नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात अनौपचारिक गप्पा करताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी भाजपचा ‘प्री-पोल’-‘पोस्ट-पोल’ फार्म्युला जाहीर केला. त्यानुसार जेथे भाजप सक्षम आहे, तेथे ते मित्रपक्षांना सोबत घेणार नाही आणि जेथे कमकुवत आहे तेथे मित्रपक्षाच्या मदतीने पुढे जाणार आहे, याचाच दुसरा अर्थ दोन्ही बाजूंनी फायदा भाजपचाच असून मित्रपक्षाचा वापर केवळ गरजेपुरता होणार हे स्पष्ट होते.

सध्या महापालिका निवडणुका महायुतीतील घटक पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार याबाबत चर्चा सुरू आहे, भाजपने आतापर्यंत या मुद्यावर स्पष्ट भूमिकाच मांडली नव्हती, युतीचे अधिकार स्थानिक नेत्यांना दिले असे या पक्षाकडून सांगितले जात होते तर कधी तीन पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील असे सांगितले होते. गुरुवारी नागपुरात बोलताना मुख्यमंत्र्यांनी भाजपची याबाबत भूमिकाच स्पष्ट केली. ते म्हणाले जेथे आम्ही सक्षम आहोत तेथे आम्ही स्वबळावरच लढणार, निवडणुकीनंतर (गरज पडली तर) युती (पोस्टपोल) करणार. जेथे विरोधक सक्षम आहे तेथे निवडणूकपूर्व (प्री-पोल) युती करणार.

मुख्यमंत्र्यांच्या फार्मुल्याचा राजकीय अर्थ काढायचा झाला तर जेथे भाजप सक्षम आहे, तेथे हा पक्ष स्वबळावर लढेल. उदाहरणार्थ नागपूर. येथे भाजप सक्षम स्थितीत आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने १५१ पैकी १०८ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे यथे ते मित्रपक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घेणार नाही. बहुमताला जागा कमी पडल्या तरच निवडणुकीनंतर या पक्षांना सोबत घेण्यााबत विचार केला जाईल. मात्र जेथे भाजप सक्षम नाही, मित्र पक्षाची गरज भासू शकेल असे त्यांना वाटत असेल तर ते त्यांना सोबत घेतील. उदा.-मुंबई. भाजपकडून मुंबई महापालिकेवर भगवा झेंडा फडकावण्याचा कितीही दावा केला जात असला प्रत्यक्षात तेथील शिवसेनेचा प्रभाव सहजासहजी मोडून काढणे भाजपला शक्य होणार नाही, तेथे शिंदे गटाची मदत त्यांना लागणारच आहे. हे ओळखूनच मुंबईत निवडणूक पूर्व युती करणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. याचाच दुसरा अर्थ भाजपला जेथे-जेथे मित्रपक्षाची गरज भासेल तेथेच निवडणूकपूर्व युती होईल हे स्पष्ट होते.

मुख्यमंत्र्यांनी प्रिंप्री चिंचवडचे उदाहरण दिले. ते म्हणाले तेथे भाजप पहिल्या क्रमांकाचा तर राष्ट्रवादी अजित पवार गट दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. येथे भाजप राष्ट्रवादीच्या विरोधात लढणार, विशेष म्हणजे राष्ट्रवादीशी लढताना शिंदे गटाला सोबत घेणार, आणि निवडणुकीनंतर एकत्र येणार. एकूणच भाजपचा फार्म्युला हा याच पक्षाच्या पत्थ्यावर पडणारा दिसतो. यात मित्र पक्षाचा विचारच निवडणुकीनंतरच्या स्थितीवर अवलंबून आहे. म्हणजे भाजपने ठरवले तर युती नाही तर नाही,. त्यामुळे मित्रपक्षाची अडचण झाली आहे.

शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांची ताकद मोजक्याच शहरात आहे, तेथे त्यांना युती हवी आहे, पण मुख्यमंत्र्यांनी दिलेले पिंपरी चिंचवडचे उदाहरण बघता तेथे भाजप त्यांना मदत करण्याची शक्यता कमी दिसते. ठाण्यात शिंदे यांना विचारून निर्णय घेणार असे फडणवीस यां नी सांगितले. एकत्र लढू असे ते बोलले नाही हे महत्वाचे आहे.