Cross-voting in Vice President Election? : मंगळवारी झालेल्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांनी विजय मिळवला. या विजयामुळे भाजपाला उपराष्ट्रपतिपद आपल्याकडेच ठेवण्यात पुन्हा एकदा यश आलं. या निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार आणि माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी विरोधकांच्या गोटात आपापसात निराशा आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. आम आदमी पार्टीच्या अनेक खासदारांनी निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला मतदान केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी केला. त्यांच्या या आरोपाला ‘आप’च्या नेत्यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणूक निकालानंतर तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी कोलकात्याच्या विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. आम आदमी पार्टीच्या अनेक खासदारांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना मतदान केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. “या निवडणुकीत नक्कीच क्रॉस व्होटिंग झालेली आहे. आम आदमी पार्टीतील एक महिला खासदार (स्वाती मालीवाल यांना उद्देशून) भाजपाला उघडपणे पाठिंबा देते आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करते. त्यांच्या पक्षात क्रॉस व्होटिंग करणारे दोन-चार खासदार आहेत,” असं अभिषेक बॅनर्जी म्हणाले.
अभिषेक बॅनर्जी यांना ‘आप’चं प्रत्युत्तर
अभिषेक बॅनर्जी यांनी केलेल्या आरोपाला आम आदमी पार्टीचे खासदार आणि सरचिटणीस संदीप पाठक यांनी हास्यास्पद म्हटले. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना पाठक म्हणाले, “पक्षातील एक खासदार (मालीवाल) वगळता आमच्या सर्व खासदारांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनाच मतदान केले. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी आम्ही मतदानाचा आढावा घेतला, तेव्हा या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याचं आमच्या लक्षात आलं. विरोधकांच्या २७ खासदारांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवाराला मतदान केले, तर भाजपाच्या तब्बल १२ खासदारांनी इंडिया आघाडीच्या उमेदवाराला पसंती दिली, अशी माहिती आम्हाला अधिकृत सूत्रांकडून मिळालेली आहे.”
आणखी वाचा : उपराष्ट्रपतिपद मिळवून भाजपाने साधली अनेक राजकीय समीकरणे; आता पुढील आव्हाने काय?
निवडणुकीत १५ मते ठरली अवैध
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत बी. सुदर्शन रेड्डी यांना किमान ३२० मते मिळतील अशी अपेक्षा इंडिया आघाडीला होती. मात्र, प्रत्यक्षात त्यांना ३०० मतांवरच समाधान मानावं लागलं. दुसरीकडे- राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना ४४० मते मिळणार असा अंदाज होता. प्रत्यक्षात मात्र त्यांना ४५२ मते मिळाली. त्याशिवाय इतर १५ मते अवैध ठरविण्यात आली. ही सर्व मते इंडिया आघाडीच्या खासदारांचीच होती, अशी चर्चा सुरू झाली आहे.
निवडणुकीत क्रॉस व्होटिंग कोणी केले?
राधाकृष्णन यांनी राज्यपाल म्हणून केलेल्या निष्पक्ष कामामुळे महाराष्ट्र आणि झारखंडमधील खासदारांनी पक्षाच्या विचारसरणीच्या पलीकडे जाऊन त्यांना मतदान केले, असा दावा भाजपाच्या एका नेत्याने केला. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपा नेत्याचा हा दावा फेटाळून लावला. “शिवसेना ठाम उभी होती आणि आमच्या सर्व ११ खासदारांनी इंडिया आघाडीच्या उमेदवारालाच मतदान केलं. भाजपाकडून जाणून बुजून अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत, कारण शिवसेना ठाकरे गटानेही एनडीएमध्ये सामील व्हावं असं भाजपाच्या नेत्याला आजही वाटतं,” असं सावंत यांनी म्हटलं आहे.
भाजपा खासदारांना विकत घेतंय : अरविंद सावंत
निवडणुकीत बाद ठरलेल्या मतपत्रिकांवर शंका उपस्थित करताना सावंत म्हणाले, “मतदानासाठी प्रत्येक पक्षाने आपापल्या खासदारांची आधीच पूर्वतयारी करून घेतली होती. असे असतानाही काहींचं मतदान अवैध ठरविण्यात आलं, ते खासदार निरक्षर होते का? त्यांना कोणी विकत घेतले? याची चौकशी झाली पाहिजे. आमदार आणि खासदारांची फोडाफोडी करणं हे भाजपाचंच काम आहे. त्यांनी अनेक राज्यांमधील सरकारे पाडली आहेत. महाराष्ट्रातही भाजपाने उघडपणे आमदारांना विकत घेतलं होतं.”
भाजपाने एका मतासाठी १५-२० कोटी रुपये केले : बॅनर्जींचा आरोप
खासदार अरविंद सावंत यांनी केलेल्या या आरोपांचं अभिषेक बॅनर्जी यांनीही समर्थन केलं. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एक मत विकत घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी ‘१५-२० कोटी रुपये’ खर्च केले असा दावा त्यांनी केला. “सत्ताधाऱ्यांकडून जनतेच्या भावनांचा आणि विश्वासाचा व्यवहार केला जात आहे. काही लोकांशी चर्चा केल्यानंतर माझ्या असे लक्षात आले की, सत्ताधाऱ्यांनी मते विकत घेण्यासाठी प्रत्येक खासदारावर १५ ते २० कोटी रुपये खर्च केले. लोकप्रतिनिधींना विकत घेता येईल, पण जनतेला नाही,” अशी टीकाही अभिषेक यांनी केली.
महाराष्ट्राची बदनामी थांबवा, सुप्रिया सुळे यांचा संताप
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी भाजपाला लक्ष्य केलं. “उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील खासदारांनी क्रॉस-व्होटिंग केल्याचा भाजपाचा आरोप चुकीचा आहे. जर १४ मते दुसऱ्या बाजूला गेली तर ती महाराष्ट्राने केली का? तुम्ही महाराष्ट्राची बदनामी का करीत आहात? मराठी लोकांची बदनामी करू नका,” असा संताप सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. “उपराष्ट्रपतिपदासाठी मतदानाची प्रक्रिया गुप्त असते, मग भाजपाला कसे कळले की क्रॉस-व्होटिंग झाले? त्यांचे खासदार संजय जयस्वाल यांनीच एनडीएच्या उमेदवाराला ४० मते जास्त मिळाल्याचा दावा केला आहे,” असा प्रश्नही सुळे यांनी उपस्थित केला.
काँग्रेसचे नेते म्हणाले- क्रॉस-व्होटिंगचे सत्य शोधा
क्रॉस व्होटिंगच्या या आरोप प्रत्यारोपात काँग्रेसनेही उडी घेतली. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत जर खरंच क्रॉस व्होटिंग झाले असेल तर त्यातील सत्य शोधणे गरजेचं आहे. इंडिया आघाडीतील सर्व घटकपक्षांनी आपापल्या खासदारांची चौकशी करावी. गुप्त मतदान प्रक्रियेत नक्की कोणी कोणाला मतदान केले हे सांगता येत नाही, पण अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाल्यावर प्रश्न निर्माण होतोच,” असं काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितलं. दरम्यान, या निवडणुकीनंतर विरोधातील सर्वच पक्षांना आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, असा सल्ला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिला आहे.