अलिबाग- आधी विधानपरिषद, नंतर विधानसभा आणि आता नगरपालिका निवडणुकीच्या रायगड जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गट आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्यातील मनभेद दूर होण्याची चिन्ह दिसत नाहीत. अलिबाग नगर पालिका निवडणुकीच्या निमित्ताने पून्हा एकदा याचाच प्रत्यय येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत दोन्ही पक्षांमधील नाराजीचा तिसरा अंक सुरू झाल्याची चर्चा आहे.
अलिबाग नगरपालिका निवडणूकीसाठी महाविकास आघाडीची घोषणा शेकाप नेते जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. परंतु आता आघाडीमध्ये फूट पडल्याचे दिसून येत आहे. अलिबागमधील प्रमुख घटक पक्ष असलेला शेतकरी कामगार पक्ष एकही जागा सोडण्यास तयार नसल्याने शिवसेना या आघाडीतून बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
अलिबाग शहरातील २० जागांपैकी शेकापने दोन जागा महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसला दिल्या आहेत. कॉंग्रेसने या जागांवर अभय महामुणकर आणि समीर ठाकूर यांना उमेदवारी जाहीर करत ते प्रचारालाही लागले आहेत. शिवसेनेने शेकापकडे तीन जागांची मागणी केली होती. परंतु अद्यापपर्यंत एकही जागा देण्याची तयारी शेकापने दाखवलेली नाही. मागील निवडणूकीत शेकापचे सर्व १७ जागांवर उमेदवार निवडून आले होते. आता नवीन नगरपालिकेत २० जागा असणार आहेत. त्यातील तीन जागा आम्हाला मिळाव्यात अशी शिवसेना ठाकरे गटाची अपेक्षा आहे. परंतु कुठली जागा द्यायच्या असा प्रश्न शेकापपुढे निर्माण झाला. त्यामुळे शेकापकडून शिवसेनेला प्रतिसाद मिळालेला नाही.
अलिबागच्या माजी नगरसेविका तनुजा पेरेकर, शहरप्रमुख संदीप पालकर आणि माजी शहरप्रमुख कमलेश खरवले यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी पत्रकार परीषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. जर शेकापने आमचा विचार केला नाही स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
शेकापकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसेना ठाकरे गटाने स्वबळावर काही जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे.
विधान परिषद निवडणूकीत शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांना आयत्यावेळी उमेदवारी दिल्याने, शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. विधानसभा निवडणूकीतही दोन्ही पक्षांमधील मतभेद पुन्हा एकदा समोर आले होते. शेकापने महाविकास आघाडीकडून अलिबाग, उरण, पनवेल आणि पेण या चार जागांची मागणी केली होती. मात्र ठाकरे गटाने अलिबागचा अपवाद सोडला तर इतर तिन्ही ठिकाणी आपले उमेदवार उभे केले. याचा परिणाम निवडणूक निकालांवर झाला. शेकापचे उमेदवार पराभूत झाले. दोन्ही पक्ष एकत्र लढले असते तर पनवेल आणि उरण मधील निकाल वेगळे लागले असते. यामुळे दुखावलेल्या शेकापने नगर पालिका निवडणुकीत ठाकरे गटासाठी जागा सोडण्यास नकार दिल्याची चर्चा आहे.
