Top Five Political News in Today : आज दिवसभरात अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली, तर जीएसटी रिफॉर्मवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांना थेट इशारा दिला, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोरक्को येथील एका कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करून पाकिस्तानला कडक शब्दात खडसावलं. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार?

‘मला रिकामं ठेवू नका, एखादी जबाबदारी द्या’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज कर्जतमधील एका कार्यक्रमातून पक्षश्रेष्ठींकडे केली. त्यांच्या या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय खासदार सुनील तटकरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. “धनंजय मुंडे यांच्या मागणीचे वेगवेगळे अर्थ आहेत. त्यासंदर्भात योग्यवेळी निर्णय घेतला जाईल. त्यांनी राजीनामा दिला त्याचीही काही कारणं आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार हे यासंदर्भात एकत्र बसून निर्णय घेतील,” असं तटकरे म्हणाले. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या मागणीवर त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिली. “मुंडे यांनी केलेल्या मागणीचा विचार पक्षाकडून केला जाईल. तोवर मी एवढंच सांगेन की आपल्याकडे ओबीसी आरक्षणाचं काम आहे. बाकीच्या जबाबदाऱ्या अजित पवार पाहतील,” असे भुजबळ म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे धनंजय मुंडेंची लवकरच मंत्रिपदी वर्णी लागू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

खासदार संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशातील जनतेला संबोधित करताना जीएसटी रिफॉर्मबद्दलची माहिती दिली. केंद्र सरकारने दोन स्लॅब रद्द केल्याने आता नागरिकांना १८ आणि ५ टक्केच जीएसटीचा कर भरावा लागणार आहे. या निर्णयामुळे अनेक वस्तू स्वस्त होतील, असं मोदींनी म्हटलं. त्यांच्या या घोषणेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली. हे सर्व करण्यापेक्षा पंतप्रधानांनी आमचे १५ लाख दिले असते तर ते जास्त सोयीचे पडले असते. हे मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत, असं राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी मोदींच्या भाषणाच्या वेळेबद्दलही शंका उपस्थित केली. “पंतप्रधान मोदी हे एरव्ही ८ वाजता देशाला संबोधित करतात, पण रविवारी भारत पाकिस्तान सामना असल्यामुळे त्यांनी ५ वाजता भाषण केलं. यावरून ते किती महान राष्ट्रभक्त हे दिसून येते. या जीएसटी रिफॉर्ममुळे प्रत्येकाला महिन्याला फक्त ११० ते १२० रुपयांचाच फायदा होईल”, असा दावाही राऊत यांनी केला.

आणखी वाचा : Visual Storytelling : महायुती सरकारची चोहोबाजूने कोंडी, कारण काय? राज्यात नेमकं काय घडतंय?

जितेंद्र आव्हाड यांचा आमदार पडळकरांना इशारा

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि त्यांच्या वडिलांबद्दल भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी अपशब्द वापरले. त्यासंदर्भातील व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पळकरांवर चौहोबाजूंनी टीकेची झोड उठली. मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांचे कान टोचले. त्याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने सांगलीत संस्कृती बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात सहभागी झालेल्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकरांना इशारा दिला. पडळकरांनी शिवीगाळ केल्यानंतरही जयंत पाटील गप्प बसले, पण मी गप्प बसणार नाही, असा इशारा आव्हाड यांनी दिला. तुम्ही असेच बोलत राहा, आपल्या खऱ्या संस्काराची महाराष्ट्राला ओळख करून द्या, आपण कसे आहोत हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे, असा टोलाही त्यांनी पळकरांना लगावला.

मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं शिंदेंचं कौतुक

ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणाऱ्या मेट्रो ४अ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची चाचणी सोमवारी पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ठाणे मेट्रो दिरंगाईबाबत महाविकास आघाडीवर खापर फोडले. फडणवीसांनी या मेट्रो प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. पुढील वर्षापर्यंत जास्तीत जास्त टप्पे पूर्ण होतील, काही काम मात्र २०२७ पर्यंत सुरू राहील, असं आश्वासन फडणवीसांनी दिलं. मोघरपाडा डेपोकरिता जमीन उपलब्ध करून देण्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांचे फडणवीस यांनी विशेष कौतुक केले. आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याचाही त्यांनी उल्लेख केला. २०१९ पर्यंत ठाणे मेट्रो प्रकल्पाचे प्रकल्पाचे काम वेगानं सुरू होतं. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी या प्रकल्पाला ब्रेक लावला. मात्र आमच्या सरकारने पुन्हा हे काम सुरू केल्याचं फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : BJP Strategy of BMC Election : भाजपासमोर कोणकोणती आव्हानं? ठाकरे बंधू एकत्र आल्यास कुणाला फटका? अमित साटम काय म्हणाले?

पाकिस्तानवर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक? राजनाथ सिंह काय म्हणाले?

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी मोरक्को येथील भारतीयांबरोबर संवाद साधला. “ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नसून ते स्थगित करण्यात आलं आहे. ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी आहे, असे सांगत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दहशतवाद्यांना आश्रय देणार्‍या पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला. आम्ही दहशतवाद्यांचा खात्मा धर्म बघून नाही, तर कर्म बघून केला, असेही ते म्हणाले. ऑपरेशन सिंदूरची पुढील कारवाई ही पाकिस्तानच्या वर्तनावर अवलंबून असेल. जर ते दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी झाले, तर त्यांना जशाच तसं उत्तर मिळेल. पहलगाममध्ये आपल्या २६ लोकांना धर्म विचारून गोळ्या मारण्यात आल्या होत्या”, याची आठवणही राजनाथ सिंह यांनी करून दिली.