सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धाराशिव: धाराशिव या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे असणाऱ्या शिवसेनेच्या लोकसभा मतदारसंघावर आता कॉग्रेसने दावा सांगितला आहे. पारंपरिक कॉग्रेसची जागा आघाडीच्या राजकारणात नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली. पाचवेळा या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेसाठी लढली. मात्र केवळ एकवेळाच राष्ट्रवादीला यश मिळाले. त्यामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आपला पारंपारिक वारसा सक्षमपणे सिध्द करेल, त्यासाठी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी काँग्रेसलाच मिळायला हवी, असा आग्रह महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील यांनी धरला आहे. ते स्वत:च या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत.

राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघाचा आढावा प्रदेश काँग्रेसकडून घेण्यात आला. मुंबई प्रदेश कार्यालयातील टिळक भवन येथे धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बंटी पाटील आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा >>> पुण्यात काँग्रेसला डिवचण्याची अजित पवार यांची खेळी

बैठकीत धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि विविध पदाधिकार्‍यांनी लोकसभेची जागा काँग्रेसलाच मिळायला हवी. याअनुषंगाने जोरदार आग्रह धरला. महाविकास आघाडी करूनच निवडणूक लढविण्यास आपण तयार आहोत. मात्र काँग्रेस या मतदारसंघात बळकट आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये आघाडीच्या वाट्याला आलेल्या मतदानाची टक्केवारी काँग्रेससाठी पूरक आहे. त्यामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघातून बसवराज पाटील यांना उमेदवारी देवून काँग्रेसला जुना सक्षम वारसा सिध्द करण्याची संधी द्यायला हवी, अशी जोरकस मागणी उपस्थित असलेल्या पदाधिकार्‍यांनी केली.

हेही वाचा >>> विरोधकांच्या बैठकीआधीच वर्चस्वाचा वाद चव्हाट्यावर

मतदारसंघात लिंगायत, मुस्लिम आणि दलित समाजाची मोठी संख्या आहे. त्याचबरोबर सर्व घटकातील मतदार अनेक वर्षांपासून काँग्रेससोबत जोडला गेला आहे. पक्षाने लोकसभेसाठी उमेदवारी दिल्यास संघटनात्मक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होईल. मतदारसंघात काँग्रेसच्या विजयाची शक्यता मोठी असल्याची भावना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी नमूद केली. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मागणीचा गांभीर्याने पक्षश्रेष्ठींनी विचार करायला हवा, असे मतही चव्हाण यांनी यावेळी मांडले.

अकरावेळा जिंकल्याचा दावा

धाराशिव लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने तब्बल बारावेळा निवडणूक लढविली आहे. त्यापैकी अकरावेळा काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत यश प्राप्त केले आहे. आघाडीच्या राजकारणात लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. पाच निवडणूका त्यांनी लढविल्या. मात्र केवळ २००९ साली त्यांना यश मिळाले. लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या विजयाचा दर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणारा आहे. त्यामुळे माजी मंत्री बसवराज पाटील यांना उमेदवारी मिळायला हवी, असा आग्रह जिल्ह्यातील सर्व पदाधिकार्‍यांचा आहे. शेवटी महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. त्यानुसार पक्षश्रेष्ठी जो अंतिम निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील यांनी दिली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dharashiv uddhav balasaheb thackeray shiv sena lok sabha constituency congress claims print politics news ysh
First published on: 06-06-2023 at 12:12 IST