गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने नुकतीच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या निवडणुकीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देत विद्यमान आमदारांचा भाजपानं पत्ता कट केला. क्रिकेटर रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा यांना भाजपानं उत्तर जामनगरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. विद्यमान आमदार धर्मेंद्रसिंह जडेजा ऊर्फ हाखुबा यांना उमेदवारी नाकारत रिवाबा यांना संधी दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
३१ वर्षीय रिवाबा जडेजा या मॅकेनिकल अभियंता आहेत. नोव्हेंबर २०१८ मध्ये जडेजा दाम्पत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर रिवाबा यांनी भाजपात प्रवेश केला. रविंद्र जडेजा मूळचा जामनगरचा आहे. हे दाम्पत्य राजकोटमध्ये स्थायिक असून त्याठिकाणी रेस्टॉरंट चालवतात. भाजपात प्रवेश केल्यापासून रिवाबा जामनगरमध्ये सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. “जामनगरमध्ये गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देऊ नका,” असे आवाहन ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’च्या (आरआयएल) कॉर्पोरेट अफेअर्सचे संचालक परिमल नथवानी यांनी सर्व पक्षांना केले होते. देशातील सर्वात मोठी खासगी तेल शुद्धीकरण संस्था ‘आरआयएल’ची जामनगर जिल्ह्यातील मोती खवडी गावात रिफायनरी आहे.
“जामनगरमधील काही वादग्रस्त प्रकरणांमध्ये धर्मेंद्रसिंह जडेजा यांचं नाव जोडलं गेलं होतं. शिवाय त्यांचा मतदारसंघामध्ये प्रभाव वाढत असल्यानं काही जणांमध्ये नाराजी होती. यामुळे पक्षाने त्यांचं तिकीट कापलं”, अशी माहिती पक्षातील सूत्राने दिली आहे.
जामनगर मतदारसंघ १९८५ पासून भाजपाचा बालेकिल्ला आहे. १९८५ ते २००७ या कालावधीत सलग पाच वेळा या मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार निवडून आला. याच मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान आमदार धर्मेंद्रसिंह जडेजा यांनी २०१२ मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवत विजय संपादन केला होता. या मतदारसंघातून बिपेंद्रसिंह जडेजा यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. रिवाबा जडेजा यांच्याप्रमाणेच बिपेंद्रसिंहदेखील क्षत्रीय आहेत. या दोघांमध्ये हा महत्त्वाचा मतदारसंघ जिंकण्यासाठी चढाओढ आहे.