्हाला कधीच वाटले नव्हते की एक दिवस त्यांच्यावर असे आरोप करण्यात येतील.” तक्रारदार सीपीएमच्या महिला नेत्याने बंसा गोपाल चौधरी यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांशी संबंधित संपूर्ण माहिती पक्ष नेतृत्वाला दिली आहे. तक्रारीत महिला नेत्याने म्हटले, “बंसा गोपाल चौधरी यांनी मला एका संघटनेबद्दल माहिती देण्याचे आश्वासन दिले होते. जेव्हा मला ती माहिती मिळाली नाही तेव्हा मी त्यांना त्याविषयी आठवण करून दिली. त्यानंतर त्यांनी मला फेसबुक मेसेंजरवर अश्लील संदेश पाठवण्यास सुरुवात केली.”

महिला नेत्याने सांगितले, “मी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील पक्षाच्या मुखपत्राचे काम पाहते. म्हणून मी बंसा गोपाल चौधरी यांना माझा व्हॉट्सअॅप नंबर दिला. परंतु, नंतर त्यांनी व्हॉट्सअॅपवर अश्लील संदेश पाठवण्यास सुरुवात केली.” गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तिने सीपीआय (एम) च्या मुर्शिदाबाद युनिटकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर चौकशी सुरू करण्यात आली आणि राज्य पक्ष नेतृत्वाने हकालपट्टीचा निर्णय घेतला. सीपीआय (एम) च्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले, “राज्यात विधानसभा आणि लोकसभेत आमच्याकडे शून्य जागा असू शकतात, परंतु आम्ही पक्षात अशा गोष्टी कधीही सहन केल्या नाहीत. आम्ही भविष्यातही असे काही होऊ देणार नाही.” हकालपट्टी करण्यात आलेले सीपीआय (एम) नेते नंतर सत्ताधारी टीएमसी किंवा प्रमुख विरोधी पक्ष भाजपात जातील, अशी उपहासात्मक टीकादेखील त्यांनी केली.

बंसा गोपाल चौधरी यांची प्रतिक्रिया

बंसा गोपाल चौधरी यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले. पक्षाच्या प्रतिस्पर्ध्यांनी त्यांच्याविरुद्ध कट रचल्याचा आरोप केला. त्यांनी आरोप केला की, “पक्षातील एक गट नेहमीच माझ्या विरोधात काम करत आला आहे. पश्चिम वर्धमानमध्ये भाजपाबरोबर मिळून ते काम करू इच्छित होते. त्यांच्या या योजनांमध्ये मी मुख्य अडथळा होतो. ज्यांनी हा सापळा रचला आहे ते हावडा येथील एका गटाशी संबंधित आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात रुग्णालयांमध्ये बेकायदा व्यवसाय केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती.” बन्सा यांनी असाही आरोप केला की, “गेल्या गुरुवारी मी व्हॉट्सअॅपवर राज्य पक्ष सचिवांशी बोललो आणि मी स्वतःहून राजीनामा देऊ इच्छित होतो.” बन्सा यांनी पक्षाच्या नेतृत्वावरही टीका केली. परंतु, सीपीआय(एम) च्या राज्य सचिवालयातील सदस्याने सांगितले की, “बन्सा यांच्याविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार येण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांच्याविरुद्ध अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत, त्यामुळे पक्ष नेतृत्वाने त्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.”