नगर : राज्यातील राजकीय घडामोडीनंतर भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी एक लक्षवेधी वक्तव्य केले. या राजकीय घडामोडींमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी विचलित होऊ नये, कितीही राजकीय उलथापालथ झाली तरी नगरचा लोकप्रतिनिधी हा मूळ भाजपचाच होईल, असा दावा त्यांनी केला. भाजपमध्ये सध्या कशी खदखद सुरू आहे, याचेच प्रतिबिंब त्यांच्या या वक्तव्यातून उमटले. त्यापूर्वी काही दिवस आधी भाजपमधील स्वतःला निष्ठावंत म्हणून घेणाऱ्या जुन्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे चिरंजीव खासदार डॉ. सुजय विखे यांच्या विरोधात उपस्थित निष्ठावंतांनी एल्गार पुकारला. या दोन्ही घटना लक्षात घेता भाजपमधील जुन्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा कसा कोंडमारा सुरू आहे हेच समोर येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यात इतर कोणत्याही पक्षापेक्षा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यामधील संघर्ष अधिक तीव्र आहे आणि सध्या तो वेगळ्या वळणावर असतानाच राज्यातील राजकीय घडामोडीतून राष्ट्रवादीमधील अजितदादा गटाने भाजपला पाठिंबा देत सत्तेत सहभाग मिळवला. त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटत आहेत. राष्ट्रवादीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांची राजकीय कुचंबणाच या घडामोडीतून उघड झाली आहे. भाजप आमदार असलेल्या बहुतांशी मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते राष्ट्रवादीला मिळालेली आहेत तर राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या बहुतांशी ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची मते भाजपला मिळालेली आहेत. जिल्ह्यातील साखर कारखानदारी, शैक्षणिक संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. तेथे त्यांचा व भाजपचा संघर्ष पूर्वापार चालत आलेला आहे. या संघर्षाची धार तीव्र बनली असतानाच अजितदादा गटाबरोबर कसे जुळवून घ्यायचे, असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांपुढे उभा ठाकला आहे. ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार देणारी’ ही परिस्थिती आहे. भाजपमध्ये सहभागी होऊन सत्ताकेंद्री आलेल्या विखे गटाशी वंचित भाजप कार्यकर्त्यांची नाळ जुळलेली नाही, तशातच अजितदादा गटाशी जुळवून घेण्याचे नवे आव्हान त्यांच्यापुढे निर्माण झाले आहे. मात्र त्याविरुद्ध बोलताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी गत जिल्हा भाजपची झाली आहे.

हेही वाचा – विक्रीसाठी आणलेल्या दुर्मिळ प्रजातीच्या कासवाची सुटका, दोन आरोपींना अटक

राष्ट्रवादीचे नगर शहरातील आमदार संग्राम जगताप, अकोल्याचे आमदार किरण लहामटे, पारनेरचे आमदार निलेश लंके असे तिघे अजितदादा गटाबरोबर आहेत. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे परदेशात आहेत व त्यांनी अद्याप आपला कल जाहीर केला नसला तरी ते अजितदादा गटाबरोबर जातील असा अंदाज वर्तवला जातो. त्यामुळे सहापैकी चार आमदार जिल्ह्यात अजितदादा गटाबरोबर आहेत. यातील आमदार जगताप व आमदार लंके यांचे किमान राज्यमंत्रीपद तरी पदरात पडावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात आपली वर्णी लागेल याच्या प्रतिक्षेत भाजपचे आमदार राम शिंदे असतानाच राजकीय घडामोडीतून त्यांची प्रतीक्षा लांबणीवर पडली. यातून भाजपच्या निष्ठावंतांना कोणी वालीच राहीला नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार जगताप यांचे सहकार्य मिळवत भाजपने नगरचे महापौरपद मिळवले होते. भाजपला सहकार्य करणे ही जगताप गटाची त्यावेळची अपरिहार्यता होती. मात्र सत्तेसाठी पाठिंबा मिळूनही भाजपमधील निष्ठावंतांची भूमिका जगतापविरोधीच आहे. नगरमधील मतदारांचे धृवीकरणच भाजपने तसे घडवले आहे. आमदार लहामटे पूर्वी भाजपमध्ये होते. पिचडविरोधी चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लहामटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला व विजयी झाले. आता लहामटे अजितदादा गटाबरोबर राहिल्याने अकोल्यात पिचड यांना ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे तीच परिस्थिती पारनेरमध्ये विखे गट आणि भाजप निष्ठावंत या दोघांचीही होणार आहे.

हेही वाचा – नागपूर : भरधाव ट्रकने शेकडो मेंढ्यांचा चेंदामेंदा

कोपरगावमध्ये आमदार आशुतोष काळे अजितदादा गटाबरोबर राहिल्यास अशीच परिस्थिती माजी आमदार स्नेहलता कोल्हे गटाची होणार आहे.
जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघात निर्माण झालेले हे राजकीय तिढे सुटणार कसे? याचे कोडेच निर्माण झाले आहे. यातून जिल्हा नियोजन समितीच्या निधीचे समन्यायी वाटप, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यास समन्यायी उमेदवारी वाटप, विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीचे प्रश्न अशी ही मालिका पुढे सुरूच राहणार आहे. जिल्ह्यात शिवसेनेच्या शिंदे गटापेक्षा अजितदादा गट अधिक प्रभावशाली आहे आणि तो भाजप-विखे-शिंदे गटावर कुरघोडी करण्याचे सामर्थ्य बाळगून आहे.

शिंदे गटाकडे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या रुपाने एकमेव चेहरा आहे. मात्र तो केवळ शिर्डी लोकसभा मतदारसंघात आहे आणि विखे गटाला दुखावण्याचे धाडस दाखवणारा नाही. जिल्ह्याच्या दक्षिण भागात शिंदे गटाचे अस्तित्वही नाही. त्यामुळे आता मूळच्या भाजप कार्यकर्त्याला जिल्ह्यात विखे गटासह अजितदादा गटाशीही स्वतंत्रपणे झुंजावे लागणार आहे. राज्यातील सत्तेमुळे जिल्हास्तरीय समित्यांचे अध्यक्षपद-अशासकीय सदस्यपद, महामंडळावरील नियुक्तीकडे डोळे लावून बसलेल्या भाजपच्या हिश्यामध्ये आता अजितदादा गट वाटेकरी राहणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dilemma of bjp leaders in ahmednagar amid changing political situation print politics news ssb
First published on: 11-07-2023 at 12:17 IST