Devendra Fadnavis On Eknath Shinde Jai Gujarat Slogan : राज्यात मराठी विरुद्ध हिंदी असा भाषिक वाद पेटला असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यात आणखी तेल ओतण्याचं काम केलं. अमित शाह यांच्याबरोबर पुण्यातील एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर शिंदेंनी व्यासपीठावरूनच ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिली. त्यांच्या या घोषणेनंतर महाराष्ट्रात नवीन राजकीय वाद निर्माण झाला. शिवसेना ठाकरे गटासह राज्यातील विरोधीपक्षांनी याच मुद्द्याला हाताशी धरून उपमुख्यमंत्र्यांवर टीकेचा भडिमार केला. यादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावून आले. आपल्या सहकाऱ्याने केलेल्या विधानावर पडदा टाकण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या एका घोषणेचा दाखला दिला.
नेमके काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानाबाबत फडणवीस म्हणाले, “मी आपल्याला आठवण करून देतो की, याआधी शरद पवार यांनी चिकोडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘जय कर्नाटक’ अशी घोषणा दिली होती. मग त्यांचं कर्नाटकवर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर नाही, असं समजायचं का?”
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, “आपण ज्या कार्यक्रमात जातो, त्याचसंदर्भात बोलत असतो. एकनाथ शिंदे हे गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला गेले होते म्हणून त्यांनी जय गुजरात म्हटलं. याचा अर्थ असा घेता येणार नाही की, त्यांचं गुजरातवरील प्रेम वाढलं आणि महाराष्ट्रावरील कमी झालं. एवढा संकुचित विचार मराठी माणसांना शोभत नाही. मराठी माणूस हा वैश्विक असून त्यांनी संपूर्ण भारतातील मोगली सत्ता घालवण्याचं आणि दिल्लीवर भगवा झेंडा फडकावण्याचं काम केलं आहे. मग एवढा संकुचित विचार जर कोणी करत असेल तर ते चुकीचं आहे.”
आणखी वाचा : चीनला चकवून दलाई लामा भारतात कसे पोहोचले होते? नेहरूंनी कशी दिली होती साथ?
शरद पवार ‘जय कर्नाटक’ कधी म्हणाले होते?
फेब्रुवारी २०१५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे कर्नाटक दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी बेळगावमधील एका खासगी कार्यक्रमाला हजेरी लावली. उपस्थितांना संबोधित केल्यानंतर आपल्या भाषणाचा समारोप करताना शरद पवार यांनी ‘जय हिंद, जय कर्नाटक, जय भारत’ अशी घोषणा दिली. विशेष बाब म्हणजे, त्यानंतर शरद पवार हे बेळगावात झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाला गेले. त्यावेळी व्यासपीठावरील भाषण संपल्यानंतर त्यांनी फक्त जय हिंद म्हटलं होतं. यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शरद पवार यांच्यावर अनेकांनी टीका केली होती.
शरद पवारांवर झाली होती टीका
शरद पवार यांनी यापूर्वी बेळगावसाठी अनेकदा आंदोलने केली, मग या कार्यक्रमात त्यांनी जय महाराष्ट्र असा उल्लेख का टाळला? असा प्रश्न त्यावेळी विरोधकांनी उपस्थित केला होता. शरद पवार हे महाराष्ट्रातील एक जाणकार नेते म्हणून ओळखले जातात, बेळगाव प्रश्नी त्यांनी महाराष्ट्राची भूमिका पुढे नेणे अपेक्षित आहे. असं असतांना त्यांनी या प्रश्नाकडे पाठ फिरवण्याचा प्रयत्न का केला? असाही प्रश्न त्यावेळी अनेकांनी उपस्थित केला.
“शरद पवारांनी जय महाराष्ट्र म्हणायला हवं होतं”
दरम्यान, मराठी एकीकरण समितीचे टी. के पाटील यांनीही शरद पवार यांच्या भूमिकेविषयी नाराजी बोलून दाखवली होती. “बेळगाव येथील अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी त्यांच्या भाषणाचा समारोप करताना जय हिंद असं म्हटलं; पण जय महाराष्ट्र म्हणताना ते अडखळले. महाराष्ट्राच्या सीमाप्रश्नाच्या लढ्यामध्ये आम्ही शरद पवार यांच्याकडे विश्वासू नेते म्हणून पाहतो. बेळगावमधील एका खासगी कार्यक्रमात त्यांनी जय कर्नाटक अशी घोषणा दिली, त्यावर आमची काही हरकत नाही; पण मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी जय महाराष्ट्र म्हणायला हवं होतं,” असं टी. के पाटील ‘झी २४ तास’शी बोलताना म्हणाले होते.
हेही वाचा : मनपा आयुक्तांना मारहाण करणं भोवलं; भाजपा नेत्याची थेट तुरुंगात रवानगी; नेमकं घडलं काय?
एकनाथ शिंदे पुण्यातील भाषणात नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील गुजराती समुदायाकडून उभारण्यात आलेल्या जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त अमित शाह आणि एकनाथ शिंदे हे एकाच मंचावर आले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी ‘जय महाराष्ट्र, जय गुजरात’, अशी घोषणा दिली. यावेळी त्यांनी २०२२ च्या सत्ताबदलाची पुन्हा एकदा आठवण करून दिली. “अमित शाहांच्या रणनीती आणि नेतृत्वाने अशक्य ते शक्य करून दाखवले आहे. ते आव्हानांना संधीत बदलतात आणि त्यांच्या या कार्यक्षमतेचा मी स्वतः अनुभव घेतला आहे. त्यावेळी (२०२२) राज्यात सामान्य माणसाचे सरकार आणणे गरजेचे होते. पंतप्रधान मोदींचे मार्गदर्शन होतेच; पण अमित शाह माझ्यामागे पर्वतासारखे ठामपणे उभे होते. सरकार बदलणे सोपे काम नव्हते. पण जेव्हा देशाच्या, राज्याच्या विकासाचा प्रश्न असतो, तेव्हा अशी पाऊले उचलावी लागतात. यासाठी मी अमित शाहांचे खूप आभार मानतो”, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.