नवी मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिका निवडणुकांना लवकरच मुहूर्त मिळेल अशी चिन्हे दिसत असताना नवी मुंबईतील राजकीय वातावरणही तापू लागले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी वाशीतील एका जाहीर कार्यक्रमात वनमंत्री गणेश नाईक यांना आव्हान देत ‘महापालिका निवडणुकीत एकत्र आलात तर एकसाथ अन्यथा नवी मुंबईत एकनाथ’ अशी घोषणा दिली. विशेष म्हणजे, बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष डाॅ.राजेश पाटील यांच्या निवडीचे स्वागत करताना शिंदे गटाच्या नेत्यांनी दादा-ताईंच्या वादात मंदाताईंची साथ धरल्याचे पुन्हा एकदा पहायला मिळाले.
भाजप नेते गणेश नाईक आणि शिंदे सेनेच्या नवी मुंबईतील नेत्यांमध्ये विस्तवही जात नसल्याचे चित्र आहे. मंत्रीपद स्विकारताच नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेतलाच शिवाय ठाण्यात फक्त कमळ अशी घोषणा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान उभे करत असल्याचे चित्र निर्माण केले. नाईक यांच्या ठाण्यातील जनता दरबारानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिंदे यांच्या सूचनेवरुन पालघर जिल्ह्यात अशीच जनसंवाद सभा घेत नाईक यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.
काही दिवसांपुर्वी उद्धव ठाकरे, काॅंग्रेस तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील १३ नगरसेवकांना आपल्या पक्षात घेत एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत नाईकांना आव्हान उभे करत असल्याचे चित्र निर्माण केले. या घडामोडींमुळे आक्रमक झालेल्या नाईकांनीही शिंदेसेनेतील दोन माजी नगरसेवकांचे वास्तव्य असलेल्या इमारतींना बेकायदा बांधकामाच्या नोटीसा बजाविण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले. यामुळे नाईक आणि शिंदेसेनेतील वाद आणखी चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपुर्वी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या युवा सेनेच्या मेळाव्यात शिंदेसेनेच्या नेत्यांनी ‘नवी मुंबईत एकनाथ’ अशी घोषणा देत नाईकांना आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याचे पहायला मिळाले.
युवा सेनेचे नवनियुक्त अध्यक्ष अनिकेत म्हात्रे, ममित चौगुले, राहूल लोंढे यासारख्या पदाधिकाऱ्यांसह खासदार नरेश म्हस्के यांनीही महापालिका निवडणुकीत एकत्र येत असाल तर स्वागत आहे, अन्यथा आमची ताकद दाखवून देऊ अशी आक्रमक भाषणे केल्याने या दोन पक्षातील मतभेदांचे दर्शन घडले.
भाजप अध्यक्ष निवडीने शिंदेसेनेत आनंद
भाजपने राज्यभरातील नव्या जिल्हाध्यक्षांची नुकतीच निवड केली. नवी मुंबईत बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचे समर्थक समजले जाणारे डाॅ.राजेश पाटील यांची अध्यक्षपदी नियुक्ती करताना भाजप श्रेष्ठींनी नवी मुंबईत नाईक-म्हात्रे यांच्यात सत्तासंतुलन राखण्याची खेळी केली. नाईक यांचे पुत्र आणि माजी आमदार संदीप नाईक हे पक्षाचे यापुर्वीचे अध्यक्ष होते. विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. महापालिका निवडणुकांपुर्वी त्यांना पक्षात घेतले जाईल अशी चर्चा असली तरी या आघाडीवर अजूनही शांतता आहे. त्यामुळे नवी मुंबई अध्यक्षपदासाठी नाईक यांचे पुतणे आणि माजी महापौर सागर नाईक यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र डाॅ.राजेश पाटील यांची या पदावर नियुक्ती होताच भाजपमधील मंदा म्हात्रे समर्थकांना एकप्रकारे बळ मिळाले आहे. मंदाताईच्या या ‘विजया’मुळे सध्या शिंदेगोटातही आनंदाचे वातावरण असून या पक्षाचे नेते डाॅ.पाटील यांचे जागोजागी अभिनंदन करताना दिसू लागले आहेत.
महायुतीची मोट घट्ट असताना ठाण्यात जाऊन आमच्या नेत्यांविरोधात बोलायचे हे आम्ही सहन करणार नाही. नवी मुंबईत राजकीय सत्ता असताना या नेत्यांनी काय दिवे लावले आहेत ते सर्वांना माहीत आहे. शहरात तीन-तीन दिवस पाणी नसते, महापालिका रुग्णालयांची अवस्था वाईट असते. एकनाथ शिंदे आणि डाॅ.श्रीकांत शिंदे यांनी सरकारच्या माध्यमातून विकासकामांचा रतीब ठाणे, डोंबिवली शहरात मांडला आहे. नवी मुंबईतील नेत्यांनी त्याकडेही पहावे. – अनिकेत म्हात्रे, युवा सेना अध्यक्ष (शिंदे गट)
डाॅ.राजेश पाटील यांच्या निवडीचे समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून आणि मित्रपक्षाकडून स्वागत होत आहे. पाय जमिनीवर ठेवून काम करणारा कार्यकर्ता, पदाधिकारी ते जिल्हाध्यक्ष असा त्यांचा प्रवास महायुतीमधील आमच्या मित्रपक्षाच्या नेत्यांनाही माहित आहे. भाजपसाठी आव्हानात्मक काळात बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे आणि डाॅ.पाटील यांनी एकत्रपणे काम केले आहे. डाॅ.पाटील यांची निवड त्यामुळे योग्य ठरते. – राजू शिंदे, प्रवक्ता भाजप नवी मुंबई